Goa Politics: खरी कुजबुज; सरकारी शाळा फुलणार ?

Khari Kujbuj Political Satire: अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेटये यांनी आपण पुढील विधानसभा निवडणूक भाजपच्या उमेदवारीवर लढवणार असल्याचे जाहीर केले.
Khari Kujbuj Political Satire
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

सरकारी शाळा फुलणार ?

‘मुले ही देवा घरची फुले’ असे म्हटले जाते. या फुलांना सतत टवटवीत राखणाऱ्या शिक्षकांची गरज असते. गेल्या काही वर्षांपासून सरकारी शाळा बंद पडायला लागल्या आहेत. एक शिक्षकी शाळेतील एकाच शिक्षिकेला चार चार वर्ग दिल्यामुळे, मुलांना शिकण्यास त्रास होतो. या सरकारी शाळांची ही स्थिती पाहून अनेक पालकांनी आपल्या मुलांना शाळेतून काढले. याचा परिणाम म्हणजे अनेक सरकारी प्राथमिक शाळा बंद पडल्या. आता सरकार म्हणे जवळ जवळ चारशे प्राथमिक शिक्षकांना सेवेत रुजू करून घेणार आहे. यासाठी सरकारने जाहिरात दिली आहे. आता हे सर्व नवीन शाळा शिक्षक सरकारी सेवेत कायम झाल्यावर मराठी व कोकणी प्राथमिक शाळांची स्थिती सुधारणार असे स्वप्न पाहण्यात काही हरकत नाही. ∙∙∙

डिचोलीतील खदखद

अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेटये यांनी आपण पुढील विधानसभा निवडणूक भाजपच्या उमेदवारीवर लढवणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर भाजपच्या डिचोलीतील कार्यकर्त्यांत मोठी चर्चा सुरू झाली आहे. राजेश पाटणेकर यांनी राजकीय वर्तुळातून बाजूला होण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही जणांनी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. प्रदेशाध्यक्षपदी दामू नाईक आल्यानंतर पक्षासाठी अनेक वर्षे काम करणाऱ्यांना विधानसभा निवडणुकीत संधी मिळेल असे त्यांच्यापैकी अनेकांना वाटत होते. आता शेटये यांनी भाजपमध्ये येणार असल्याचे सांगितल्याने आमचे काय असा प्रश्न निष्ठावंतांना पडला आहे. परंतु दुसऱ्या बाजुला डॉ. शेटये प्रामाणिकपणे झटून कार्य करतात, हे पाहून त्यांच्या ‘पोटात जाळ पडतो’, हेही तेवढेच खरे! ∙∙∙

सुभाष हे आव्हान पेलू शकणार का?

पेय जल व समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई हे तसे ‘ग्रासरुट’वर काम करणारे राजकारणी. त्यांचा मतदारांशी थेट संपर्क असतो, असे असताना गेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत विरोधकांनी सुभाष फळदेसाईना घाम काढला. फळदेसाईचा जिल्हा पंचायत उमेदवार थोड्याशा मतांनी जिंकला. आता पालिका निवडणुका जवळ आल्या आहेत. विद्यमान पालिका मंडळावर सुभाष समर्थकांची सत्ता असली तरी बिगर हिंदू नगरसेवक सुभाषच्या विरोधात आहेत. अशा स्थितीत येणाऱ्या पालिका निवडणुकीत सांगे पालिका भाजपकडे राखण्याचे दिव्य सुभाष फळदेसाईंना करावे लागणार आहे. सुभाष फळदेसाई यांना पराभूत करण्यासाठी सर्व विरोधक एकत्र आले आहेत. हे असेच राहिल्यास सांगे नगरपालिका मंडळावर भाजपाचा झेंडा पुन्हा फडकविण्याचे कठीण आव्हान सुभाष समोर आहे. विरोधकांनी उभे केलेले आव्हान सुभाष पेलू शकणार का? ∙∙∙

फिदोलची आंदोलने!

