पणजी: रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाने यांनी आक्षेपार्ह आणि अपमानास्पद भाषा वापरून आरजीपी सदस्य आणि सर्वसामान्य गोमंतकीयांना उघडपणे धमक्या दिल्याने चिंबल पंचायतीचे सदस्य शंकर नाईक यांच्याविरोधात जुने गोवा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांनी ही तक्रार नोंदवली असून यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता त्यांनी तक्रारीत वर्तविली आहे.
पक्षाने दिलेल्या तक्रारीनुसार, ८ नोव्हेंबर २०२५ रोजी शंकर नाईक यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक ‘अत्यंत आक्षेपार्ह आणि अश्लील व्हिडिओ’ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी गोमंतकीयांविरुद्ध अपमानास्पद आणि बदनामीकारक भाषा वापरली.
विशेषतः त्यांनी पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांना लक्ष्य केले. त्यामुळे पक्षाने नाईक यांच्या वक्तव्यांना ‘अतिशय दुःखदायक, अपमानास्पद आणि धमकीचे’ ठरवले असून, यातून ‘गुन्हेगारी धमकी’ आणि ‘हिंसाचार भडकावण्याचा इरादा’ स्पष्ट दिसतो असेही तक्रारीत नमूद केले आहे.
शंकर नाईक चिंबलच्या संवेदनशील इंदिरा नगर भागातील असून त्यांचा पूर्वीही अशा वर्तनाचा इतिहास असल्याचे पक्षाने तक्रारीत नमूद केले आहे. यापूर्वी २४ एप्रिल २०२३ रोजी पंचायत परिसरात पक्षाचे मुख्य सचिव अजय खोलकर यांना धमकावल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
मनोज परब यांनी तक्रार दाखल केल्यानंतर शांतता भंग होऊ नये म्हणून, शंकर नाईक यांना मंगळवारी प्रतिबंधात्मक अटक केली. तसेच शंकर नाईक यांच्याविरुद्ध चौकशी सुरू आहे. तसेच या भागात स्थिती बिघडू नये यासाठी आणखी ५ जणांना अटक केली आहे. सर्वांना उद्या दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करू, अशी माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.