पणजी: महानगरपालिकेने कचरा प्रकल्पासाठी सुमारे १६–१७ वर्षांपूर्वी बायंगिणी येथे जमीन संपादित केली असली तरी विविध कारणांमुळे येथे कचरा प्रकल्प राबवण्यात यश आलेले नाही. कचरा व्यवस्थापन महामंडळ ज्या मंत्रालयाअंतर्गत येते त्याचे मंत्री बाबूश मोन्सेरात असूनही आपल्या मंत्रिपदाच्या काळात हा प्रकल्प त्यांना मार्गी लावता आलेला नाही. त्यामुळे या प्रकल्पाचे अस्तित्वच धोक्यात असून त्यावर नगरमंडळही ‘ब्र’ शब्द काढत नसल्याचे दिसून येते.
तिसवाडी तालुक्यातील कदंब पठारावर बायंगिणी येथे वैज्ञानिक घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनर्निर्माण अभियान (जेएनएनयूआरएम) योजनेनुसार जागा अधिगृहीत केली गेली.
परंतु प्रकल्पाला जसा विलंब होत गेला तसा जुने गोवा पंचायतीने या परिसरात मेगा गृहनिर्माण प्रकल्पांना आणि इमारतींना परवानग्या दिल्याने मागील काही वर्षांत या ठिकाणी इमारतींचे जाळे उभे राहिले आहे.
याठिकाणी उभारलेल्या इमारतीतील नागरिक आणि हा प्रकल्प ज्या कुंभारजुवे मतदारसंघात येतो त्या मतदारसंघाचे आमदार राजेश फळदेसाई यांनी या प्रकल्पाला सुरुवातीपासून विरोध दर्शवला आहे. प्रकल्प उभारणीसाठी येणाऱ्या वाहनासमोर “आपण आडवे झोपू” असे सांगत त्यांनी या प्रकल्पाविरोधात रणशिंग फुंकले आहे.
तत्पूर्वी कचरा व्यवस्थापन महामंडळ सांभाळणारे माजी मंत्री मायकल लोबो यांनी हा प्रकल्प पुढे नेण्याचे ठरविले होते. पण त्यांनाही यश आले नाही, उलट या प्रकल्पाचे भविष्य अंधारमय बनत गेले.
महानगरपालिका कार्यक्षेत्रात दररोज ३५ टनाहून अधिक कचरा निर्माण होतो. यातील कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला आणि सुका वेगळा केला जातो. १६ प्रकारच्या कचरा वर्गीकरणामुळेच महानगरपालिकेला राष्ट्रीय स्तरावर बक्षीसही मिळाले.
परंतु महानगरपालिकेला स्वतःचा कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारता आलेला नाही, हे अपयश आहे. सुरुवातीला प्रकल्पासाठी निधीचा अभाव होता, पण त्यानंतर या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध झाला, तीनवेळा निविदा प्रक्रिया करण्यात आल्या, मात्र हा प्रकल्प शितपेटीत पडून राहिला आहे.
साळगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात महानगरपालिकेचा कचरा स्वीकारण्यास बंद केल्यास काय परिणाम होतो, हे पणजीकरांनी अनुभवलेले आहे. महानगरपालिकेचा सुमारे २५० मे. टन कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारला असता तर किमान तिसवाडीसह बाजूच्या तालुक्यातील कचरा प्रक्रियेचा प्रश्न नक्कीच सुटला असता.
या प्रकल्पात घनकचरा व्यवस्थापन सुविधेत मटेरियल रिकव्हरी सुविधा, बायो-मिथेनेशन सिस्टम, इन-व्हेसल कंपोस्टिंग आणि इंजिनिअर्ड सॅनिटरी लँडफिल सुविधा यांचा समावेश असेल. तसेच या ठिकाणी प्रवाहांमधून पुनर्वापरयोग्य वस्तू, कंपोस्ट आणि वीज पुनर्प्राप्त करण्याचे उद्देश होते.
बायंगिणीचा कचरा प्रकल्प व्हावा, यासाठी मागील पाच वर्षांत काहीच प्रयत्न झाले नाहीत. या प्रकल्पाची गरजच महानगरपालिकेला नाही, असे आता दिसू लागले आहे. स्वमालिकीची प्रकल्पासाठी जागा असूनही आणि सर्व मंजुरी मिळूनही प्रकल्प पुढे जात नाही, अशी स्थिती आहे. महानगरपालिकेच्या बैठकांमध्ये या प्रकल्पाविषयी अजिबात चर्चाही होत नाही किंवा एकमुखी प्रकल्प पुढे नेण्यासाठी मंत्र्यांकडे मागणीही करताना दिसलेले नाहीत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.