Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; आमच्या सोबत रहाल तर पेन्शन वाढवू!

Khari Kujbuj Political Satire: मडगावच्‍या कारे कायदा महाविद्यालयात दिगंबर कामत यांनी सांगितले,की आणीबाणी लादून दिवंगत प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी संविधानाची हत्‍या केली.

Sameer Panditrao

आमच्या सोबत रहाल तर पेन्शन वाढवू!

माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी खलाशांसाठी पेन्शन योजना सुरू केली होती. सध्या खलाशांना दरमहा २५०० रुपये पेन्शन मिळते. ही रक्कम वाढविण्याची मागणी खलाशांकडून होत आहे. आज मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले की तुम्ही जर आमच्या बरोबर राहिलात व आपला पक्ष परत सत्तेवर आला तर ५०० नव्हे तर हजार रुपयांनी पेन्शन वाढविण्याची आपली तयारी आहे. मुख्यमंत्र्यांचे हे आमिष खलाशी समुदाय गंभीरपणे घेईल का? हाच चर्चेचा विषय आहे. ∙∙∙

दिगंबर उवाच!

मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी सध्या कुठलेही वक्‍तव्‍य केले तर तो चर्चेचा विषय बनतो. काल मडगावात झालेल्‍या ‘संविधान हत्‍या दिन’निमित्त मडगावच्‍या कारे कायदा महाविद्यालयात दिगंबर कामत यांनी सांगितले,की आणीबाणी लादून दिवंगत प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी संविधानाची हत्‍या केली. मात्र, त्यांचे नातू राहुल गांधी भाजपने संविधानाची हत्‍या केली, असा आरोप करतात. आणीबाणीचा इतिहास जाणून घ्‍यावा, असा सल्‍लाही त्‍यांनी राहुल गांधींना दिला. दिगंबर कामत यांचे हे भाषण सध्‍या समाज माध्‍यमांवर बरेच गाजत आहे. ‘मडगावकरांचो आवाज’चे प्रभव नायक यांनी तर कामत २०२० मध्‍ये काँग्रेसमध्‍ये असताना त्‍यांनी इंदिरा गांधी यांच्‍या या निर्णयाचे कसे समर्थन केले होते, त्‍याचा व्‍हिडिओ अपलोड केला आहे. पक्ष बदलला की भाषाही बदलते, हेच यावरून सिद्ध होते की नाही? ∙∙∙

चर्चिलना कानपिचक्या

माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव हे मूळचे खलाशी. पण ते नंतर मुख्यमंत्रीही झाले. एक खलाशी मुख्यमंत्री होणे ही गोमंतकीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी म्हटले. ते मुख्यमंत्री होते, तरी त्यांच्या किंवा इतर पक्षांच्या कार्यकाळात खलाशांसाठी काहीही करण्यात आले नाही. असे म्हटल्याबरोबर सभागृहात एकच हशा पिकला. नंतर मुख्यमंत्री म्हणाले की, मध्यंतरी लोक त्यांना विसरले होते. पण आता पुन्हा एकदा लोक त्यांची आठवण काढतील. कारण ते सदैव लोकांच्या पाठिशी उभे राहिले आहेत. म्हणजेच चर्चिलबाबनी २०२७ ची विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय पक्का केला आहे तर! ∙∙∙

आणीबाणीची २५ वर्षे अन् मोदी

आणीबाणीला ज्यावेळी २५ वर्षे पूर्ण झाली त्यावेळीही भाजपतर्फे पणजीत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तेव्हा प्रमुख पाहुणे म्हणून तत्कालीन भाजपचे राष्ट्रीय महासचिव, पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. स्थानिक भाजपनेते तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. सुरेश आमोणकर, मनोहर पर्रीकर, दत्ता नाईक, राजेंद्र आर्लेकर, प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, प्रकाश फडते, दत्ता खोलकर आदी नेते हजर होते. आज यापैकी अनेकजण हयात नाहीत...पार्सेकर भाजप सोबत नाहीत... परंतु मोदींनी त्यांच्या ‘द एमर्जंन्सी डायरीज’ पुस्तकातील पान क्र. ११३ वर तेव्हाच्या बातम्या आणि फोटो दिला आहे. तेव्हा मोदींनी काँग्रेसपासून भाजपला भीती नसल्याचे म्हटले होते. आणीबाणीशी गोव्याचा असाही संंबंध असावा अन् त्याला मोदींनी पुस्तकात उजाळा दिल्याने जुन्या भाजप कार्यकर्त्यांचा ऊर भरून आलाय. ∙∙∙

शिवोलीत ‘फोटोशूट’ की खरंच काम?

