Morpirla Quepem वेळोवेळी सरकार दरबारी मागणी करूनही मोरपिर्ला -केपे येथील सरकारी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाची दुरुस्ती न केल्यामुळे आज शाळेच्या पहिल्याच दिवशी पालकांनी शाळेवर बहिष्कार घातला.
शाळा इमारत दुरुस्तीकडे शासनाचे दुर्लक्ष होत असून आंदोलनाला माझा पाठिंबा आहे, असे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी सांगितले. प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या इमारती बऱ्याच जुन्या झाल्या असून या शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या सुरक्षेविषयी सरकार गंभीर आहे का?असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.
मोरपिर्ला हा गाव ग्रामीण भागात येत असून या गावात असलेल्या शाळा किमान तीस वर्षांपूर्वी बांधल्या आहेत. त्या शाळा इमारती मोडकळीस आल्याने त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी पालकांनी केली होती.
गेल्यावर्षी मुख्यमंत्री केपे येथे आले होते, त्यावेळीसुद्धा आम्ही हा विषय त्यांना सांगितला होता. तेव्हा त्यांनी शाळा दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले होते, पण अद्याप हे काम झाले नसल्याने आम्ही आज शाळेवर बहिष्कार घातला, असे पालकांनी सांगितले.
पाडी, मोरपिर्ला, खोला या गावातील सरकारी शाळांची दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी मी तीनवेळा विधानसभेत आवाज उठवला होता, असे आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी सांगितले. मी विरोधी पक्षात आहे, यासाठी हे काम अडवून धरले आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
लहान मुलांच्या सुरक्षेविषयी हे सरकार गंभीर नाही. शाळा दुरूस्ती होणे आवश्यक असून लोकांबरोबर मी असून माझा त्यांना सदैव पाठिंबा असेल, असे डिकॉस्ता यांनी सांगितले.
धोकादायक स्थिती
मोरपिर्ला येथील या शाळेची धोकादायक परिस्थिती असून अशा शाळेत पालक कसे मुलांना या शाळेत पाठवणार नाहीत. गेल्या वर्षी पावसाळ्यात वर्गात पाणी येत होते. यासाठी मुलांना पंचायत सभागृहात बसवून वर्ग घेतले होते.
तेव्हापासून या शाळेची दुरुस्ती करावी, अशी मागणी आम्ही केली होती, पण अद्याप शाळा दुरुस्तीसंदर्भात काहीच केले नाही, असे उपसरपंच प्रकाश वेळीप यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.