मोरजी: पत्रादेवी चेकनाक्यावर परराज्यातून येणाऱ्या वाहनचालकांची ट्रॅफिक पोलिस सतावणूक करत असल्याच्या अनेक तक्रारी वाहनचालकांकडून केल्या जात आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकाराबाबत लोकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
राज्यात प्रवेश करताच पत्रादेवी चेकनाक्यावर सुरवात होते ती दंडात्मक कारवाईने. ट्रॅफिक पोलिस या ठिकाणी तैनात असतात. ते वेगवेगळ्या माध्यमातून वाहनचालकांना सतावून त्यांच्याकडून दंडाव्यतिरिक्त पैसे घेत असल्याच्या तक्रारी आहेत. त्याचअनुषंगाने गुरुवारी (ता.८) सावंतवाडी येथील एक युवक ज्याचा सोशल मीडियावर ‘ट्रॅव्हल’ नामक प्लॅटफॉर्म आहे. त्याच्याकडून पत्रादेवी चेकनाक्यावर गोवा पोलिसांकडून परप्रांतीयांची लूट केली जाते, असा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आणि तो राज्यातील सोशल मीडियावरही बराच गाजत असल्याने पोलिसांबाबत नागरिकांतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
राज्यातील विविध चेकपोस्टवर परप्रांतीय वाहनांकडून पैसे उकळण्याचा प्रकार गोव्यात सर्रासपणे सुरू असल्याच्या लोकांच्या भावना बनल्या आहेत. आतापर्यंत अनेकांकडून यासंबंधी व्हिडिओ सोशल माध्यमावर टाकून पोलिसांची बदनामी करतानाच राज्याचीही बदनामी केली जात आहे.
सोशल मीडियावरील या व्हिडिओत दोन हजार रोख रक्कम पोलिस आपल्याकडे मागत असल्याचा दावा तो युवक करत आहे. त्यानंतर ही रक्कम ५०० रुपयांवर आणण्यात आली. तरीही पैसे देण्यास तो युवक नकार देतो. नंतर पोलिसांकडून चलन देणारे मशीन चालत नसल्याचे कारण त्याला देण्यात आले. तरीही त्यांने दंड भरला नाही तेव्हा त्याला कोर्टात जबाब दे, असे सांगण्यात आले.
त्या युवकाचे वाहन हे काळ्या काचांचे असल्यामुळे पोलिसांनी हे वाहन अडवले होते; परंतु एकदम दोन हजारांची रोख रक्कम मागणे योग्य आहे का? असा सवाल काही नागरिक उपस्थित करत आहेत. हा व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसारित झाला आहे. त्या युवकासोबत त्यांचे कुटुंबीय असल्याचे दिसून येते.
पत्रादेवी येथे थार जिपच्या काळ्या काचा असल्याने पेडणे पोलिसांनी ही गाडी थांबवली. त्यावेळी चालकाने यूट्यूब ब्लॉगर असल्याने पोलिसांशी हुज्जत घातली. त्याला दंड जमा करण्यास सांगितले असता त्याने तो भरण्यास नकार दिला. यावेळी त्याने मोबाईलवरून रेकॉर्डिंग करण्यास सुरवात केली. पोलिस पैसे मागत असल्याची बदनामी करण्यास सुरुवात केली.
त्याला देण्यात आलेले दंडाचे चलन न्यायालयात पाठवण्यात येईल. तेथे त्याला ते जमा करण्यास सांगण्यात आले आहे. दंडात्मक रकमेची ऑनलाईन स्लिपही काढण्यात आली. यासंदर्भात तेथे असलेल्या महिला पोलिस उपनिरीक्षक शशांका परब यांच्याशी या घटनेची शहानिशा केली, असे स्पष्टीकरण पेडणे पोलिस उपविभागीय अधिकारी जीवबा दळवी यांनी दिली.
पत्रादेवी चेकनाक्यावर ज्या ठिकाणी हुतात्मा स्मारक आहे त्याच्या जवळच ट्रॅफिक पोलिस आणि पोलिस तैनात असतात. ट्रॅफिक पोलिस प्रत्येक वाहन अडवत असल्याने अनेकवेळा वाहतूक कोंडी होते. मात्र, कधीच बेकायदेशीर रेती-चिरे वाहतूक करणारी वाहने अडवल्याचे चित्र दिसत नाही. शिवाय पत्रादेवी पोलिस चौकीच्या खालीही मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक पोलिस दंडात्मक कारवाई करण्यासाठी सज्ज असतात, अशा तक्रारी वाहनचालक करतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.