मडगाव: झुवारीनगर येथे मंगळवारी (ता.29) झालेल्या आत्महत्या (Suicide) प्रकरणात आज पोलिसांना (Goa Police) घटनास्थळी एक कन्नड भाषेत लिहिलेली चिठ्ठी सापडली, असा दावा पोलिसांनी केला असला तरी ज्या तिघांनी आत्महत्या केली त्यापैकी कुणालाच लिहिता-वाचता येत नव्हते, असा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केल्याने हे प्रकरण पोलिस दडपून टाकू पाहतात ही शक्यता अधिकच गडद झाली आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकरणात त्या मयतांच्या कुटुंबियांना मदत करणाऱ्या एनजीओंनी या सर्व प्रकारची एक निष्पक्ष आयोग स्थापून चौकशी करावी आणि तोपर्यंत वेर्णाचे पोलिस निरीक्षक शेरीफ जॅकीस आणि या प्रकरणात तपास करणाऱ्या इतर पोलिसांना चौकशी संपेपर्यंत निलंबित करावे, अशी मागणी केली आहे. (Police are likely to be hiding information in the suicide case)
झुवारीनगर येथे राहणाऱ्या हुलगप्पा अंबिगेरा (30), देवम्मा अंबिगेरा (23) व गंगाप्पा अंबिगेरा (25) या तिघांनी आत्महत्या केली होती. एका चोरीच्या प्रकरणात चौकशी करताना वेर्णा पोलिसांनी त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केल्याने त्यांनी ही आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला होता. मात्र आज सकाळी दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक पंकज कुमार सिंग यांनी घटनास्थळी एक कन्नड भाषेत लिहिलेली चिठ्ठी सापडली आणि त्या चिठ्ठीत त्यांच्या कुटुंबियांकडून दबाव आला होता असे लिहिण्यात आले होते, असे म्हटले होते. मात्र मयत अशी चिठ्ठी लिहिणे असंभव कारण त्यांना लिहिता वाचताच येत नव्हते असे मयतांच्या कुटुंबियांनी सांगितल्याची माहिती वास्को येथील एनजीओ अरुण पांडे यांनी ''गोमन्तक''ला दिली. जर मयतांनी अशी चिठ्ठी लिहून ठेवली होती तर ती पोलिसांना कालच कशी सापडली नाही असा सवाल त्यांनी केला.
ज्यावेळी अशाप्रकारे आत्महत्या केली जाते आणि मृतदेह पोलिस ताब्यात घेतात त्यावेळी घरातील व्यक्ती आणि तटस्थ व्यक्ती यांना साक्षीदार ठेवून पंचनामा केला जातो. पण अशा तऱ्हेचा कुठलाही पंचनामा झाल्याचे आपल्याला माहीत नाही, असे या कुटुंबातील एकमेव घटनास्थळी हजर असलेली व्यक्ती प्रभू (मयत देवम्मा हिचा भाऊ) याने सांगितल्याची माहिती पांडे यांनी दिली. हा सगळाच प्रकार संशयास्पद असून त्यामुळेच या संपूर्ण घटनेची निष्पक्ष आयोगाद्वारे चौकशी होण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
दुसऱ्यांदा शवचिकित्सा नाहीच
पोलिसांनी केलेल्या मारहाणीला कंटाळून या आत्महत्या केल्या असा आरोप करून काल मयताच्या कुटुंबियांनी दुसऱ्यांदा शवचिकित्सेची मागणी केली होती. मात्र आज तशी कुठलीही दुसरी उत्तरीय तपासणी न करता हे तिन्ही मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले.
आज सकाळी खरे तर या मयतांचे कुटुंबीय पोलिसांविरोधात तक्रार करण्यासाठी वास्को येथे जमा झाले होते मात्र नंतर त्यांना त्यांच्या घरच्यांकडून मृतदेह ताब्यात घेऊन त्वरित बिजापूर येथे या तिथे सर्व नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी खोळंबून आहेत, असे सांगण्यात आल्यावर त्यांनी दुसऱ्यांदा शवचिकित्सा करण्याचा हट्ट सोडून सायंकाळी 4 वाजता गोमेकॉच्या शवागारातून मृतदेह ताब्यात घेऊन गावी जाण्याची वाट धरली. त्यांच्यावर खरेच घरच्यांनी दबाव आणला की अन्य कुणी हे मात्र कळले नाही.
अधीक्षक पंकज कुमार सिंग यांना विचारले असता, कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेतले आणि ते कर्नाटकात जाण्यासाठी रवाना झाल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्या पोस्टमॉर्टेममध्ये हे मृत्यू गळफास घेतल्याने झाल्याचे स्पष्ट करण्यात आले असून मृतांच्या अंगावर कुठल्याही जखमा सापडल्या नाहीत, असे त्यांनी सांगितले.
