Khari Kujbuj Dainik Gomantak
गोवा

Goa politics: खरी कुजबुज; युरी उत्पलची मैत्री?

Khari Kujbuj: काणकोणमधील ‘अभंग रिपोस्ट’ हा कार्यक्रम एस.के.डिकोरेस्टर्स या कुंकळ्ळीमधील एका आयोजकांनी आयोजन केला.मात्र, त्यांचे पासेस व तिकीटांसबंधी मंत्री रमेश तवडकर व कार्यकर्ते यांना फोन जाऊ लागले.

गोमन्तक डिजिटल टीम

युरी उत्पलची मैत्री?

पणजी महानगरपालिकेच्या निवडणुकीत बाबुश मोन्सेरात गटाला शह देण्यासाठी कॉंग्रेस व भाजपमधील उत्पल पर्रीकर गट एकत्र येणार का, हीच चर्चा सध्या होताना दिसत आहे. गरज पडली तर कॉंग्रेसशीही युती करू असे उत्पलचे म्हणणे असल्याचे चर्चेत आहे. त्याच बरोबर कॉंग्रेसचे विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनीही उत्पल गटाला पाठिंबा देण्याची इच्छा व्यक्त केल्याचे कळते. वरवर पाहता हे साध्य होईल, असे दिसते. पण उत्पलबाब कॉंग्रेसची तत्वे स्वीकारतील का हा प्रश्न आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर भविष्यातही उत्पलबाब कॉंग्रेसबरोबर राहणार का? हे प्रश्न गोमंतकीयांच्या खास करून पणजीकरांच्या मानत घोळत आहेत. एक मात्र खरे कॉंग्रेसवाले भाजपात जातात व भाजप त्यांना स्वीकारतो. मग भाजपवाल्यांनी कॉंग्रेसला पाठिंबा का देऊ नये? हे साधेसुधे ‘लॉजिक’ आहे नाही का?. ∙∙∙

‘अभंग रिपोस्ट’ची बात

कला व संस्कृती मंत्री रमेश तवडकर यांना ‘अभंग रिपोस्ट’चा ठसका लागला आहे. सार्वेडचे माजी मंत्री नीलेश काब्राल यांनी स्वबळावर खनिज व्यवसाय अधिकृतरित्या चालू नसताना ‘अभंग रिपोस्ट’ हा कार्यक्रम आयोजित केला. काणकोणमधील ‘अभंग रिपोस्ट’ हा कार्यक्रम एस.के.डिकोरेस्टर्स या कुंकळ्ळीमधील एका आयोजकांनी आयोजन केला.मात्र, त्यांचे पासेस व तिकीटांसबंधी मंत्री रमेश तवडकर व कार्यकर्ते यांना फोन जाऊ लागले. मात्र, लागलीच त्यांनी लवकरच हा कार्यक्रम पुन्हा ‘विना तिकीट’ आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगून तिकीटासाठी मनधरणी करणाऱ्यांचा मार्ग मोकळा केला. त्यांनी स्वतः शनिवारी या कार्यक्रमाला हजेरी लावून हा कार्यक्रम १६ फेब्रुवारीला श्री मल्लिकार्जुन देवालयाच्या मोकळ्या जागेत विनामूल्य आयोजित करणार असल्याचे जाहीर केले. ∙∙∙

तपासणी नाके कशासाठी?

