Verca Paragliding Accident Dainik Gomantak
गोवा

Verca Paragliding Accident: पॅराशूट अडकले झाडात, पर्यटकांनी जीव वाचवायला मारल्या उड्या; वार्का येथील धक्कादायक प्रकार Watch Video

Verca Parachute Accident: मागील वर्षी उत्तर गोव्यातील केरी पठारावर पॅराग्लायडिंग करताना झालेल्या अपघातात पुण्याची महिला पर्यटक शिवानी दाबाळे (वय २३ वर्षे) हिचा मृत्यू झाला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: साहसी पर्यटनाच्या गोंडस नावाखाली सुरू असलेल्या पॅरासेलिंग आणि पॅराग्लायडिंगच्या नावाखाली गोव्यात पर्यटकांच्या जीवाशी खेळ सुरूच असून अशीच एक घटना दक्षिण गोव्यात वार्का येथे घडली.

पॅराशूट खाली उतरताना ते माडात अडकल्याने मोठा अनर्थ होणार होता. मात्र, पॅराशूटला लटकणाऱ्या दोन पर्यटकांचे नशीब बलवत्तर असल्यानेच काही मीटर उंचीवरून त्यांनी खाली उडी घेतल्याने त्यांचा जीव वाचला.

असे असतानाही त्या ऑपरेटरने ते पॅराशूट खाली काढण्याचे प्रयत्न न करता लगेच दुसऱ्या पॅराशूटने पर्यटकांना हवेत उडवण्यास सुरुवात केली, अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शीने दिली.

मागील वर्षी उत्तर गोव्यातील केरी पठारावर पॅराग्लायडिंग करताना झालेल्या अपघातात पुण्याची महिला पर्यटक शिवानी दाबाळे (वय २३ वर्षे) हिचा मृत्यू झाला होता. शिवाय तिच्यासोबत असलेल्या नेपाळी ऑपरेटरचाही जीव गेला होता. त्यावेळी बेकायदेशीर साहसी खेळांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, हा निर्णय फक्त कागदोपत्रीच राहिल्याचे दिसून येते.

वार्का येथील आज जी घटना घडली, त्यावेळी हे पॅरासेलिंग अवैध जागेत सुरू असल्याची बाब उघड झाली. वास्तविक या किनाऱ्यावर पॅरा सेलिंगसाठी मोकळी जागा ठरवून दिलेली असतानाही हे पॅरासेलिंग ज्या जागेत दाट माड आहेत, तिथे सुरू होते. हे पॅरासेलिंग पास्कोल रिबेलो हा चालवत होता, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

एका प्रत्यक्षदर्शीने या घटनेची माहिती देताना दुपारी पॅराशूट खाली उतरताना ते माडात अडकले. त्यावेळी त्याच्या हुकला दोन माणसे होती. मात्र, दोरी खाली आल्याने काही मीटरवरून त्या दोघांनी खाली उड्या घेतल्याने त्यांचे प्राण वाचले. या भागात पॅरासेलिंगचा व्यवसाय करणारे कॉस्मो फर्नांडिस यांनीच या घटनेचा व्हिडिओ काढून तो व्हायरल केल्याने या प्रकाराला वाचा फुटली.

या एकाच ऑपरेटरकडून वार्का येथे असे बेकायदेशीर पॅरासेलिंग सुरू असून त्याच्याविरोधात पर्यटन खात्याकडे तक्रार करूनही त्याकडे काणाडोळा केला जात असल्याचा आरोप फर्नांडिस यांनी केला. या अशा हव्यासापोटी चालवलेल्या साहसी खेळांमुळे पर्यटकांचा जीव धोक्यात येत असून यामुळे गोव्याच्या पर्यटनाचे नावही खराब होत असल्याचे त्यांनी सांगितले.

यापूर्वी कोलवा येथे अशाच धोकादायक पॅराग्लायडिंगमुळे एका वृद्ध ब्रिटिश पर्यटकावर आपली बोटे गमावण्याची वेळ आली होती. समुद्र किनाऱ्यावर चालताना डोक्याजवळून ग्लायडिंग मशीन गेल्याने डोके वाचवण्यासाठी त्याने डोक्यावर हात घेतला असता, ग्लायडिंग मशीन त्याच्या बोटाला लागल्याने ती कापली होती. त्यापूर्वी ग्लायडिंग करून खाली उतरताना व्यवस्थितपणे खाली न उतरविल्यामुळे वाळूत आढळल्याने दिल्लीच्या एका पर्यटक महिलेचा पाय मोडला होता.

