Goa Politics | Fake Promises  Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील पंचायत आणि मॉन्सूनपूर्व कामांचा वरचेवरच बोलबाला

रस्त्याच्या बाजूची गटारे उपसली जात नाहीत...

दैनिक गोमन्तक

गोवा: नगरपालिका स्तरावर पावसाळापूर्व कामांचा वरचेवर बराच बोलबाला होत असतो. कारण त्यात अनेकांचे हितसंबंध गुंतलेले असतात. अनेक ठिकाणी अशा कामांच्या डुप्लीकेशनचे आरोप होऊन नंतर ती प्रकरणे भ्रष्टाचार प्रतिबंधक यंत्रणेकडेही पोचलेली आहेत, पण मुद्दा तो नाही, तर पंचायत स्तरावरील आहे. पंचायत स्तरावर अशी कामेच होत नाहीत व त्यामुळे त्या भागात गंभीर स्थिती निर्माण होत असते. रस्त्याच्या बाजूची गटारे उपसली जात नाहीत व रस्ते पाण्याखाली जातात, तरीही त्याची दखल घेतली जात नाही. वित्त आयोगाकडून पंचायतींना जो निधी मिळतो त्यातून अशी कामे हाती का घेतली जात नाहीत अशी विचारणा आता सर्रास होऊ लागली आहे.

प्रतिमाला वेध ‘घर वापसी’चे

महिला काँग्रेसमध्ये असताना आपली स्वतःची प्रतिमा रणरागिणी अशी बनविणाऱ्या प्रतिमा कुतिन्हो या मोठी आशा घेऊन आम आदमी पक्षात सामील झाल्या, पण त्यांची तिथे काही मात्रा चालली नाही. आता ‘आप’साठी ही प्रतिमा डोईजड झाल्याने त्यांना नैऋत्य भारताच्या प्रवक्त्या म्हणून नेमणूक करण्याची तयारी चालल्याचे समजते. वर वर पाहता आप प्रतिमा बाईकडे राष्ट्रीय जबाबदारी देऊ पाहाते असे वाटले तरी प्रत्यक्षात प्रतिमा यांना गोव्याच्या कामकाजातून हा हटविण्याचाच प्रयत्न हे सर्वांना माहीत आहे. असे म्हणतात, आपच्या या कारवायांना प्रतिमाही विटल्या असून त्यांनी पुन्हा स्वगृही म्हणजे काँग्रेस पक्षात येण्याची तयारी चालविली आहे. ही घरवापसीची तारीख मात्र अजून ठरलेली नाही.∙∙∙

कांता, शिवदास गेले कोणीकडे?

लोककलाकार कांता गावडे व साहित्यिक एन. शिवदास हे मोठ्या उत्साहाने तृणमूल काँग्रेसमध्ये गेले होते. कांता यांनी तर आपले कोकणी अकादमीचे उपाध्यक्षपद सोडून तृणमूलमध्ये प्रवेश केला होता, पण हाती काहीच लागले नाही. कांता यांना केपे मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली, तरीही मते पडली फक्त १६१! आता हे दोघेही तृणमूलमध्ये आहेत की नाही हे कळायला मार्ग नाही. सध्या त्यांची ‘तेल गेले, तूपही गेले हाती आले धुपाटणे’ अशी अवस्था झाली आहे. याबाबत फोंड्यातील कला व साहित्य क्षेत्रात चर्चा सुरू आहे. ‘गेला माधव कोणीकडे’ असा प्रश्‍न त्यांना लोक विचारतांना दिसत आहेत. एवढे मात्र खरे.∙∙∙

जुने बसस्थानक बेवारस स्थितीत

मडगावचे जुने बसस्थानक हे मडगाव नगरपालिकेच्या मालकीचे, पण गेली काही वर्षे ते बेवारस स्थितीत आहे. हल्लीच गोवा कॅनतर्फे केलेल्या संयुक्त पाहणीतही त्याचा प्रत्यय आला, पण त्यातून तरी पालिकेचे डोळे उघडणार का असे प्रश्न सुजाण मडगावकर करत आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणच्या जागेचा चांगल्या पध्दतीने उपयोग करून त्यातून पालिकेचा महसुल वाढविता येण्यासारखा आहे, पण ते कोणालाच नको आहे. त्याऐवजी अपघातग्रस्त वाहने, ऑम्लेट पावचे गाडे यांना ही जागा आंदण देण्याकडे सर्वांचा कल. याला मडगावकर तरी काय करणार जसा राजा तशी प्रजा हे तर ठरलेलेच आहे. ∙∙∙