गोव्यात मोले, चोर्ला, पत्रादेवी, पोळेत तपासणी नाके कार्यरत आहेत, असा सर्वसामान्यांचा समज आहे. परंतु प्रत्यक्षात ते कार्यरत आहेत का? असा प्रश्‍नही आहे. कारण गोव्यातून अनेक वेळा मोठ्या प्रमाणात मद्यसाठा शेजारील महाराष्ट्र, कर्नाटकात पोचविला जातो. काही वेळेला तेथील पोलिसांकडून तो साठा जप्त केला जातो. तेव्हा येतील तपासणी नाके कार्यरत नसल्याचे जाणवते किंवा येथील तपासणी नाक्यावर हात ओले करून मद्य भरलेली वाहने भरधाव वेगाने निघतात. काल बेळगाव शहरात गोवा बनावटीचे ३८ लाखाचे मद्य जप्त करण्यात आले. त्यात एका गोव्यातील एक मद्य तस्करही सहभागी आहे. २६ लाखाचे मद्य व ट्रक बेळगाव पोलिस जप्त करू शकतात, तर मग गोव्यात तपासणी नाक्यावर बसलेले कर्मचारी काय फुकटा पगार खात बसतात. अशा प्रकारचे तपासणी नाके हवेत कशाला? असा प्रश्‍न सर्वसामान्य गोमंतकीय करत आहेत. ∙∙∙

फोंड्यात भाजपचे सर्वेक्षण ?

पोटनिवडणुकीच्या तोंडावर भाजपने फोंडा मतदारसंघात उमेदवारी बाबत सर्वेक्षण केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. भाजपचे हे एक बरं असतं, ते सगळी चाचपणी करून निर्णय घेत असतात. आता या सर्वेक्षणातून काय निघाले हे कळायला मार्ग नसला तरी काहीही होऊ शकते, अशी सध्या स्थिती आहे. दिवंगत रवी नाईक पुत्र रितेश व रॉयबरोबर भाजपचे दक्षिण गोव्याचे सचिव विश्वनाथ दळवी यांची नावे भाजपच्या उमेदवारीसाठी चर्चेत असली तरी सर्वेक्षणानंतर या गोष्टीला ‘सरप्राईज ट्विस्ट’ मिळू शकतो असेही बोलले जात आहे. ‘मगो’चा राजीनामा देऊनही कुर्टी झेडपीत अपक्ष उमेदवार रिंगणात उतरवून आपले वर्चस्व सिद्ध करणाऱ्या केतन भाटीकरांचे आव्हान समोर असल्यामुळे भाजप या पोटनिवडणुकीत ताकही फुंकून पिणार हे निश्चित आहे. त्यामुळे उमेदवाराची जिंकण्याची क्षमता महत्त्वाची ठरणार यात शंकाच नाही. आता भाजपच्या कोणत्या उमेदवाराची जिंकण्याची क्षमता जास्त ठरू शकते, यावर सध्या फोंड्यात चर्चा सुरू झाली आहे. शेवटी ‘जो जिता वही सिकंदर’ असतो हेच खरे नाही का? मात्र भाजपचा तो संभाव्य ‘सिकंदर’ सध्या रहस्य बनत चालला आहे, एवढे मात्र निश्चित. ∙∙∙

अशी ही नीलेश काब्रालवरील निष्ठा!

जशी ईश्वर निष्ठा असते तशीच काही कार्यकर्त्यांची आपल्या नेत्याबद्दल निष्ठा असते. काल कुडचडेचे युवा नेते रोहन गावस देसाईंचा वाढदिवस होता. रोहनच्या समर्थकांनी २४ तास विविध उपक्रम राबवून आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा केला. काही समर्थकांनी वर्तमानपत्रात जाहिरातीही दिल्या. आता एखाद्याच्या राजकारण्याच्या वाढदिवसाची वर्तमानपत्रात शुभेच्छा जाहिरात दिली तर इतर राजकीय नेत्यांना वाईट वाटण्याचे कारण नाही. मात्र, रोहनच्या वाढदिनी जाहिरात दिली तर नीलेश काब्राल यांना वाईट वाटणार व ते रागावणार म्हणून रोहनच्या काही मित्रांनी जाहीर शुभेच्छा देण्याचे टाळले. शेल्डे येथील देवस्थान समितीने ही वाढदिवसाची जाहिरात दिली होती. मात्र, या जाहिरातीत देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षांचे नाव नव्हते. कोषाध्यक्षांची पत्नी सरपंच आहे आणि जाहिरात दिली तर काब्राल पत्नीची खुर्ची काढणार, या भीतीने बिचाऱ्याने कदाचित जाहिरातीत आपले नाव न छापण्यास सांगितले असावे, असे आम्ही नव्हे लोक म्हणतात. खरे खोटे सरपंच मॅडमचा पती जाणे. ∙∙∙

