Pandurang Madkaikar Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: मडकईकर हे संतोष यांच्यापर्यंत पोचले कसे? 20 लाखांच्या लाच आरोपावरून रंगला कलगीतुरा, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

Corruption In Goa: कॉंग्रेसच्या राष्ट्रीय समितीचे कायम निमंत्रित गिरीश चोडणकर यांनी व्हिडिओ जारी करून सत्ताधारी भाजपवर यानिमित्ताने आरोप केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Pandurang Madkaikar Bribery Allegation

पणजी: माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी एका मंत्र्याने आपल्याकडून साध्या कामाची फाईल मंजूर करण्यासाठी १५-२० लाख रुपये गेल्याच आठवड्यात घेतल्याचा आरोप मंगळवारी रात्री केला होता. आता तो मंत्री कोण, हे जाहीर करण्यासाठी त्यांच्यावर दबाव वाढू लागला आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मडकईकर यांनी आपल्यावर आरोप केले नसल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, ‘‘तो मंत्री कोण हे मडकईकरच सांगू शकतील. त्यांनी केलेले आरोप स्वत:च सिद्ध करावेत.’’ सरकारमधील ज्येष्ठ मंत्री माविन गुदिन्हो यांनीही मडकईकर यांनी मंत्र्याचे नाव घ्यावे, यासाठी दबाव वाढवतानाच मडकईकर हेही माजी मंत्री आहेत, असे सांगत सूचक इशाराही दिला आहे.

मडकईकर मंगळवारी रात्री भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांना भेटण्यासाठी पणजीत आले होते. तेथून परत जाताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला.

असे असले तरी विरोधी कॉंग्रेस पक्षाकडून आज सकाळी त्यावर मोठी प्रतिक्रिया उमटली नाही. कॉंग्रेसच्या राष्ट्रीय समितीचे कायम निमंत्रित गिरीश चोडणकर यांनी व्हिडिओ जारी करून सत्ताधारी भाजपवर यानिमित्ताने आरोप केले. त्यानंतर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी याप्रकरणी मौन सोडले.

या विषयावरून सत्ताधारी भाजपमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. मडकईकर यांच्या आरोपांचे भाजपकडून तातडीने खंडन का केले नाही, अशी विचारणा कार्यकर्ता पातळीवर होऊ लागली आहे. आमदार, मंत्री हेही वरिष्ठ याबाबतीत काहीतरी बोलतील म्हणून आज दिवसभर वाट पाहात होते. मडकईकर यांच्या आरोपाचा प्रतिवाद न केल्याने त्यांनी केलेले आरोप मान्य केल्यासारखेच होईल, असे सत्ताधारी वर्तुळात खासगीत बोलले जात होते. मात्र, अखेरपर्यंत पक्षाने यावर तोंड न उघडल्याने तोही चर्चेचा विषय ठरला आहे. मडकईकर हे संतोष यांच्यापर्यंत कसे पोचले, याचीही वेगळी चर्चा सुरू आहे.

मुख्यमंत्र्यांनी त्वरित कारवाई करावी

‘आरजी’चे आमदार वीरेश बोरकर म्हणाले की, जर मडकईकर यांनी अशा प्रकारे पैसे दिले असतील तर या प्रकरणाची चौकशी व्हिजिलन्स, ईडी आणि अँटी करप्शन विभागाने तातडीने करावी. मडकईकर यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांनी त्वरित या प्रकरणाची दखल घ्यावी. मंत्री कोण आहे, हे न पाहता नि:पक्षपातीपणे कारवाई केली पाहिजे. भ्रष्टाचारात गुंतलेले हात असलेले मंत्री कोणतेही असोत, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा लोकांनीच या मंत्र्यांना त्यांची जागा दाखवून द्यायला हवी.

मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा; युरी आलेमाव

मडकईकर यांनी केलेला आरोप अतिशय गंभीर असून यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खुलासा केलाच पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे. अन्यथा या भ्रष्टाचारात मुख्यमंत्र्यांचाही हात आहे असे म्हणावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. या सरकारात इव्हेंटच्या माध्यमातून कोट्यवधींची लूट केली जाते, असा आरोप युरी यांनी केला.

शिशे के घर में रहकर... : माविन

लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे; पण त्याचा गैरवापर होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांना दिला. गुदिन्हो म्हणाले की, मडकईकर यांनी इतरांवर टीका करण्याआधी स्वतःच्या काळातील घडामोडींवर नजर टाकावी. काचेच्या घरात राहून इतरांच्या घरावर दगड मारू नका. जर कुठलीही चूक आढळली असेल, तर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल करावी. केवळ बोलून काही होणार नाही. त्यांनी संबंधित मंत्र्याचे नाव जाहीर करावे आणि थेट पोलिस कारवाई करावी.

नक्कीच नाव जाहीर करणार

माजी मंत्री पांडुरंग मडकईकर म्हणाले, की त्या मंत्र्याचे नाव जाहीर करून त्याच्यावर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया भाजपच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतर करणार आहे; कारण अजूनही मी भाजपचा सदस्य असल्याने पक्षाच्या विरोधात जाईल, अशी कोणतीही गोष्ट करणार नाही. तसेच माविन गुदिन्हो हे स्वतः काचेच्या घरात राहात असून दिल्लीत त्यांनी न फुटणारे काचेचे घर बांधले आहे. दुसऱ्यांना उपदेश देण्यापूर्वी अगोदर स्वतःकडे पाहावे.

आरोपात नवीन काहीच नाही; सरदेसाई

गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई म्हणाले, की या आरोपात नवीन असे काहीच नाही. यापूर्वी मीही असे आरोप कित्‍येकदा केले आहेत आणि विधानसभा अधिवेशनात ते सिद्धही करून दाखविलेत. त्‍याचा परिणाम म्‍हणजे, दोषी मंत्र्यांवर कारवाई झालीच नाही; पण विधानसभा अधिवेशनाचे दिवस मात्र कमी केले.

संतोष यांना बंगळुरूत भेटलेला नेता कोण?

भाजपचे राष्ट्रीय नेते बी. एल. संतोष यांची मंगळवारी रात्री कोणी कोणी भेट घेतली, याची सत्ताधारी वर्तुळात चर्चा होती. सध्या पक्ष संघटनेत सक्रिय नसलेल्या; पण पूर्वी महत्त्वाची जबाबदारी पक्षासाठी पार पाडलेल्या नेत्यांनी त्यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. विरोधी पक्षाने बजावायची भूमिका या पक्षाच्या निकटवर्तीयांनी बजावल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या राज्यात सरकारविरोधी गाजत असलेल्या विषयांशी संबंधित कागदपत्रेही त्यांनी सादर केल्याचे सांगण्यात येते. त्यातील एक नेता अलीकडेच दिल्लीत जाऊन संतोष यांना गुपचूपपणे भेटून आला होता. संतोष हे आज बंगळूर येथे असतानाही तो नेता त्यांच्या संपर्कात होता, अशी माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT