राज्यातील अनेक ठिकाणी परप्रांतीयांनी जमिनी व जुनी घरे घेऊन तेथे आपली हुकुमत गाजवण्यास सुरवात केली आहे. काही बाऊन्सर्सना तसेच काही भ्रष्टाचारी पोलिसांना हाताशी धरून स्थानिकांनाच धमकावण्याचे प्रकार सुरू आहेत. पोलिसही अनेकदा तक्रारदार किती वजनदार आहे हे बघूनच पुढील कारवाई करतात. हणजूण किनारी कुटुंबीयाला त्यांच्याच घरात घुसखोरी करून उलट त्यांनाच घराबाहेर काढण्याचा प्रकार घडला. या घटनेबाबत पोलिसांनी सुरवातीला ठोस कारवाईकडे लक्ष दिले नाही. मात्र, जेव्हा हे कुटुंब गोव्याच्याच एका माजी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे नातेवाईक असल्याचे समजले, तेव्हा पोलिस यंत्रणा सक्रिय झाली. या प्रकरणात गुंतलेल्यांची धरपकड झाली. घुसखोरी करणारी व्यक्ती मूळ घरमालकालाच धमकावते म्हणजे गोवा हा दिवसेंदिवस असुरक्षित होऊ लागला आहे. स्थानिकांनाच येथे भीतीने दिवस काढावे लागणार की काय असे वाटू लागले आहे. गोव्यातील बहुतेक व्यवसाय परप्रांतीयांनी व्यापला आहे. गोमंतकीय मात्र नावापुरतेच राहिले आहेत. विविध व्यवसायानिमित्त गोव्यात येऊन या परप्रांतीयांनी गोव्यावर कब्जा करण्यास वेळ लागणार नाही. गोमंतकीयच आता परके होण्याची वेळ आली आहे.
पर्वरी परिसरात उड्डाण पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामामुळे या रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत होताना दिसत आहे. वाहतूक पोलिस वाहतुकीची कोंडी रोखण्यासाठी सर्व ते प्रयत्न करताना दिसतात. मात्र, काही उर्मट वाहनचालक नियमांचे उल्लंघन केल्यास पोलिसांनी रोखल्यानंतर उलट त्यांनाच अरेरावी करण्याचे प्रकार घडत आहेत. पर्वरीत वाहनचालक शॉर्टकट रस्ते अवलंबितात. त्यावेळी पोलिसांनी अडवले, तर पोलिसांवरच दादागिरी करण्याचे प्रकार घडत आहेत. नेहमी पोलिसांनी संयम बाळगून वाहनचालकाशी चांगले वर्तन केले, तरी पोलिसांनाच दोष दिला जातो. पोलिसांना ‘बॉडी कॅमेरा’ दिल्यामुळे आता उर्मट वागणाऱ्या वाहनचालकांनी घातलेला वाद त्यामध्ये चित्रित होऊन त्यांचे पितळ उघडे पडत आहे. एकप्रकारे हा ‘बॉडी कॅमेरा’ वाहतूक पोलिसांसाठी वरदानच ठरला आहे. वाद घालणाऱ्या वाहनचालकाला या ‘बॉडी कॅमेऱ्या’बाबत माहिती नसते. मात्र, जेव्हा त्याला कळते की सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे, त्यावेळी त्याचा पारा आपोआपच उतरतो. पोलिसांशी हुज्जत घालून कामात अडथळा आणल्याबद्दल चालकावर गुन्हाही दाखल करता येतो. ∙∙∙
महाकुंभसाठी झपाट्याने निघालेल्या प्रवाशांमध्ये एक वेगळीच चर्चा रंगली आहे. लोकशाहीत सर्व समान, पण प्रवासाच्या बाबतीत मात्र अजिबात नाही! मेहनती करदात्यांना दाटीवाटीच्या रेल्वे डब्यांतून प्रवास करावा लागतो, तर सत्तेच्या शिखरावर असलेले मंत्री, आमदार आणि त्यांचे कुटुंबीय विमानातून आरामात जातात. राजकीय वर्तुळात एक वाक्य आता जोरात गाजतंय – ‘नेते विमानातून गेले, कार्यकर्ते मात्र रेल्वेत राहिले!’ अनेक कार्यकर्त्यांनी जीव तोडून पक्षासाठी झटावं, प्रचार करावा आणि निष्ठेने सोबत रहावे... पण जेव्हा ऐषआरामाचा प्रश्न येतो, तेव्हा मात्र त्यांच्या वाट्याला गर्दी, उकाडा आणि तासनतास उभा राहून केलेला प्रवास येतो. नेत्यांच्या सत्तेच्या सोयीसुविधा पाहिल्यानंतर कार्यकर्त्यांनी आता नीट विचार करायला हवा. त्यांच्या चार्टर्ड फ्लाईटसाठी कोणी झेंडे उचलायचे आणि कोणी गाडीच्या टपावर चढून प्रवास करायचा? लोकशाहीच्या रंगमंचावर हा खेळ कायम सुरूच राहणार, पण आपण कोणत्या सीटवर बसलोय? हे पाहून आता प्रत्येकाने आपले गणित मांडायला सुरवात केली पाहिजे! ∙∙∙
काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी प्रयागवारीवरून सरकारवर टीका करताना केवळ राजकारण्यांवर टीका केली आहे. चोडणकर यांना या दौऱ्यात राजकारण्यांव्यतिरिक्त सहभागी झालेले अन्य कोण दिसले नाहीत का अशी विचारणा आता होऊ लागली आहे. राजकारण्यांवर टीका करणे सोपे असते. त्यातही राजकारणी सत्ताधारी असतील, तर त्यांना टीका झेलण्याची सवय असते. असे असताना प्रयागवारीच्या त्या विमानात कोण कोण होते याची माहिती असूनही चोडणकर यांनी केवळ राजकारण्यांनाच का लक्ष्य केले अशी चर्चा आहे. महाकुंभमध्ये सरकारी यात्रेतून जाऊन डुबकी मारण्याचे भाग्य केवळ राजकारण्यांपुरते मर्यादित नव्हते, तर त्याचा लाभ इतरांनाही झाला आहे. त्यामुळे चोडणकर यांना जाब विचारायचाच असेल तर त्यांनी इतर घटकांनाही विचारावा असे बोलले जात आहे. सत्ताधारी मंत्री, आमदार व त्यांच्या कुटुंबीयांवर प्रयागवारीवरून उधळपट्टीची टीका करतानाच ते इतर घटकांवरही टीका का करीत नाही, असे लोक बोलू लागले आहेत.∙∙∙
आश्वे-मांद्रे येथील ‘सँड टॅन’ रिसॉर्टसमोरच्या जनरेटर कक्षाला लागलेल्या आगीच्या घटनेने गावात चर्चा रंगली आहे. दोन जनरेटर आणि एक ट्रान्स्फॉर्मर जळून खाक झाला, पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. बेकायदेशीर समुद्रावरील जागा बळकावल्याने देवाच्या दारात ‘देर है, पर अंधेर नहीं’ असे लोक बोलू लागले आहेत, पण त्यांचं बोलणं ‘लेकी बोले सुने लागे’ अशा स्टाईलने सुरू आहे. बरेचजण किनारी भागात बेकायदेशीर गोष्टी करतात, तर काही नेतेमंडळी त्याकडे कानाडोळा करतात. त्यामुळे आता ‘ती लेक आणि ती सून’ कोण? हाच प्रश्न चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. काहींनी हसून विषय उडवला, तर काहींनी तावातावाने ‘माझं बोलणं ऐका’ म्हणत या आगीतल्या ‘अनुभवांवर’ आपली मते मांडायला सुरवात केली. देवाच्या दरबारी न्याय असतो, पण इथे गावच्या दरबारी चर्चेचा माहोल असतो हे सिद्ध झाले! ∙∙∙
मॉडिफाईड सायलेन्सर वापरल्याबद्दल दुचाकीस्वारांवर ट्रॅफिक सेलचे पोलिस सर्वत्र कारवाई करीत आहेत, ही आनंदाची किंवा समाधानाची बाब म्हणावी लागेल. अशी कारवाई केवळ काही दिवसांसाठी असू नये. काही कालावधीनुसार अशा कारवाया होणे आवश्यक आहे. स्टाईलिश नंबरप्लेट किंवा मॉडिफाईड सायलेन्सरचा वापर करणारा वर्ग आहे. मॉडिफाईड सायलेन्सर वापरून परिसरात आपल्याकडील वाहनाचा आवाज करीत वाहन हाकण्यात आनंद शोधणारे हे वाहनधारक असतात. त्यांना आपल्या वाहनाच्या आवाजाचा कोणावर काय परिणाम होईल याची फिकीर नसते, परंतु आता ट्रॅफिक सेलच्या कारवाया केवळ एका शहरापुरत्या मर्यादित राहू नयेत. तिसवाडीत पणजी, ताळगाव, सांताक्रूझ भागात मॉडिफाईड सायलेन्सर दुचाकीला लावून फिरणारे आहेत. सायंकाळी किंवा रात्री - मध्यरात्री अशा कानठळ्या बसवणारा आवाज करीत वाहने हाकणारे काही कमी नाहीत, त्यांच्यावर पणजीतील ट्रॅफिक सेलचे पोलिस कधी कारवाई करणार आहेत?
मागच्या वर्षी सां जुझे आरियल येथे शिवरायांचा पुतळा उभारण्यावरून स्थानिक आणि शिवप्रेमी यांच्यात वाद निर्माण झाला होता. त्यानंतर हा वाद निवळला होता, पण आता शिवजयंती तोंडावर आलेली असताना पुन्हा एकदा या वादाला तोंड फुटणार असे वाटते. याचे कारण म्हणजे, या शिवपुतळ्याकडे जाणारी वाट स्थानिकांनी तारेचे कुंपण घालून अडविली आहे. ही वाट खासगी जागेतून जाते म्हणून हे कुंपण घातले गेले असा दावा स्थानिक करतात, तर ही वाट अडविणारे तुम्ही कोण? असा शिवप्रेमींचा प्रश्न आहे. हा वाद सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोचला आहे. यावर पोलिस आणि प्रशासन कसा तोडगा काढतात हे पाहणे गरजेचे आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.