Goa Politics: खरी कुजबुज; राजकारणी दिवस रात्र काम करतात?

Khari Kujbuj Political Satire: वाहतूक पोलिस रविवारी तसेच रात्रीच्यावेळी सहसा ‘ऑन फील्ड’ नसतात.
Goa Political Updates
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

अरे व्वा! पोलिस ‘ऑन फील्ड’!!

वाहतूक पोलिस रविवारी तसेच रात्रीच्यावेळी सहसा ‘ऑन फील्ड’ नसतात. त्यामुळे वाहनचालकही निर्धास्त असतात. कुणीही आपले वाकडे करू शकत नाही असा त्यांची गोड समजूत असते, पण आता मडगावात रविवारी व रात्रीच्यावेळीही पोलिस रस्त्यावर उभे राहून वाहन नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करू लागले आहेत. मडगाव वाहतूक पोलिसांच्या या कामाचे कायदाप्रिय नागरिक स्वागत करीत आहेत. मात्र, यापुढेही ती चालूच असायला पाहिजे अशीही लोकांची मागणी आहे. कारण पोलिस अनेकदा मोहीम राबवितात व मग गप्प बसतात. लोकांना यापूर्वी याचा अनुभव आहे. ∙∙∙

राजकारणी दिवस रात्र काम करतात?

कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड कधी कधी मुद्दाचे बोलतात. काँग्रेस नेते मॉरेनो रिबेलोंच्या टीकेला तर ते कंटाळले आहेत. यापुढे ते त्यांच्या कुठल्याही प्रश्नांना उत्तरे देणार नाहीत असे त्यांनी जाहीर केले आहे. हे लोक केवळ राजकारण करतात व टीका करणेच त्यांना जमते. मात्र, आपल्यासारखे राजकारणी दिवस रात्र काम करतात असे रेजिनाल्डबाब सांगतात. हे केवळ आमची कामे कशी थांबतील व विकासकामे कशी खोळंबतील हेच पाहण्याचे काम ते करतात, असे रेजिनाल्ड यांचे ठाम मत आहे. रेजिनाल्डबाब तुम्ही काम करीत रहा. विधानसभा निवडणुका दोन वर्षांवर येऊन ठेपल्या आहेत. ∙∙∙

गंगे... त्यांना सुबुद्धी दे!

देवावर श्रद्धा असलेल्या व पाप पुण्यावर श्रद्धा असलेल्या कोट्यवधी लोकांनी गंगेत डुबकी मारली. या गंगा स्नानाला खास असे महत्त्व आहे. आपल्या हातून कळत नकळत झालेल्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी लोक आपला जीव धोक्यात घालून महाकुंभ मेळाव्याला उपस्थिती लावतात व त्रिवेणी संगमात डुबकी मारून पापातून मुक्ती मागतात. ज्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात भ्रष्टाचार केला, अनैतिकतेला थारा दिला. इतरांवर अन्याय केला व भ्रष्ट मार्गाने धनवान होऊन जनतेला लुबाडले ते आपल्या कुटुंबासह पवित्र स्नान केल्याचे फोटो व व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करतात त्यांना गंगा पापमुक्ती देणार का? ते पाप मुक्त झाले, तर पुन्हा आणखी पाप करण्यासाठी त्यांना नवीन परवाना मिळणार का? की ‘राम तेरी गंगा मैली’ सिनेमातील त्या गीताप्रमाणे ‘पापीयोंके पाप धोते धोते’ गंगा स्वतःच मैली होणार? ∙∙∙

पत्रकारांची प्रतिष्ठा खालावत आहे का?

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असे मानतात, पण सध्याच्या स्थितीत पत्रकारांची प्रतिष्ठा खालावत चालली आहे का? असा प्रश्न पडलेला आहे मडगावचे आमदार व माजी मुख्यमंत्री दिगंबरबाब कामत यांना. हल्लीच कोलवा येथे झालेल्या राष्ट्रीय पत्रकार युनियनच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, समाजाचा, राजकारणाचा दर्जा घसरलेला आहे. त्यामुळे पत्रकारांचे दुसरे काय होईल, पण जर पत्रकारांचा दर्जा किंवा त्यांची प्रतिष्ठा खालावली, तर लोकशाहीला संरक्षण कोण देईल असा प्रश्नसुद्धा ते उपस्थित करतात. पत्रकारांनी सत्य तेच लिहावे व समाजातील लहानांहून लहान घटकांचे प्रश्न मांडावेत असा सल्ला ते देतात, पण प्रश्न हा आहे की पत्रकारांची प्रतिष्ठा जर खरेच खालावली असेल, तर त्याला जबाबदार कोण? सर्वच पत्रकारांची प्रतिष्ठा खालावत आहे का? याचा शोध दिगंबरबाबांनी घ्यायचा प्रयत्न करून पहावे. ∙∙∙

प्रयागराजमधील डुबक्यांनी काय होणार?

गोवा सरकार पुरस्कृत महाकुंभ मेळ्यासाठीच्या दोन रेल्वे सफरी पार पडल्या, तर खास विमानाने मुख्यमंत्री, मंत्री व आमदारच केवळ नव्हे, तर सरकार पक्षातील सरपंच व सरकारी अधिकारीही प्रयागराजला जाऊन गंगेत डुबकी मारून धन्य झाले. त्यांच्या या यात्रेचे पुण्य तेथे गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघांना लाभले, तर या सफरीचे सार्थक झाले असे या आमदारांच्या मतदारसंघातील लोक उघडपणे म्हणत आहेत. कारण अशा अनेक मतदारसंघातील सध्याची स्थिती गंभीर आहे. तेथे विकासकामे अवश्य सुरू आहेत, पण त्या कामांचा फटका तेथील लोकांना बसत आहे. सासष्टीतील काही मतदारसंघात भूमिगत वीजवाहिनीचे काम होऊन काही महिने उलटले, पण खोदलेले रस्ते परत डांबरीकरण झालेले नाहीत. काही ठिकाणी मलनिस्सारणासाठी खोदलेल्या रस्त्यांची हीच स्थिती आहे. घोगळ गृहनिर्माण वसाहतीतील रस्ते अशाच प्रकारे भूमिगत गॅसवाहिनीसाठी खोदलेले आहेत ते वाहन नेण्यासाठी सोडाच, पण पायी चालण्यासही योग्य नाहीत. कचरा समस्या, बुजून गेलेली गटारे, मोडून पडलेली झाडे ही अवस्था असताना त्यावर तोडगा न काढता प्रयागराजला जाऊन डुबकी घेण्यात काय अर्थ आहे असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. ∙∙∙

सुदिन ‘भावुक’

माजी आमदार लवू मामलेदार यांच्या अंत्यदर्शनाला आज फोंडा येथे बरीच गर्दी झाली होती. सगळ्या थरातील लोक दर्शन घ्यायला जमलेले दिसत होते. त्यात महनीय, अतिमहनीय व्यक्तींचाही भरणा होता. त्यातल्या वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या अनावर झालेल्या भावना पाहून अनेकांचे डोळे पाणावले. खरं तर गेली काही वर्षे राजकीयदृष्ट्या सुदिन व लवू यांच्यात विस्तव जात नव्हता, पण शालेय जीवनात ते जिगरी दोस्त होते हेही तेवढेच खरे. आणि सुदिनांच्या डोळ्यात जमा झालेल्या अश्रूत हीच दोस्ती प्रतीत होत होती. शेवटी राजकारणापेक्षा बालपणाची दोस्ती जास्त शाश्वत असते याचा यावेळी प्रत्यय येत होता. त्यामुळेच उपस्थित असलेल्या प्रत्येकाला ‘शोले’मधले ‘ये दोस्ती हम नहीं छोडेंगे’ हे गाणे आठवले. ∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: गोव्यात विरोधी पक्ष एकत्र येऊ शकतील? विशेष लेख

‘आप’ला कमी लेखू नका

सध्या बाणावली मतदारसंघावरून आम आदमी व काँग्रेस यांच्यामध्ये युद्ध चालू आहे. काँग्रेसने तर बाणावलीत विकासकामांवर भर देण्याचा एल्गार केला आहे, पण आमदार व्हेंझीबाब आम आदमी पक्षाला कमी लेखू नका अशी अप्रत्यक्ष धमकी काँग्रेसला देऊ लागले आहेत. दक्षिण गोव्याचे काँग्रेसचे विद्यमान खासदार कॅप्टन विरियातो केवळ आम आदमी पक्षाचा पाठिंबा मिळाला म्हणूनच निवडून आले आहेत असे सांगत सुटले आहेत व त्यात तथ्यही आहे. जिल्हा पंचायतीच्या पोटनिवडणुकीतसुद्धा काँग्रेसने प्रत्यक्ष नाही तरी अप्रत्यक्ष उमेदवार ठेवलाच होता. त्यालासुद्धा पराभव पत्करावा लागला हे काँग्रेसने लक्षात ठेवावे असे व्हेंझीबाब ठणकावून सांगतात. काँग्रेसने आता ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ अशी स्थिती स्वतःवर ओढवून घेऊ नये अशी चर्चा सुरू झाली आहे. ∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; अपघात सत्र थांबता थांबेना...

चहापेक्षा किटली गरम!

गोव्यात मंत्रिमंडळ बदल होणार, होणार, होणारच! अशी चर्चा गेली दोन वर्षे रंगतेय, पण प्रत्यक्षात फक्त गॉसिप आणि वर्तुळाकार चर्चाच फिरत आहे. प्रत्येकवेळी विषय निघतो, लोकांमध्ये उत्सुकता वाढते, पण शेवटी त्याच चहाचा कप समोर येतो – काहीही नवं नाही! मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष ‘काहीही बदल नाही’ असं म्हणतात, पण त्यांच्याच हालचाली पाहिल्या की वाटतं, बदल होईल. आता म्हणे २१ तारखेला भाजपचे मोठे नेते गोव्यात येताहेत आणि मंत्र्यांसोबत खास गुप्त गप्पा मारणार. ‘तीन दिवसांचा दौरा आहे’ म्हणे, म्हणजे काहीतरी ठरेलच की! पण आता प्रश्न असा आहे की ही भेट फक्त पक्षाच्या एकजुटीसाठी आहे, की कुणाच्या खुर्चीला नवीन गादी बसवण्यासाठी? भाजपचे आमदार आता ‘आपलं काय?’ या विचारात असताना विरोधक मात्र ‘बदल होऊ दे, आमचं काही अडत नाही!’ असं म्हणत आहेत. लोक म्हणतात, यावेळी तरी खरंच काहीतरी होणार का, की नेहमीसारखी फक्त चर्चा आणि अफवांचे फुलपाखरू उडणार? असं म्हटलं जातं की ‘चहा गरम असतो, पण किटली त्याहूनही गरम असते!’ आत्ता सगळ्यांची नजर त्या किटलीत काय शिजतंय यावर आहे! ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com