मडगाव पालिका निवडणुकीची उत्सुकता

जिल्हा पंचायत निवडणुका झाल्यानंतर आता मार्च किंवा एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकांचे पडघम वाजायला सुरवात झाली आहे. पणजी महानगरपालिके नंतर मडगाव नगरपालिकेच्या निवडणुकीबद्दलही उत्सुकता लोकांमध्ये निर्माण झाली आहे. मडगाव पालिकेची निवडणूक नेमक्या कोणत्या पक्षांमध्ये होईल या बद्दलही उत्सुकता आहेच. मंत्री दिगंबरबाबचा भाजप गट आहेच. शिवाय दिगंबरबाब विरोधातील भाजप गटही निवडणुकीत उतरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दुसऱ्या बाजूने कॉंग्रेसचे ‘एकला चलो’ असेल, की विजयबाबच्या गोवा फॉरवर्डकडे युती करून ते मडगावात निवडणुका लढवतील, याबद्दलही उत्सुकता आहेच की! ∙∙∙

डॉक्टर बनण्यासाठी त्यांनी राष्ट्रीयत्व बदलले!

‘कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है’ असे म्हणतात ते खरे. सामान्य गटातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागतात. या जीवघेण्या स्पर्धेत जो ‘नीट’ प्रवेश परीक्षेत चांगला रँक घेतो, त्यालाच प्रवेश मिळतो. अनुसूचित जाती व जमाती तसेच ओबीसी, ‘इडब्ल्यूएस’ साठी ही स्पर्धा सोपी असते.ज्यांच्याकडे पैसा असतो, अशा पालकांच्या पाल्यांनाही डॉक्टर बनणे सोपे झाले आहे. वैद्यकीय महाविद्यालयात ‘एनआरआय’ म्हणजे विदेशी नागरिकत्व स्वीकारलेल्या भारतीय वंशाच्या मुलांसाठी काही जागा रिक्त असतात मात्र, त्या जागेसाठी जास्त पैसे मोजावे लागतात. यंदाच्या वर्षी ‘एनआरआय’ कोट्यातून वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आठशे पालकांनी आपले राष्ट्रीयत्व बदलून विदेशी केले किंवा विदेशी नागरिकत्व स्वीकारलेल्या आपल्या नात्यातील ‘एनआरआय’कडून मुलांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळविला. याचा अर्थ ज्यांच्याकडे पैसा आहे किंवा राखीवता आहे त्यांना डॉक्टर होणे सोपे आहे, असा झाला नाही का? ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: दर्शन - अर्जुन तेंडुलकरची झुंज अपयशी! गोव्याच्या फलंदाजांची शरणागती; केरळ 9 विकेट राखून विजयी

Chorla Ghat Robbery: 400 कोटींच्या नोटा असलेला कंटेनर लुटला, मास्टरमाईंड नाशिक पोलिसांच्या ताब्यात; आणखी नावे उघड होण्याची शक्यता

Union Budget 2026: "अर्थसंकल्पात गोमंतकीयांची पार निराशा, युवा वर्ग हताश"! केजरीवालांचे भाजप सरकारवर टीकास्त्र

Dhirio In Goa: गोव्यात हे काय चाललंय? 4 ठिकाणी 'धीरयो' झाल्याची बातमी; सुरावलीत बैल उधळून एक जखमी झाल्याची चर्चा

घोगळ खून प्रकरणी मोठी कारवाई! हलगर्जीपणामुळे पोलिस निरीक्षकाची बदली, एएसआय निलंबित; संशयिताने दिली साक्षीदारांना धमकी

SCROLL FOR NEXT