Drugs Case Dainik Gomantak
गोवा

Delhi Drug Case: मोठा खुलासा! गोव्यामार्गे दिल्लीत पोहोचले ड्रग्ज; साडेपाच हजार कोटींच्या 562 किलो कोकेन‌ची तस्करी

गोमन्तक डिजिटल टीम

दिल्लीलगत महिपालपूर येथे जप्त केलेले तब्बल ५६२ किलो कोकेन‌ हे गोवा‌मार्गे पाठवण्यात आल्याचे पोलिस तपासात उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आजवर जगभरातून गोव्यात अमली पदार्थ आणले जातात, असा तपास यंत्रणांचा समज होता. मात्र, गोव्यातूनही इतरत्र अमली पदार्थ पाठविले जात असल्याचे उघड झाल्याने आता या मार्गावर लक्ष केंद्रित करण्याचे तपास यंत्रणांनी ठरविल्याची माहिती मिळाली आहे.

दिल्ली पोलिसांचा विशेष विभाग याप्रकरणी तपास करत आहे. माहीतगार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलंबिया येथून साडेपाच हजार कोटींचे हे कोकेन दुबई येथे पाठविण्यात आले. दुबईतून जहाज मार्गे ते गोव्यात आले आणि ट्रकमधून ते दिल्लीमार्गे उत्तर प्रदेशात नेण्यात येत होते. महिपालपूर येथील एका गोदामातून हा अमली पदार्थ २ ऑक्टोबर रोजी जप्त करण्यात आला आहे. २० सप्टेंबर रोजी अमली पदार्थांचा हा साठा मुरगाव बंदरात पोहोचला होता. तेथे दोन अज्ञात व्यक्तींनी तो साठा स्वीकारला. गाझियाबाद येथून हा अमली पदार्थांचा साठा महाराष्ट्र, ओडिशा आणि गुजरातमध्ये पाठवण्यात येणार होता.

दिल्लीतील कोट्यवधींच्या कोकेन जप्त कारवाईसंदर्भात अमली पदार्थविरोधी कक्षाचे पोलिस अधीक्षक तथा उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांना विचारले असता ते म्हणाले की, या प्रकरणासंदर्भात दिल्ली पोलिसांनी गोवा पोलिसांशी संपर्क साधलेला नाही. या कारवाईची माहिती मलाही आहे. मात्र, जप्त केलेले कोकेन गोव्यातही पाठवण्यात येणार होते, याची मला काहीही माहिती नाही. सावधगिरीचा उपाय म्हणून पोलिस यंत्रणा अधिक सक्रिय केली आहे. प्रत्येक पोलिस स्थानकाला विशेष पोलिस पथक नियुक्त केले आहे. यापूर्वी अटक केलेले ड्रग्स माफिया व विक्रेत्यांवर पोलिस व अमली पदार्थविरोधी कक्ष संयुक्तपणे नजर ठेवणार आहे. ड्रग्स तपासणीसाठी जादा ‘किट्स’ (चाचणी उपकरणे) खरेदी करण्यात आली आहेत.

ड्रग्स वितरणासाठी तीन कोटींचा सौदा

दुबई येथील वीरेंद्र बसोया यानेच आपल्याला भारतात जाऊन अमली पदार्थ ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची सूचना केल्याची माहिती जस्सी याने तपास यंत्रणांना दिली आहे. जस्सी हा गेली २७ वर्षे लंडनमध्ये राहात होता. त्याला या ड्रग्स वितरणासाठी तीन कोटी रुपये मिळणार होते, अशी जबानी त्याने पोलिसांना दिली आहे.

मुख्य सूत्रधार पोलिसांच्या ताब्यात

याप्रकरणी तपास यंत्रणेने तुषार गोयल या ४२ वर्षीय इसमाला ताब्यात घेतले आहे. त्याने भारतात हा अमली पदार्थ स्वीकारला, असा आरोप आहे. गोव्यातून उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे अमली पदार्थांचा हा साठा नेण्यात येत होता, अशी माहिती प्राथमिक तपासातून पुढे आली आहे. स्थानिक पोलिसांनी याप्रकरणी चौघांना मंगळवारी रात्री पकडले.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटनमध्ये स्थायिक झालेला जितेंद्र पाल सिंग गिल‌ उर्फ जस्सी याला गुरुवारी ताब्यात घेतले आहे. तो गोव्यातून दिल्लीपर्यंत हे अमली पदार्थ सुरक्षित पोहोचावेत याची काळजी घेण्यासाठी लंडनहून भारतात आला होता. त्याला आज (शुक्रवारी) अमृतसरहून चौकशीसाठी दिल्लीत आणण्यात आले.

पर्यटन हंगामानिमित्त गोवा पोलिसांची विशेष व्यूहरचना

काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी सुमारे साडेपाच हजार कोटींचे कोकेन जप्त केल्याने गोव्यातील पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्‍वभूमीवर गोव्यातील नियोजित सनबर्न ईडीएमसाठी पुरवठा होणाऱ्या ड्रग्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी विशेष व्यूहरचना आखली आहे. या महिन्यापासून गोव्यात पर्यटन हंगाम सुरू झाला आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी पर्यटकांची उपस्थिती असणार आहे. त्यामुळे गोव्यामध्ये ड्रग्स विक्रीची मोठी उलाढाल होण्याची शक्यता असल्याने किनारी भागात विशेष पोलिस पथके तसेच ड्रग्सविरोधी कक्षाची पथके तैनात केली आहेत. काही संशयास्पद हॉटेल्समध्ये तपासणी करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

धरपकड सत्र सुरू

पोलिसांनी मंगळवारी रात्री पकडलेल्यांत गोयल याचा चालक औरंगजेब सिद्दिकी, अंगरक्षक हिमांशू कुमार आणि मुंबईतील अमली पदार्थ तस्कर भारत जैन यांचा समावेश आहे, अशी‌‌ माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांनी केंद्रीय यंत्रणांनी केलेल्या तपासातून अमली पदार्थांचा हा साठा भारतात पाठविण्यामागे दुबई येथील वीरेंद्र बसोया याचा हात आहे, अशी माहिती समोर आली आहे.

ड्रग्सचा असा झाला दुबई ते दिल्ली प्रवास

यापूर्वी अमली पदार्थ तस्करांनी दुबईतून देशातील विविध बंदरांमध्ये विविध वस्तू पाठवून त्याची तपासणी होते का, याची चाचणी केली होती.

गोव्यातही त्यांनी कपडे व इतर साहित्य पाठविणे सुरू ठेवले होते.

बंदरावरील तपासणी यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी हा मार्ग अवलंबला होता.

केंद्रीय तपास यंत्रणांना दुबईतून अलीकडेच येऊ लागलेल्या या वस्तूंबाबत संशय आला होता.

त्यामुळे याविषयीच्या दूरध्वनी संवादावर त्यांनी लक्ष ठेवले होते.

तरीही दुबईतून निघालेल्या एका जुन्या जहाजातून ५६२ किलो कोकेन पाठवल्याची माहिती त्यांना मिळाली नव्हती.

मुरगाव बंदरात हा अमली पदार्थ पोचल्यावर दोन ते तीन ट्रकमधून महिपालपूर येथील गोदामापर्यंत हा अमली पदार्थ पोचवण्यात आला.

गोवा ते दिल्लीदरम्यान हा अमली पदार्थ नेताना दुबईमध्ये ही माहिती पुरवण्यात येत होती.

केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी हे संभाषण टिपल्याने अमली पदार्थांचा हा मोठा साठा हस्तगत करणे पोलिसांना शक्य झाले.

असे असले तरी मुरगाव‌ बंदरातील ढिसाळ तपासणी यंत्रणेचा मुद्दा मात्र यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

Saint Estevam Accident: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी मित्र कल्पराज आणि प्रेयसीची दोन तास चौकशी; पोलिसांकडून प्रश्नांची सरबत्ती!

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

Sunburn Festival 2024: सनबर्नविरोधात कामुर्लीत स्थानिकांचा कडक विरोध; उद्याची बैठक ठरणार निर्णायक!

Mhadei Water Dispute: ...कर्नाटकाविरोधात लढण्यास सावंत सरकार ठरले कुचकामी; आलेमाव यांचा घणाघात

SCROLL FOR NEXT