Panaji : विष्णू वाघ आणि आमचे वैचारिक मतभेद होते, पण मनभेद कधीच नव्हते. त्याचा मित्र म्हणून मला अभिमान आहे. त्याचे वाचन अफाट होते. आम्ही कोकणी बोलतो तेव्हा मराठीचा प्रभाव किती आहे हे जाणवते पण मराठीत कोकणी शब्द किती गेलेत याचे संशोधन व्हायला हवे.
बाकीबाब बोरकर यांनी कोकणी शब्द मराठीत खेळवले तसे विष्णूनेही. माझ्या पुस्तकाचा अनुवाद त्याने केला होता. माझ्या घरी एकदा आला असता त्याची काव्यवाचन- काव्यगायनाची मैफल मध्यरात्रीपर्यंत रंगली होती, असे सांगत ज्ञानपीठ प्राप्त साहित्यिक दामोदर मावजो यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला.
सोमवारी येथील आयएमबी सभागृहात विष्णू सुर्या वाघ यांच्या जयंतीनिमित्त सम्राट क्लब माशेल, विष्णू सुर्या वाघ प्रतिष्ठान आणि इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा (आयएमबी) यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या विष्णुरुपदर्शन कार्यक्रमात दामोदर मावजो हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते म्हणाले, विष्णू वाघ यांचे अनेक गुण मला भावले.
महाराष्ट्रातील श्रोत्यांना खिळवून ठेवण्याची ताकद त्याच्या वक्तृत्वात होती. गोव्याच्या हिताचे प्रश्न घेऊन त्यांनी पत्रकारिता केली. राजकारणातही आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली. तो शब्दसम्राट होता, सहज शब्द घडवायचा, वाकवायचा. जातीभेदाच्या विरोधात तो वावरला. संघर्षाला तोंड देत लहानाचा मोठा झाला.
यावेळी सन्मानीय पाहुणे म्हणून धेंपे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज कामत व आयएमबी चे अध्यक्ष दशरथ परब तर खास निमंत्रित म्हणून सम्राट इंटरनॅशनल क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष अवीन नाईक, सम्राट माशेलच्या अध्यक्ष अनिता रायकर, विष्णू सुर्या वाघ प्रतिष्ठानचे कार्यकारी अध्यक्ष देविदास आमोणकर, सचिव अरुणा वाघ, कार्यक्रमाच्या संयोजिका काजल चोडणकर उपस्थित होत्या.
शेवटी 'तुका अभंग अभंग एक विद्रोही तुकाराम' या विषयावर डॉ. मनोज कामत यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद झाला. त्यात देविदास आमोणकर, प्रा.कुलदीप कामत व परेश नाईक या वक्त्यांचा सहभाग होता. मान्यवरांच्या भावना
डॉ. मनोज कामत म्हणाले, विष्णू वाघ यांचे अस्तित्व त्यांच्या साहित्यात सतत जाणवते. आपल्या प्रतिभेच्या जोरावर गोव्याच्या साहित्यातील सूर्य ही ओळख त्यांनी निर्माण केली. गोव्याची प्रादेशिकता जपणारा, शब्दाला जागणारा,हाकेला ओ देणारा तो मित्र होता. अहंकाराचा वारा त्याला कधी शिवला नाही.
दशरथ परब यांनी सांगितले की, कवित्व ही विष्णूची शक्ती आणि नाटक हा पंचप्राण होता. तो अकाली गेला हे शल्य आमच्या मनात आहे. अविन नाईक यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. रश्मीना आमोणकर यांनी सूत्रसंचालन केले तर काजल चोडणकर यांनी आभार मानले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.