Caretaker Service Announcement Goa Minister Vishwajit Rane
मये: गोमेकॉत रुग्णांची काळजी घेताना त्यांच्या नातेवाईकांना खूप त्रास, हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. त्यामुळे त्यांना सवलतीच्या दरात ‘केअरटेकर’ उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू आहे, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.
नातेवाईकांना त्यांच्या रुग्णांची काळजी घेण्यासाठी ‘केअरटेकर’ तैनात करणे गरजेचे बनले आहे. त्यामुळे आर्थिक भारातून त्यांची सुटका होईल. या गोष्टीचा विचार करून आरोग्य खाते आणि गोमेकॉने भविष्यात केअरटेकरची नियुक्ती करण्याचा विचार केला आहे, असे राणे म्हणाले. मये ग्रामपंचायत सभागृहात आज रविवारी आयोजित मेगा आरोग्य शिबिराचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
यावेळी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, गोवा मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, मयेचे सरपंच कृष्णा चोडणकर, गोमेकॉच्या डॉक्टराची टीम आणि मान्यवर उपस्थित होते.
गोमेकॉत अतिरिक्त डॉक्टरांची नियुक्ती करण्याचा सरकारचा विचार असून त्यासाठी खाते मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. गोवा मेडिकल कॉलेज आणि इस्पितळ हाताळणे सोपे काम नाही. सरकार बारकाईने सर्व गोष्टींचे निरीक्षण करत असून त्यानुसार काम करत आहे असे सांगून राज्यातील सर्व चाळीसही मतदारसंघांत मोबाईल युनिट्सद्वारे वैद्यकीय शिबिरे घेण्याची घोषणा आरोग्यमंत्री राणे यांनी केली.
भविष्यात कर्करोगाच्या कोणत्याही रुग्णाला त्रास होऊ नये यासाठी आरोग्य खाते गोमेकॉत सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी दर्जेदार आरोग्यसेवा मिळू लागली आहे. पुढील सहा महिन्यांत घरोघरी जाऊन रुग्णांना लाभ देण्याचा विचार सुरू आहे. त्यासाठी सायन्सच्या विद्यार्थ्यांना घरोघरी पाठवून लोकांची वैद्यकीय तपासणी करण्याचे प्रशिक्षण दिले जाईल, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे म्हणाले.
राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली मयेतील सुमारे २०६३ चौरस मीटर जागा पूर्ण क्षमतेचे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यासाठी संपादित करण्यात आली आहे. तसेच मये, पिळगाव आणि कारापूर आरोग्य केंद्रांमध्ये चांगल्या सुविधा देण्यासाठी जिल्हा निधीचा वापर केला जाईल, असे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले. डिचोली सामुदायिक आरोग्य केंद्राचा वापर मयेतील अनेक रुग्ण करत असल्याने तेथेही चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी आपण वैद्यकीय विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.