सध्‍या गोव्‍यात ‘इनाफ इज इनाफ’ आंदोलनाचे वारे सगळीकडे एवढे नेटाने पसरले आहे, की प्रत्‍येकात एक प्रकारचा आंदोलक तयार झाला आहे. सामान्‍यांची जर अशी स्‍थिती तर जे स्‍वत: आंदोलक आहेत, त्‍यांची स्‍थिती कशी असेल बरे! हे जण जाणून घ्‍यायचे असेल तर मुद्दामहून सासष्‍टीला भेट द्या. सासष्‍टीत आता गावागावांत आंदोलने होणार आहेत आणि आंदोलकांचेही पीक वारेमाप गतीने उभे राहणार आहे. अशाच प्रकारची एक आंदोलक म्‍हणजे, फिदोल ह्या. नुवे भागात एक मेगा प्रकल्‍प उभा होतो, म्‍हणून सध्‍या फिदोल रस्‍त्‍यावर उतरल्‍या आहेत. काल त्‍यांनी नुवे येथे इतर आंदोलकांच्‍या बरोबर निदर्शनेही केली. यापूर्वी सुभाष वेलिंगकर यांना अटक करा, अशी मागणी घेऊन रस्‍त्‍यावर उतरलेल्‍या फिदोल व त्‍यांच्‍या साथीदारांना अंगावर वळ येईपर्यंत पोलिसांच्‍या सोट्यांचा मार खावा लागला होता. त्‍यावेळी त्‍यांचे अंग काळेनिळे पडले होते. तरीही फिदोल मागे हटलेल्‍या नाहीत. फिदोल यांना म्‍हणे, नुवेतून विधानसभा निवडणूक लढवायची आहे आणि निवडणुकीपर्यंत जाण्‍यासाठी ही आंदोलने हा एकमेव मार्ग असे त्‍यांना वाटल्‍यास नवल ते काय? ∙∙∙

विनय तेंडुलकरांचे कम बॅक?

सावर्डे मतदारसंघातून माजी खासदार विनय तेंडुलकर विधानसभेत पुनरागमन करू शकतात अशी चर्चा आहे. तेंडुलकर हे अनेक वर्षे खडपाबांध फोंडा येथे राहत होते. आता ते विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दाभाळ या मूळ गावी राहण्यास गेले आहे. त्यांनी आपला पद्धतशीर जनसंपर्क वाढवणे सुरू केले आहे. पक्षाच्या कामात प्रदेश पातळीवर ते हिरीरीने सहभागी होत असतात. पणजीतील पक्ष कार्यालयातील फेरी कधी ते चुकवत नाहीत. त्यामुळे सावर्डेत उमेदवारीसाठी अनेक दावेदार असले तरी मुत्सद्दीगिरीतून तेंडुलकर उमेदवारी मिळवतील असे काही जणांना वाटते. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: "डबल इंजिन सरकारला आणखी गती द्या"! राष्ट्रीय अध्‍यक्ष नितीन नवीन यांचे कार्यकर्त्यांना स्फूर्तिदायी आवाहन

कांदोळकरांवर लक्ष

जिल्हा पंचायत निवडणुकीत ताकद दाखवल्यानंतर माजी आमदार किरण कांदोळकर यांचा पुढील पवित्रा काय असेल याकडे अनेकांचे लक्ष आहे. विशेषतः थिवीचे विद्यमान आमदार व मंत्री नीळकंठ हळर्णकर यांना ते शह देतील कायय़ याविषयी विशेष उत्सुकता आहे. कांदोळकर यांनी तृणमूल कॉंग्रेसला रामराम ठोकल्यानंतर अन्य कोणत्याही पक्षाचा हात धरलेला नाही. त्यामुळे ते अपक्षच लढतील की अन्य काही पर्यायांचा विचार करतील हे समजून येत नाही. त्यांचा एक मार्गदर्शक आहे. तो त्यांना योग्य मार्ग दाखवेल, असे बोलले जात आहे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: नितीन नवीन भाजपचे 'बिग बॉस', मुख्यमंत्री सांवतांकडून कौतुकाचा वर्षाव; आगामी निवडणुका जिंकण्याचा केला निर्धार

प्रशासनाला आली जाग

शिरगाव येथील श्री देवी लईराई जत्रोत्सवात गेल्या वर्षी चेंगराचेंगरी झाली. भक्तांना विनाकारण जीव गमवावे लागले. त्याला कोण कारणीभूत यावर सरकारी पातळीवर मौन बाळगले आहे. या प्रकरणी बदलीची कारवाई झालेल्यांना आता बढतीची बक्षिसी मिळाल्याने सरकार या प्रकरणी गंभीर नाही हेही दिसून येते. आता जत्रा जवळ आल्याने प्रशासनाला जाग आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सुरक्षितेच्या उपाययोजनांची उजळणी करण्यासाठी बैठका घेणे सुरू केले आहे. त्यातून काय निष्पन्न होईल, हे लवकरच समजणार आहे. मात्र प्रशासनाला वर्षभरानंतर तरी जाग आली, हेही नसे थोडके! ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com