Goa, Manali Tops Summer Destination For Domestic Tourist: गोवा आणि पर्यटन हे एक समीकरणच बनले आहे. देशभरातील लोक जेव्हा पर्यटनाला कुठे जायचं असा विचार करत असतात तेव्हा त्यांच्यासमोर गोवा हे नाव असतेच असते.
आताही, त्याची प्रचिती आली आहे. उन्हाळी पर्यटनासाठी देशभरातील पर्यटकांची पहिली पसंती गोवा आणि मनाली याच ठिकाणांना असल्याचे समोर आले आहे. (OYO Summer Vacation index 2023)
हॉटेलमध्ये वास्तव्यासाठी ऑनलाईन बुकिंग सेवा देणाऱ्या ओयो या कंपनीने केलेल्या सर्व्हेक्षणातून ही बाब समोर आली आहे.
OYO च्या 'समर व्हॅकेशन इंडेक्स 2023' मध्ये म्हटले आहे की, कोरोना काळात निर्बंधांमुळे प्रवासावर खूप निर्बंध आले होते. तथापि, कोरोनातून सावरल्यानंतर आता देशांतर्गत प्रवास वाढत चालला आहे.
OYO अॅपद्वारे हे सर्व्हेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात देशभरातील 15,000 लोकांना प्रश्न विचारण्यात आले. ओयोच्या सर्व्हेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी एकूण 92 टक्के लोक देशातील विविध ठिकाणांना भेट देण्याचे नियोजन करत आहेत.
या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, लोकांचे प्राधान्य 1 ते 3 दिवसांच्या मुक्कामासह लहान सहलींना आहे. तसेच पर्यटन स्थळ कोणते आहे, हे देखील पर्यटकांसाठी खूप महत्वाचे असते.
या सर्व्हेक्षणात पर्यटकांनी पर्वतीय प्रदेशांना पर्यटनासाठी सर्वाधिक 30 टक्के पसंती दर्शवली आहे. तर त्या खालोखाल समुद्रकिनाऱ्यांना 26 टक्के मते मिळाली आहेत. ओयोने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे.
ओयोने म्हटले आहे की, "भारताचे आवडते माउंटन डेस्टिनेशन मनाली आहे, त्यानंतर काश्मीर, मॅक्लॉड गंज, उटी आणि कूर्ग आहेत. तर समुद्रकिनाऱ्यांसाठी गोवा हा भारतीयांसाठी पसंतीचा मुख्य पर्याय आहे. एकूण 50 टक्के लोक गोव्यात प्रवास करू इच्छितात.
7 मे ते 14 मे 2023 या काळात हे संशोधन झाले आहे. त्यात म्हटले आहे की, "गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत गोव्यातील हॉटेल्सच्या मागणीत 20 टक्केपेक्षा जास्त वाढ झाली आहे. त्यानंतर अंदमान निकोबार, केरळ, पाँडेचेरी आणि गोकर्णचा समावेश आहे."
मेघालयातील मावलिनॉन्ग आणि अरुणाचल प्रदेशातील झिरो व्हॅली या स्थळांना अनुक्रमे 27 टक्के आणि 23 टक्के मतांसह अव्वल ऑफबीट निवड म्हणून पसंती मिळाली. त्यापाठोपाठ केरळमधील वालियापरंबा या ठिकाणाला 16 टक्के मते मिळाली.
13 टक्के लोकांनी आध्यात्मिक समृद्धीसाठी तीर्थक्षेत्रांना जाण्याची इच्छा व्यक्त केली. एप्रिलच्या उत्तरार्धात चार धाम यात्रा सुरू झाली आहे. केदारनाथ, सर्वोच्च तीर्थक्षेत्र म्हणून उदयास आले असून वैष्णो देवी आणि वाराणसीकडेही पर्यटकांचा ओढा आहे.
आंतरराष्ट्रीय स्थळांमध्ये मालदीवला सर्वाधिक पसंती आहे. त्यासह स्वित्झर्लंड, दुबई, थायलंड आणि इंडोनेशिया या देशांनीही या उन्हाळ्यात भारतीयांसाठी यादीत स्थान मिळाले आहे. बजेटचा विचार करता, 34 टक्के लोकांनी 10,000 रूपयांपेक्षा कमी खर्चातील ट्रिपला प्राधान्य दिले आहे.
दरम्यान, पर्यटनासाठी वाढता ओढा हे पर्यटन आणि आदरातिथ्य उद्योगाच्या वाढीसाठी चांगले लक्षण आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.