पंचांचे मानधन लटकणार

देशातील लोकप्रतिनिधी, जसे खासदार, आमदारांना दरमहा मानधन दिले जाते, तसेच स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून गणल्या जाणाऱ्या पंचायतींचे सरपंच, उपसरपंच आणि पंचांनाही मानधन दिले जाते. मात्र, गोव्यातील सरपंच, उपसरपंच, पंच यांना गेल्या 10 महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. खरे तर 10 महिने मानधन मिळाले नसतानाही या पंचांनी ‘उ’ की ‘चू’ केले नव्हते. हे पंच ज्यावेळी गावातील विकासकामांच्या फाईल्स तालुका स्तरावर किंवा राजधानी पणजीत मंजुरीसाठी घेऊन जातात किंवा अन्य काही विकासकामांच्या पाठपुराव्यासाठी प्रवास वगैरे करतात, त्यासाठी तरी त्यांना मानधन वेळेत मिळायला हवे. ते बिचारे सध्या पदरमोड करून ही कामे करत आहेत. यावर एकाने मार्मिक प्रतिक्रियाही व्यक्त केली आहे. ‘खासदार, आमदारांचे मानधन कधी थकल्याचे ऐकिवात आलेले नाही’, अशी ती प्रतिक्रिया होती. आता तर या मानधनावर समय मर्यादेची टांगती तलवार

आली आहे. कारण १४ जून रोजी राज्यातील पंचायतींची मुदत संपणार असून त्यानंतर प्रशासनाने ‘हात’ वर केले, तर मात्र ‘तेलही गेले, तुपही गेले’ अशी अवस्था या पंचांची होणार आहे. बा... देवा महाराजा, सोडव या पंचांना संकटातून... ∙∙∙

गोव्यात होणार काँग्रेसचे चिंतन

राजस्थानमधील उदयपूर येथे पार पडलेल्या चिंतन बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीची रणनिती निश्चित करणे स्वाभाविकच होते. कारण हल्लीच्या निवडणुकीत त्या पक्षाला सतत पराभवाचाच सामना करावा लागला होता. या चिंतन बैठकीत सहभागी झालेल्या स्थानिक नेत्यांना म्हणे श्रेष्ठींनी राज्य स्तरावर असे चिंतन शिबिर आयोजित करून कार्यकर्त्यांना कार्यप्रवण करण्याचा कानमंत्र दिला आहे, पण त्याने काही साध्य होणार का? असा प्रश्न स्थानिक नेते करत आहेत. कारण उदयपूरमधील बैठकीतही ही दुफळी दिसून आली. गोव्यात खरेच असे चिंतन झाले, तर त्याला तरी मडगावचे बाबा उपस्थित रहातील? ∙∙∙

म्हापसा पोलिसांना उशिराने जाग!

प्रत्येक शनिवारी पोलिस उपअधीक्षकांनी स्वत:च्या कार्यालयांतून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यानुसार नागरिकांना न्याय मिळवून देण्यात यावा यासाठी ‘समाधान’ हा विशेष कार्यक्रम राबवण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. त्या अनुषंगाने गेल्या शनिवारी म्हापसा पोलिस स्थानकात उपअधीक्षकांच्या अनुपस्थितीत पोलिस निरीक्षक परेश नाईक यांनी तसा जनतेचा ‘दरबार’ भरवला. त्यावेळी शहरातील बेकायदा गोष्टींवर विशेष चर्चा झाली. तसे बघायला गेलो, तर नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी दर मंगळवार हा दिवस तसा अगोदरच ‘राखीव’ होताच. तरीसुद्धा म्हापसा पोलिस स्थानक त्याबाबत टाळाटाळ करीतच होते. पदाचा नव्यानेच ताबा घेतल्यानंतर पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी आता दर शनिवार हा दिवस नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी जाहीर केला आहे. त्यामुळे एकंदरीत राज्यभरातील नागरिकांकडून त्या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. काही का असेना, याबाबत म्हापसा पोलिस स्थानकाला आता खूपच उशिरा का होईना जाग आलेली आहे, अशी चर्चा म्हापसा शहरात होताना दिसते. ∙∙∙

पात्रांवाची धमाल...

फोंड्याचे पात्रांव सध्या धमाल उडवित आहेत. त्यांची विधाने अंर्तमुख करणारी ठरत आहेत. तसे पात्रांव म्हणजे बिनधास्त व्यक्तिमत्व. कोणालाही न भिता निर्णय घेणारे असे हे व्यक्तिमत्व. याच्या पूर्वीही त्यांनी याचा प्रत्यय चर्चिल, बाबुश, मिकी सारख्या दिग्गज राजकारण्यांना आणून दिला आहेच. आता हल्ली त्यांच्या विधानांची चर्चा होताना दिसत आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी 850 रुपयांच्या बाटलीतले पाणी प्यायले हे त्यांचे विधान तर ‘गल्ली पासून दिल्लीपर्यंत’ पोहचले आहे. त्याचे पडसाद संपूर्ण भारतभर उमटत आहेत.

यापूर्वी त्यांनी भाजप प्रवेशावेळी सरकारकडे ‘विटामीन एम’ नाही, पण मुख्यमंत्र्याकडे मात्र आहे असे विधान करून खळबळ उडवून दिली होती. आता परत त्याचाच प्रत्यय अमित शहांच्या 850 रुपयांच्या पाण्यामुळे येत आहे. 850 रुपयांचे पाणी असते तरी कसे याचा अनुभव घेण्याकरिता काहीजण इच्छूकही आहेत. म्हापशाहून हे पाणी आणले असे सांगितल्यामुळे हे पाणी म्हापशात मिळते कोठे याचा शोध काही लोक घेताना दिसत आहेत. त्याचबरोबर पात्रांवाच्या या बिनधास्त वृत्तीचे कौतुकही भरपूर होत आहे. ‘आ देखे जरा किसमें कितना है दम’ असे तर पात्रांवाना जगाला दाखवायचे नसेल ना अशीही चर्चा सुरू आहे. आता खरे काय आणि दिखाऊ काय हे पात्रांवच जाणे हेच खरे. ∙∙∙

कन्नडिंग उमेदवारांचे राजकारण

पंचायत निवडणुकीसाठी केवळ कन्नडिंग उमेदवारांना पाठिंबा देणाऱ्या कन्नड महासंघाच्या वक्त्यांमुळे फोंड्यात गदारोळ उठला आहे. फोंडा मतदारसंघात कन्नड लोकांची लक्षणीय संख्या असल्यामुळे फोंड्यातील कुर्टी, खांडेपार पंचायतीच्या राजकारणावर ते प्रभाव पाडू शकतात असा होरा व्यक्त होत आहे. पुढील वर्षी होणाऱ्या फोंडा नगरपालिका निवडणुकीतही ते आपले उमेदवार रिंगणात उतरू शकतात अशीही शक्यता व्यक्त होत आहे. आज पंचायत, उद्या नगरपालिका, तर परवा विधानसभा असा त्यांचा प्रवास होऊ शकतो. असाही तर्क केला जात आहे. काही राजकारण्यांनी आपल्या भल्याकरता आणलेले हे परप्रांतीय उद्या या राजकारण्यांच्या डोक्यावर पाय तर देणार नाही ना? अशी चर्चा मात्र सुरू आहे. ∙∙∙

इच्छुकांच्या जीवाची घालमेल...

पंचायत निवडणूक जसजशी पुढे ढकलली जात आहे, तसतशी इच्छुक उमेदवारांच्या मनाची घालमेल सुरू झाली आहे. आता पुढील तीन महिने पावसाचे आहेत. त्यामुळे भर पावसात सरकार पंचायत निवडणूक घेईल काय, या विवंचनेत इच्छुक उमेदवार आहेत. आता पावसाळ्यात निवडणूक घेतली आणि समर्थक मतदार जर घराबाहेर पडलेच नाहीत, तर भलताच रिझल्ट लागायचा. कारण काहीजणांनी तर फार पूर्वीच या निवडणुकीची तयारी केली आहे. सांगायचे म्हणजे सध्या गुढग्याला बाशिंग बांधून नवरे तयार आहेत, फक्त मुहुर्त तेवढा जाहीर करायचा बाकी आहे.∙∙∙

सावियो बनले भाजपचे प्रवक्ते!

‘जब भगवान देता है तो छप्पर फाड के देता है’ असे म्हणतात. मात्र, ते सगळ्यांच्या बाबतीत होत नाही. काही नशीबवान असतात त्यांना काम न करताही पद व मान सन्मान मिळतो. त्यातील एक म्हणजे सावियो रॉड्रीगीश. आता हे कोण? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.

सावियो हे गोव्यातील भाजपाचे एक प्रमुख नेते आहेत हे कदाचित भाजपावाल्यांनाही माहीत नसावे. हे भाजप समर्थक राष्ट्रीय न्यूज चॅनेलवर डिबेटमध्ये सातत्याने दिसतात. तसे त्यांचे गोव्यात भाजपासाठी काय कार्य आहे हे सदानंद तानावडे जाणोत. सावियो भाजपाचे वेळ्ळी मतदारसंघात उमेदवार होते, त्यांची जमानत जप्त झाली तो भाग वेगळा. मात्र, याच सावियोना आता भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी प्रवक्ता म्हणून नेमणूक केली आहे. त्यामुळे आता जो कष्ट करतो त्याला पेज आणि झोपतो त्याला शीत? असा प्रश्न भाजपचेच कार्यकर्ते विचारीत आहेत.∙∙∙

सोनारानेच टोचले कान

ही म्हण नेमकी कशी जन्मली ते कळत नाही, पण सोनाराने कान टोचले तर ते दुखत नाहीत अन्य कोणी टोचले तर वेदना होतात असे म्हटले जाते. पण येथे मुद्दा वेगळाच आहे. गोव्यात दरवर्षी हजारो विद्यार्थी आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण करतात, पण त्या प्रशिक्षणाच्या बळावर स्वतःचा व्यवसाय करणारे कमी असतात. त्यामुळे शेजारी वा अन्य राज्यातील तरुण येथे बस्तान मांडतात अशी जी खंत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे ती वस्तुस्थितीदर्शक आहे, पण त्याची दखल गोवेकर युवक घेऊन आपली मानसिकता बदलणार का हाच खरा प्रश्न आहे. ∙∙∙

पोलिस पिंक फोर्सला मरगळ

महिलांच्या सुरक्षेसाठी व मदतीसाठी गोवा सरकारने पिंक पोलिस फोर्स सुरू करून सहा महिने उलटत आले तरी त्याचा फारसा परिणाम या फोर्सकडून दिसत नाही. अनेकदा या पोलिस पिंक फोर्सच्या गाड्या एखाद्या झाडाखाली सावलीत उभ्या करून आत बसलेल्या पोलिस महिला मात्र आपली ड्युटी संपण्याची वाट पाहत असतात. ही सेवा राऊंड द क्लॉक (24 तास) असल्याचे सांगण्यात आले होते.

मात्र, या गाड्या रात्रीच्यावेळी पणजी शहरात किंवा किनारपट्टी भागात दिसत नाहीत. या वाहनांवर ड्युटी करण्यासाठी पोलिस खात्याचे महिला कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने दिवसाच त्या सुरू ठेवण्यात आल्या आहेत. सरकारने गाजावाजा करून ही महिला पिंक फोर्स सेवा सुरू केली. मात्र, ही सेवा देण्यासाठी सध्या महिला पोलिसच कमी पडत आहेत. ही वाहने चालवण्यासाठी महिला चालक नाहीत. इच्छुक महिला पोलिसांना त्याचे प्रशिक्षण दिले जाईल किंवा ज्या वाहने चालवतात त्यांची ऐच्छिक नियुक्ती करण्यात असे सांगण्यात आले होते मात्र सध्या या चोवीस तास सेवेमुळे कोणीही पुढे येऊ इच्छित नसल्याने या सेवेचा बोजवारा उडाला आहे.

‘त्यांच्या’ व्यथा जरा कानावर घ्या!

गरीब व ज्येष्ठांची हाय चुकूनही घेऊ नये हे आपल्या मायबाप सरकारला का समजत नाही? सरकारने ज्येष्ठ नागरिक, अपंग व विधवांना मदतीचा हात म्हणून प्रत्येक महिन्याला दोन हजार रुपयांची मदत निधी सुरू केला होता. मात्र, गेल्या पाच महिन्यांपासून ही मदत त्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. लाभार्थी ज्येष्ठ नागरिक रोज बॅंकेत जाऊन पैसे जमा झाले का असे विचारत आहेत. काही ज्येष्ठ नागरिक याच सरकारी निधीवर निर्भर आहेत. सरकारने इतर कुठेही कात्री लावावी, पैसे नसल्यास आमदारांचा वेतन रोखून ठेवावे, पण त्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी चर्चा सध्या सर्वत्र लोक करू लागले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT