Pali News : पाळी, देशातील इतर राज्यांपेक्षा गोव्यात पडणारा पुरेसा पाऊस ही खरे तर निसर्गाची देणगी आहे. हे पावसाचे पाणी साठवून ठेवण्याची राज्यात कुठेच तशी यंत्रणा नसल्याने हे वाहून वाया जाणारे पाणी थोपवण्याची आणि त्याच्या पुनर्वापराची आज गरज निर्माण झाली आहे.
पाण्याच्या योग्य नियोजनाबरोबरच सध्या राज्यातील नद्या कोरड्या पडत चालल्याने ती चिंतनीय बाब आहे. खांडेपार नदी तर कधी नव्हे तेवढी उथळ बनत चालली असून एरव्ही भरून वाहणाऱ्या खांडेपार नदीचे पात्र या दिवसांत ठिकठिकाणी कोरडे पडत चालले आहे.
म्हादई आणि खांडेपार नदी या पिण्याच्या पाण्यासाठी गोव्यात जीवनदायिनी ठरल्या आहेत. या दोन्ही नद्यांना बक्कळ पाणी असायचे, पण या दिवसांत खांडेपारसह म्हादई नदीही ठिकठिकाणी कोरडी पडत चालल्याचे दृष्य समोर आले आहे. खांडेपार येथील पूल तसेच वरच्या आणि खालच्या बाजूला ही नदी उथळ बनली असून नदीचे पात्र ओहोटीच्या वेळेला तर पूर्णपणे कोरडे पडलेले असते.
एरव्ही भरतीच्या वेळेला खांडेपार नदीला बक्कळ पाणी असायचे. ओहोटीच्या वेळेला या नदीचे पात्र कुणीच कोरडे पडलेले पाहिले नव्हते, पण आता नदी उथळ बनल्याने आणि पुरेसा पाणी साठा उपलब्ध होत नसल्याने भविष्यात पाण्याची मोठी टंचाई होण्याची भीती पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे.
त्यामुळे पावसाच्या पाण्यावर विसंबून राहण्याची शक्यता पुढील काळात असून पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
खांडेपार नदी कधी नव्हे ती कोरडी पडायला लागल्याने हा प्रकार गंभीर आहे. या नदीच्या पात्रावर ओपा जल प्रकल्प असून नदी पात्र उथळ बनत चालल्याने या प्रकल्पावर विपरित परिणाम होऊ शकतो, म्हणून आधी खांडेपार नदी पात्राचा योग्य अभ्यास करून कारणे शोधली पाहिजेत. त्यासाठी सरकारचा पुढाकार महत्त्वाचा आहे.
- धनराज नाईक
(पर्यावरणप्रेमी, फोंडा)
तज्ज्ञांकडून अभ्यास होण्याची गरज
खांडेपार व पुढे म्हादईचे पात्र कोरडे पडत आहे. तज्ज्ञांकडून या प्रकाराचा अभ्यास होण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकारने तज्ज्ञांची समिती नेमून या प्रकरणाचा अभ्यास करून योग्य अहवाल लोकांपुढे आणण्याची गरज आहे.
कर्नाटक सरकारने म्हादईचे पाणी जबरदस्तीने वळवल्यामुळे त्याचा विपरित परिणाम या नदीच्या पात्रावर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हादईचे पाणी खांडेपार नदीला दूधसागर फाट्यातून मिळत असल्याने या प्रकाराची गंभीर दखल घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
- सूरज गरड, पर्यावरणप्रेमी, तिस्क - पिळये उसगाव
म्हादई नदी वळवल्याचा परिणाम...
कर्नाटकने म्हादई नदीचे बहुतांश पाणी आपल्याकडे वळवल्याने पूर्वीसारखे म्हादई नदीला आता पाणी मिळत नाही. वास्तविक म्हादई नदीचा एक फाटा दूधसागर नदीला जोडला गेला आहे, आणि दूधसागर नदी खांडेपार नदीला भेटत असल्याने हे पाणी कुळे ते खांडेपार व पुढे उसगाव आणि नंतर मांडवी नदीला जाऊन मिळते.
पण आता खांडेपार नदीचे पात्र कोरडे पडत चालल्याने म्हादईवरील कर्नाटकच्या अतिक्रमणामुळेच हा प्रकार घडल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.