या किनारपट्टी भागात काहीजण राजकीय आशीर्वादाने पॅराग्लायडिंग करत आल्यामुळे अशा दुर्घटना होत आहेत. त्यांना राजकीय आशीर्वाद असल्यानेच पोलिस किंवा पर्यटन खाते त्यांच्या वाटेला जात नाही, अशी प्रतिक्रिया पर्यावरण चळवळीतील कार्यकर्त्या ज्युडिथ आल्मेदा यांनी व्यक्त केली.

‘तो’ पर्यटक नव्हे, डेमो ऑपरेटर, पोलिस

वार्का येथे पॅरासिलींग सुरू असताना जो माडावर अडकला, तो पर्यटक नसून डेमो ऑपरेटर होता. त्याचे नाव संतोष राठोड असे असून सुदैवाने त्याला मोठी दुखापत झाली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. राठोड हा ग्लोरिया वॉटर स्पोर्टसमध्ये कामाला आहे.

गतवर्षीही त्याच ऑपरेटरकडून पर्यटक संकटात

कॉस्मो फर्नांडिस म्हणाले, अशा दाटीवाटीने माड असलेल्या जागेत पॅरासेलिंग करणे धोक्याचे असतानाही केवळ जास्त पर्यटक मिळावेत, यासाठी निर्बंधित जागेत हे पॅरासेलिंग सुरू होते. एका वर्षापूर्वी दर्या खवळलेला असताना याच ऑपरेटरने पैशाच्या हव्यासापोटी सेलिंगसाठी आपली बोट दर्यात घातली आणि मध्येच ती बंद पडल्याने एका पर्यटक युवतीला तब्बल एक तास हवेतच लटकत राहावे लागले होते.

पर्यटनमंत्र्यांनी मागविला अहवाल

या प्रकाराविषयी पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले, की वार्का येथील पॅराशूट दुर्घटनेची पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. जलक्रीडा करताना ती घटना घडली. त्याविषयी मी त्या घटनेचा सविस्तर अहवाल मागविला आहे. उद्या (शुक्रवारी) अहवाल आल्यानंतर मी त्याविषयी स्पष्टीकरण देईन.

सिकेरी येथे भरकटली पर्यटक बोट

सिकेरी येथे एक पर्यटक बोट भरकटल्याची घटना गुरुवारी घडली. त्यामुळे पुन्हा एकदा पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मिरामार किनाऱ्यालगतही पर्यटकांना जलसफर घडवून आणणाऱ्या बोटी चालतात; पण येथे पर्यटकांच्या सुरक्षिततेचे नियम पाळले जातात का, हे संबंधितांकडून पाहिले जात नाही. बोटींमधील पर्यटकांच्या सुरक्षिततेविषयी वारंवार प्रसारमाध्यमांनी प्रश्न उपस्थित केले; पण त्याकडे काणाडोळा केला जात आहे.

पर्यटकांची सुरक्षा धोक्यात

१.कळंगुट येथील समुद्रात डिसेंबर २०२४ मध्ये बोट उलटल्याने महाराष्ट्रातील एका पर्यटकाचा मृत्यू झाला, तर १२ जणांना वाचवण्यात जीवरक्षकांना यश आले होते.

२. तत्पूर्वी नोव्हेंबर २०२४ मध्ये बायणा समुद्र किनाऱ्याजवळ जलक्रीडा उपक्रमादरम्यान एका पर्यटकाचा मृत्यू झाला होता.

३. जानेवारी २०२५ मध्ये उत्तर गोव्यात पॅराग्लायडिंग करताना एका महिला पर्यटक आणि तिच्या प्रशिक्षकाचा दरीत कोसळून मृत्यू झाला होता.

४. अशा जीवघेण्या घटना घडल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

५.पर्यटन खात्याने जलक्रीडांविषयी नियम आणि अटी लागू केल्या तरी त्यातून पळवाटा काढल्या जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colavale Jail Brawl: कोलवाळ जेलमध्ये राडा; 8 ते 10 कैद्यांकडून अंडर ट्रायल कैद्याला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण

Viral Video: रेल्वे स्टेशनवर 'बेल्ट वॉर'! वंदे भारतमधील IRCTC कर्मचाऱ्यांची तुंबळ हाणामारी, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

IND vs AUS 3rd ODI: सिडनी वनडेत कोणाला संधी, कोणाला डच्चू? मालिका वाचवण्यासाठी टीम इंडियाच्या Playing 11 मध्ये होणार मोठे बदल

माजी खाणपट्टाधारकांना खनिज विक्रीस परवानगी; गोवा सरकारचा डंप पॉलिसीअंतर्गत महत्वाचा निर्णय

सात दिवसानंतर चौथा बळी; रासई लोटली स्फोटात जखमी बिहारच्या कामागाराचा मृत्यू

SCROLL FOR NEXT