शिवोलीत सध्या एक नवीनच ‘पाहणी पर्व’ सुरू झालंय. आमदार दिलायला लोबो यांनी शिवोलीतील आपल्या कार्यालयासमोरच्या गटारांची पाहणी केली आणि त्याचे फोटो मोठ्या थाटामाटात सोशल मीडियावर टाकले. कॅप्शन होतं, ‘कामाची प्रगती तपासली, स्थानिकांना फायदा होईल याची खात्री करत आहे.’ ऐकायला आणि बघायला किती छान! त्यांच्या कामाचे कौतुक होणे अपेक्षित होते, पण परिसरात मात्र त्यांनी आपल्याच कार्यालयासमोर असलेल्या गटाराची पाहणी करून काम करत असल्याचा देखावा केला, असे बोल एकू येतात. कामाची काळजी असती, तर पावसाळा सुरू होण्यापूर्वी काम झाले असते, पण ते झाले नाही. केवळ कार्यालयासमोर काम असल्याने त्यांनी जाऊन फक्त फोटो काढले, अशी चर्चा शिवोलीत रंगते आहे. ∙∙∙

तवडकरांची ‘चाय पे चर्चा’

गेल्या काही दिवसांत गोव्याच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडलेल्या गोमंतकीयांनी पाहिल्या. मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा अजूनही चालूच आहे. अशातच ज्यांची नावे चर्चेत आहेत ते आपल्या मतदार संघात अधिक सक्रीय होताना दिसून येत आहेत. मतदारांच्या सध्या काय भावना आहेत, त्या जाणून घेण्यासाठी नेते ‘ग्राउंड’ पातळीवर भेटी देत आहेत. सभापती रमेश तवडकर दोन दिवस नागपूर दाैऱ्यावर होते. या दाैऱ्यावरून परत आल्यानंतर त्यांनी गोव्यातील राजकीय घडामोडींचा अंदाज घेण्यासाठी आपल्या मतदार संघात फेरफटका मारला. आगोंद येथील एका हॉटेलमध्ये स्थानिकांमध्ये त्यांनी केलेली ‘चाय पे चर्चा’ बुधवारी चांगलीच रंगली. ∙∙∙

सुभाषचेही केपेत बॅनर!

एक रस्ता बंद झाला तर आपले लक्ष्य गाठण्यासाठी पर्यायी मार्गांचा शोध घ्यायला हवा. मंत्री सुभाष फळ देसाई प्रतिनिधीत्व करीत असलेला सांगे मतदारसंघ येत्या निवडणुकीत अनुसूचित जमातीसाठी आरक्षित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सुभाष आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी पर्यायी मतदारसंघाच्या शोधात असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर झळकत आहेत. सुभाष फळ देसाई केपे मतदारंघात पाय पसरू पाहतात, असेही वृत्त आहे. केपे बाजारात यापूर्वी बाबू कवळेकर व एल्टन डिकॉस्टा यांचे बॅनर नेहमीच झळकतात. हिंदू, ख्रिस्ती व मुस्लिम बांधवांना सणासुदीच्या शुभेच्छा देण्यासाठी बाबू व एल्टन मोठे भव्य बॅनर लावतात. आता या पंक्तीत सुभाष फळ देसाई यांचेही बॅनर पहायला मिळतात. ‘सांज्याव’ या ख्रिस्ती सणानिमित ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा देणारे भव्य बॅनर सुभाषने केपे मतदारसंघात लावले आहेत. याचा अर्थ सुभाषने केपे मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे, असे झाले नाही का? ∙∙∙

बुडत्याचा पाय खोलात

वरील अशायाची म्हण बरीच जुनी आहे. पण काळ कितीही बदलला तरी या म्हणी मात्र विविध घटनांत चपखल बसलेल्या वा बसत असलेल्या आढळतात. आता प्रियोळ मधील गोविंदरावांचे उदाहरण घ्या ना. त्यांची मंत्रिमंडळांतून हकालपट्टी झाल्यास बरेच दिवस उलटले पण भाजप वा मुख्यमंत्र्यांविरुध्दचे त्यांचे जाहीर फुत्कार काही संपत नाहीत. वास्तविक ज्या पक्षामुळे वा नेत्यांमुळे आपण आजच्या स्थानावर पोहचलो त्यांच्यावर असे कोरडे ओढणारे लोकांच्या पसंतीस पडत नाहीत हा आजवरचा अनुभव आहे. खरे म्हणजे अशी जाहीर टिप्पणी करून गोविंदराव स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. आजवर अशा प्रकारे अनेकांना एकतर वगळण्यात आलेले आहे वा राजीनामा देण्यास भाग पाडले गेले आहे, पण कोणीच असे फुत्कार काढलेले नाहीत त्यामुळे गोविंदरावांची स्थिती बुडत्याचा पाय खोलांत, अशीच होणार नाही ना अशी भीती त्यांच्या समर्थकांत पसरलेली आहे म्हणे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Snake vs Mongoose: 'कट्टर शत्रू' समोरासमोर! भर रस्त्यात मुंगूस-नागाच्या लढाईचा थरार, पाहा पुढे काय झालं...Video Viral

राज्यपालपदाच्या प्रवासासाठी राजकीय प्रवासाला सोडचिठ्ठी; पी. अशोक गजपती राजू यांचा तेलगू देसम पक्षाचा राजीनामा

'It's Family Matter', आमदार कार्लुस फेरेरा यांच्या तक्रारीबाबत बोलण्यास खासदार विरियातो यांचा नकार Video

दो भाई दोनों तबाही! मोठ्याने पदार्पणाच्या सामन्यातच विश्वविक्रम रचला, आता धाकट्याने 'हॅटट्रिक' घेत घातला धुमाकूळ; पाहा Video

Goa News Live Update: काणका येथील दुचाकी अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT