सांगे: चानीमळ, कष्टी - काले येथे प्लास्टिक कचऱ्याच्या ढिगाऱ्याला लागलेली आग दुसऱ्या दिवशीसुद्धा धुमसत असल्यामुळे आग विझविण्यासाठी शासकीय यंत्रणेला बरीच धावपळ करावी लागली. सांगेचे उपजिल्हाधिकारी मिलिंद्र वेळीप, मामलेदार सिद्धार्थ प्रभू, वन अधिकारी, पोलिस, अग्निशमन सेवा, प्रदूषण मंडळ, आरोग्य खाते, स्थानिक पंचायत अशा साऱ्या शासकीय यंत्रणा आग व धुरापासून जनतेला त्रास होऊ नये म्हणून दिवसभर धावपळ करीत होते.
वेर्णा येथील औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांकडून प्लास्टिकचे रिकामी पिंप, वंगणाचे पिंप, प्लास्टिक कचरा बंद चिरेखाणीत गेल्या वर्षभरापासून टाकण्यात येत आहे. कदाचित चिरेखाण प्लास्टिक कचऱ्याने भरली म्हणून ती रिकामी करण्यासाठी आग लावण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अशाप्रकारे अजून त्याच भागात दोन ते तीन रिकाम्या चिरेखाणीत प्लास्टिक कचरा टाकण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
आगीपासून रासायनिक धूर लोकवस्तीत पसरून लोकांना त्रास होऊ नये म्हणून माती घालून आग विझविण्यात शासकीय यंत्रणा कामाला लागली होती. कालच्या आगीचा धूर लोकवस्तीत पसरून आजार जडू नये म्हणून रहिवाशांना अन्य ठिकाणी हलविण्यात आले होते. या रासायनिक धुराचा परिणाम लहान मुलं, गर्भवती महिला, वृद्धांना मारक ठरू शकतो.
आगीच्या ठिकाणी प्रदूषण मंडळाने खास यंत्र बसवून धुराचा परिणाम कितपत होऊ शकतो याची खबरदारी घेत आहे. कालच्या आगीमुळे अनेक नागरिकांनी घसा दुखू लागल्याच्या तक्रार केली आहे.
अजूनही घराघरांत रासायनिक दर्प येत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. एकंदरीत या प्रकरणात कोण दोषी आहे आणि कोणाच्या परवानगीने वेर्णासारख्या औद्योगिक वसाहतीमधील प्लास्टिक कचरा कष्टी गावात टाकण्यात येत होता त्याची सखोल चौकशी सांगेच्या उपजिल्हधिकाऱ्यांनी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.