Saint Francis Xavier: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पवित्र अवशेषांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप असलेले सुभाष वेलिंगकर यांच्याविरोधात पोलिस कारवाई करतील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे
Protest Against Subhash VelingkarDainik Gomantak

Subhash Velingkar: वेलिंगकरांविरुद्ध आंदोलक आक्रमक; अनेक ठिकाणी तक्रारी दाखल, अटकेसाठी हालचाली सुरु

Saint Francis Xavier: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पवित्र अवशेषांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप असलेले सुभाष वेलिंगकर यांच्याविरोधात पोलिस कारवाई करतील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे
Published on

मडगाव: सुभाष वेलिंगकर यांना अटक करा, या मागणीवर ठाम असलेल्‍या आंदोलकांनी आज उग्र रूप धारण करीत संपूर्ण शहरातील वाहतूक अडविली. कदंब बस स्‍थानक, जिल्‍हाधिकारी कार्यालय आणि कोलवा सर्कल या तिन्‍ही भागांत आंदाेलकांनी निदर्शने केली. रात्री १० वाजता आंदोलक पांगले.

मात्र, रात्री उशिरा काहीजण रस्त्यावर ठाण मांडून होते. त्यांना पोलिसांनी लाठीचार्ज करून पिटाळले. त्यापैकी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आज मायणा-कुडतरी, मडगाव, कुंकळ्ळी, फातोर्डा, हरमल, वाळपई या पोलिस स्थानकांमध्ये वेलिंगकरांच्या विरोधात तक्रारी नोंदविण्यात आल्या.

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष, आमदार विजय सरदेसाई यांनी राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांना दूरध्वनीवरून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली.

पोलिस अधीक्षक सुनिता सावंत म्हणाल्या, वेलिंगकर कुठे आहेत याची माहिती आम्‍हाला प्राप्‍त झाली आहे. त्‍यांना पकडण्‍यासाठी उत्तर गोव्‍यातून पोलीसही पाठविले आहेत. त्‍यामुळे तुम्‍ही आता तुमचे आंदोलन मागे घ्‍या, असे आवाहन केले. मात्र, जोपर्यंत वेलिंगकर यांना अटक होत नाही, तोपर्यंत रस्‍त्‍यावरून हलणार नाही, यावर आंदोलक ठाम राहिले.

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्यावर शुक्रवारी रात्री गुन्हा नोंद झाल्यानंतरही शनिवारी सकाळी आंदोलकांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत मडगाव पोलिस मुख्यालयाबाहेर गर्दी केली. त्यानंतर ओल्ड मार्केट सर्कलकडे जात वाहतूक रोखत अटक होईपर्यंत आंदोलन केले. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली.

त्यात अडकलेल्या नागरिकांना बराच त्रास झाला. सकाळी ११.३० वाजता आंदाेलकांनी रस्‍ता अडविला होता. रात्री उशिरापर्यंत ते रस्‍त्‍यावरच उभे होते. आंदोलक वेलिंगकर यांच्‍या विरोधात घोषणा देत होते. सासष्‍टीचे मामलेदार प्रतापराव देसाई यांनीही आंदोलन मागे घेण्‍याची विनंती केली. पण त्‍यांनाही लोकांनी झिडकारले.

या आंदोलकांना पाठिंबा देण्‍यासाठी सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर हेही मडगावात दाखल झाले. विजय सरदेसाई यांचे समर्थक असलेल्‍या नगरसेवकांनी आज फाताेर्डा पोलिस स्‍थानकात वेलिंगकर यांच्‍या विरोधात तक्रार दाखल केली. त्‍यांचे समर्थकही या आंदाेलनात सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे मडगावात आलेले पर्यटक आणि विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला.

वेलिंगकरांच्या दारावर नोटीस

याप्रकरणी डिचोलीचे पोलिस उपनिरीक्षक विराज धाऊस्कर यांनी सुभाष वेलिंगकर यांच्या पणजीतील महालक्ष्मी मंदिराजवळील घरी त्यांना शोधण्यासाठी पथक पाठविले होते. त्या घरात त्यावेळी कोणीही नसल्याने दारावर ५ ऑक्टोबर रोजी ४ वाजता चौकशीस हजर राहण्याची नोटीस चिकटविली आहे.

... अन् मिकी पाशेकोंचा तोल ढळला

वेलिंगकर यांनी आक्षेपार्ह वक्‍तव्‍य केल्‍यामुळे जमाव खवळलेला असतानाच माजी मंत्री मिकी पाशेको यांचाही तोल आज ढळला. लोकांबरोबर रस्‍त्‍यावर उतरलेल्‍या पाशेको यांनी पोलिसांशी हुज्‍जत घातली. एका व्‍यक्‍तीसाठी तुम्‍ही गोव्‍यातील सर्व लोकांना रस्‍त्‍यावर उतरविले आहे. सरकार वेलिंगकर यांना मुद्दाम अटक करत नाही. वेलिंगकरांच्‍या डाेक्‍यात कुणी गोळी घातली तर त्‍याला जबाबदार सरकार असेल, अशी थेट धमकीची भाषा पाशेकाे यांनी बोलून दाखविली.

कडक पोलिस बंदोबस्‍त

आंदोलनावेळी अनुचित प्रक़ार घडू नये, यासाठी मडगावात कडक पोलिस बंदोबस्‍त ठेवला होता. पाेलिस अधीक्षक सुनीता सावंत याही आंदाेलनस्‍थळी उभ्‍या होत्‍या. मडगाव, केपे आणि वास्‍को या तिन्‍ही ठिकाणचे उपअधीक्षक फौजफाट्यासह मडगावात तैनात होते. त्‍याशिवाय आयआरबीच्‍या तुकड्याही तैनात केल्‍यामुळे मडगाव शहराला छावणीचे स्‍वरूप आले होते.

वेलिंगकरांवर कारवाई अटळ ; मुख्यमंत्री

सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पवित्र अवशेषांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप असलेले सुभाष वेलिंगकर यांच्याविरोधात पोलिस कारवाई करतील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. आंदोलकांनी रस्ता अडवून जनतेची गैरसोय करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की कायद्यासमोर सारे समान आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी ख्रिस्ती धर्मगुरू बोलमॅक्स परेरा यांच्याविरोधात कारवाई झाली होती, तशीच कारवाई वेलिंगकर यांच्याविरोधातही होईल. सरकार कारवाईत दुजाभाव करणार नाही. आंदोलकांची गुन्हा दाखल करण्याची मागणी मान्य केली आहे.

Saint Francis Xavier: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पवित्र अवशेषांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप असलेले सुभाष वेलिंगकर यांच्याविरोधात पोलिस कारवाई करतील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे
Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

वेलिंगकरांना दिलासा नाहीच; पोलिसांना नोटीस, उद्या सुनावणी

डिचोली पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांना सुभाष वेलिंगकर सापडलेले नाहीत. त्यांना चौकशीसाठी डिचोली पोलिसांनी नोटीस बजावली आहे. वेलिंगकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात प्राथमिक सुनावणी झाली. न्यायालयाने त्यांना अंतरिम आदेशाद्वारे अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने या अर्जावर पोलिसांना म्हणणे मांडण्याची नोटीस बजावत, सुनावणी सोमवारी (ता.७) ठेवली आहे. वेलिंगकर यांना अटक करावी, यासाठी सरकारवर ख्रिस्ती धर्मियांकडून वाढता दबाव असताना पोलिसांना मात्र सापडू शकलेले नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com