Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा

Digambar Kamat : दिगंबरना पंतप्रधान मोदींची लागलीच भेट; भाजपचे नेतेही चक्रावले

फुटीर आठ आमदार दिल्‍लीला रवाना; वाटाघाटी, पदांविषयी उत्‍सुकता ताणली

गोमन्तक डिजिटल टीम

Digambar Kamat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या सहज रीतीने काँग्रेस फुटिरांना सोमवारी भेटीची वेळ दिली आहे, त्‍यामुळे भाजप नेत्यांनाही आश्‍चर्य वाटत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उद्या, सोमवारी भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांच्यासह आठ भाजपातील नवे आमदार पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राष्ट्रीय भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतील. त्‍यासाठी सदर नेते रविवारी रात्री दिल्‍लीला रवाना झाले आहेत.

यापूर्वी बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखालील 10 जण भाजपात आले होते. त्यांना पंतप्रधानांनी कधीही भेट दिली नाही. त्याचप्रमाणे सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे यांनाही पंतप्रधानांची भेट मिळू शकली नाही. त्याहून महत्त्वाचे म्हणजे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे अजून पंतप्रधानांना एकटे भेटू शकलेले नाही. दिगंबर कामत यांना ज्या पद्धतीने पक्षश्रेष्ठीही महत्त्व देत आहेत व त्यांच्यासाठी दिल्लीत लाल गालीचा अंथरलेला आहे, तो पाहून स्थानिक नेते अचंबित झाले आहेत.

...तर कामतांना नगरनियोजन व खाण खाते

दिगंबर कामत यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आल्यास त्यांना नगरनियोजन व खाण अशी खाती मिळू शकतात. राज्यातील खनिज उद्योजकांनी कामत यांच्या बाजूने जोर लावला आहे. शिवाय गुजरातमधील काही उद्योगपतीही त्यांच्‍या मागे उभे असल्याचे चित्र आहे. हे फेरबदल लागलीच घडल्यास गोवा सरकारचा तोल ढळू शकतो, अशी चर्चा भाजपामध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे अनेक नेते अस्वस्थ आहेत.

मायकल लोबो घाईघाईने दिल्लीकडे

मायकल लोबो मित्राच्या लग्नासाठी दक्षिण आफ्रिकेला गेले आहेत. ते आज रात्री परस्पर दिल्लीत दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांच्या विमानाला विलंब झाला किंवा नियोजन बदलले, तर मोदींची एकत्रित भेट मिळणार नाही. त्यामुळे ते घाईघाईने दिल्लीकडे निघाल्याची माहिती आहे. भाजपात दाखल होण्याची सर्वाधिक आतुरता लोबो यांनाच लागली होती.

आरएसएस नेत्यांची भेट

मुख्यमंत्री सावंत यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत सध्याच्या राजकीय परिस्थितीची माहिती दिली. यावेळी खासदार विनय तेंडुलकर, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, भूषण भावे, विलास सतरकर उपस्थित होते.

परिस्थितीत बदल

1 सूत्रांच्या मते, दिगंबर कामत यांना दिलेली वागणूक स्थानिक नेत्यांनाही गोंधळात टाकते. आठ जणांना भाजपात प्रवेश देतेवेळी त्यांना कोणत्याही पदाचे आमिष दाखवण्यात आले नव्हते. परंतु, आता राजकीय परिस्थिती बदलू लागल्याचे जाणवू लागले आहे.

2 आठ जणांपैकी किमान तिघांना मंत्रिपद मिळू शकते. दिगंबर कामत यांना तर उपमुख्यमंत्रिपद देण्यासंदर्भात विचारविनिमय सुरू आहे.

3 सूत्रांच्‍या मते नव्या प्रवेश घेतलेल्या आमदारांना कोणतेही मंत्रिपद देण्यास स्थानिक पातळीवर विरोध आहे. लोकसभा निवडणुकीनंतरच मंत्रिमंडळात बदल केला जावा, अशी त्यांची अपेक्षा आहे.

4 केंद्राचा सध्याचा पावित्रा पाहिला तर गोवा मंत्रिमंडळात बरेच मोठे फेरबदल होऊ शकतात. त्याचा परिणाम स्थानिक पातळीवर असंतोषात होऊ शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT