सभापती रमेश तवडकर व कला-संस्कृतीमंत्री गोविंद गावडे या भाजप सरकारमधील दोन नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून संघर्ष उफाळून आला आहे. ‘राजकारणात ठोशास ठोसा देण्याची गरज आहे. संत राहून चालत नाही.
पायाला मुंगी चावली तर प्रसंगी तिला चिरडावेही लागते’ असे वक्तव्य करून तवडकर यांनी आज पुन्हा एकदा अप्रत्यक्षरीत्या गावडेंवर निशाणा साधला. त्यामुळे हा वाद आणखी उफाळण्याची शक्यता आहे.
एखाद्या खात्याकडून मतदारसंघांमध्ये विकास करताना योजना समतोलपणे राबवायला पाहिजेत. मी सभापती असूनही मला माझ्या मतदारसंघात काही योजना राबविताना काहीसे दुर्लक्ष झाले. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. ‘श्रमधाम’ योजनेतून निराधार व गरजू कुटुंबांना घर बांधून देण्यात येते.
काणकोणातून सुरू झालेला हा उपक्रम आता सांगे, केपे, सावर्डे, धारबांदोडा व प्रियोळपर्यंत पोहोचला आहे. समाजाच्या कार्यकर्त्यांनी प्रियोळमधून ज्या निराधार कुटुंबांची माहिती दिली, त्यानुसार योजना राबविण्यात आली आहे. त्यासाठी स्थानिक आमदाराला विश्वासात घेण्याची गरज नाही, असे तवडकर यांनी ठासून सांगितले.
केंद्राकडून आदिवासी समाजासाठी आदिवासी कल्याण खात्याकडे येणाऱ्या निधीचा विनियोग पुरेसा होत नाही. अनेकदा हा निधी खर्च न होता पडून राहतो किंवा खर्च न केल्याने त्याचा परतावा करावा लागतो. याबाबत तवडकर म्हणाले की, या निधीचा कसा विनियोग करता येईल, यासाठी आदिवासी नेत्यांनी एकत्र बैठक घेऊन विचार करण्याची गरज आहे.
मंत्रिपद मिळाल्यास स्वीकारणार
भाजपचा कार्यकर्ता म्हणून आजपर्यंत पक्षाने जी जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे व निःस्वार्थीपणे पार पाडली आहे. माझ्या कार्यपद्धतीचा पक्षाला फायदा होणार असेल व ज्येष्ठ नेत्यांना मला मंत्रिमंडळाची जबाबदारी द्यायची असेल तर ती मी स्वीकारेन, असा पुनरुच्चार तवडकर यांनी केला.
मंत्री गोविंद गावडे यांच्याशी माझा वैयक्तिक वाद नाही. एकाच समाजाचे असल्याने अनेक वर्षे खांद्याला खांदा लावून समाजासाठी काम केले आहे. मात्र माणूस कधी बदलेल हे सांगता येत नाही. काहींचा स्वभाव असतो.
- रमेश तवडकर, सभापती
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.