पणजी: पणजी येथील पाटो परिसरातील पासपोर्ट भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने शहराज एकच खळबळ उडाली. पाटो येथील जीएसआयडीसी (GSIDC) इमारतीजवळ असलेल्या पासपोर्ट कार्यालयाला एका निनावी ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस दल आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून संपूर्ण परिसरात कडक बंदोबस्त करण्यात आला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पासपोर्ट (Passport) भवनाच्या ईमेल आयडीवर एक संदेश प्राप्त झाला. या ईमेलमध्ये अत्यंत आक्षेपार्ह मजकूर असून इमारत उडवून देण्याचा इशारा देण्यात आला. पासपोर्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्वरित स्थानिक पोलिसांना याची कल्पना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पणजी पोलीस स्थानकाचे पथक आणि पणजी अग्निशमन दलाचे जवान काही मिनिटांतच घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेच्या कारणास्तव तातडीने इमारतीमधील सर्व कर्मचारी आणि नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून संपूर्ण इमारतीची नाकेबंदी करण्यात आली.
सध्या बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (BDDS) तसेच श्वान पथका पाचारण करण्यात आले असून इमारतीच्या प्रत्येक कोपऱ्याची सखोल तपासणी सुरु आहे. पाटो हा पणजीतील (Panaji) अत्यंत गजबजलेला आणि व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाचा भाग असल्याने या धमकीमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आसपासच्या इतर सरकारी कार्यालयांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हा ईमेल कोठून आला आणि त्याचा आयपी (IP) ॲड्रेस काय आहे, याचा शोध सायबर सेलच्या मदतीने घेतला जात आहे. अलीकडच्या काळात देशभरातील अनेक महत्त्वाच्या संस्थांना अशा प्रकारचे धमकीचे ईमेल प्राप्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, गोवा पोलीस या प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहेत.
सध्या तरी प्रत्यक्ष तपासात कोणतेही संशयास्पद साहित्य आढळलेले नाही, मात्र तपास पूर्ण होईपर्यंत इमारतीमध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाहीये. हा केवळ अफवा पसरवण्याचा प्रयत्न होता की यामागे काही मोठे षडयंत्र आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. या घटनेमुळे पासपोर्ट कार्यालयाचे आजचे सर्व नियोजित कामकाज ठप्प झाले असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.