शेरीफ जॅकीस यांची झाली होती बदली
वेर्णाचे वादग्रस्त पोलिस निरीक्षक शेरीफ जॅकीस यांची फेब्रुवारी महिन्यात बदली होऊन त्यांच्या जागी प्रशाल देसाई यांची नियुक्ती झाली होती. असे असताना ते अजूनही वेर्णा येथे कसे, असा सवाल आता करण्यात येत आहे. या प्रकरणी त्या तिघांना पोलिसांकडून मारहाण झाली होती हे प्रभू याने पाहिले होते. हा प्रभू अल्पवयीन असून त्याला रात्रीच्यावेळी पोलिसांनी पोलिस स्थानकावर आणले होते. रात्रीच्यावेळी एका अल्पवयीनाला पोलिस स्थानकावर कसे नेले याची चौकशी बाल हक्क प्राधिकरणाने करण्याची गरज एनजीओ प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे.
निष्पक्ष आयोगाद्वारे चौकशी हवी : एनजीओंची मागणी
झुवारीनगर येथे झालेल्या आत्महत्या हा दुर्दैवी प्रकार असून या आत्महत्या पोलिसांनी जाच केल्यामुळे करण्यात आल्या का याची चौकशी करण्यासाठी निष्पक्ष आयोग नेमण्याची मागणी नेशनल कॉन्फेडरेशन ऑफ ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशनच्या गोवा शाखेने आणि कौन्सिल फॉर सोशल जस्टीस अँड पीस या संघटनांनी केली आहे.
ही चौकशी ताबडतोब सुरू करून तोपर्यंत या प्रकरणात सामील असलेल्या पोलिसांना निलंबित करावे. पोलिस स्थानकाच्या सीसीटीव्ही फुटेज त्वरित ताब्यात घ्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
या प्रकरणी चौकशी करण्यासाठी मडगावचे उपअधीक्षक हरीश मडकईकर यांची नियुक्ती केली आहे. यालाही हरकत घेताना या प्रकरणी मुरगावचे उपअधीक्षक राजू राऊत देसाई यांचीही चौकशी होण्याची गरज असून एक उपअधीक्षक दुसऱ्या उपअधीक्षकाची चौकशी कशी करणार असा प्रश्न उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पोलिसांवर टीका सोसून घेतली जाणार नाही असे जे वक्तव्य केले होते त्यालाही आक्षेप घेताना मुख्यमंत्र्यांच्या अशा भूमिकेमुळेच पोलिस दुर्बल घटकांवर अत्याचार करण्यास धजावत तर नाहीत ना, असा प्रश्न या संघटनांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केला
आहे.
या प्रश्नांची उत्तरे पोलिस देतील का?
दक्षिण गोव्यात आत्महत्येचा प्रकार घडला असताना दक्षिणेतील शवचिकित्सकाची परवानगी न घेता ही शवचिकित्सा गोमेकॉत का केली?
घटनास्थळी आत्महत्या करणाऱ्यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली असा पोलिस दावा करतात, तर मृतदेह ताब्यात घेतानाच ती का सापडली नाही? याचाच अर्थ कुठलाही पंचनामा न करताच हे मृतदेह ताब्यात घेतले का?
ही चिठ्ठी मयतांनीच लिहिली या निष्कर्षापर्यत पोलिस कसे पोहोचले? त्यांनी मयतांचे हस्ताक्षर पडताळून पाहिले होते का?
पोलिसांनी मारहाण केली असा गवगवा झाल्यानंतर रात्री उशिरा ही चिठ्ठी कशी काय सापडते? त्या तिघांवर कुटुंबियांकडून दबाव येण्यासारखा कुठला प्रकार घडला होता?
मडगाव उपअधीक्षकांकडून चौकशी
आत्महत्याप्रकरणी मयतांचा पोलिसांकडून छळ झाला का हे तपासून पाहण्यासाठी मडगावचे पोलिस उपअधीक्षक हरीश मडकईकर यांच्यामार्फत चौकशी चालू असून त्यांनी काल काही पोलिसांचे जबाब नोंद केले आहेत; मात्र ही चौकशी म्हणजे एक फार्स असून या प्रकरणात मुरगावच्या उपअधीक्षकाचा काही हात आहे का त्याचीही चौकशी होण्याची गरज आहे. एक उपअधीक्षक दुसऱ्या उपअधीक्षकाची चौकशी कशी करू शकेल, असा सवाल एनजीओच्या प्रतिनिधींनी उपस्थित केला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.