Panjim Tree Collapse Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2024: गोव्यात पावसाचे सात बळी, झाड कोसळून तरुणीचा मृत्यू

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यात गेल्या १५ दिवसांपासून उग्र रूप धारण केलेल्या पावसाचा वेग मंदावला असला, तरी सातत्य कायम आहे. आतापर्यंत पावसामुळे झालेल्या पडझडींच्या दुर्घटनांमध्ये सहाजणांचे बळी गेले आहेत.

त्यातच रविवारी सकाळी पणजीतील मेरी इमॅक्युलेट चर्च चौकाजवळ एक गुलमोहराचे झाड पडून १९ वर्षीय युवती ठार झाली. पावसाळी दुर्घटनांमधील हा सातवा बळी आहे.

येथील मेरी इमॅक्युलेट चर्च चौकाजवळ असलेल्या वेल्हो-फिल्हो इमारतीसमोरील उद्यानाच्या रस्त्याच्या बाजूला असलेले गुलमोहराचे जुनाट झाड आज मोडून पडले. त्यावेळी तेथून चालत जाणारी आरती गोंड ही १९ वर्षीय तरुणी झाडाच्या फांद्यांखाली सापडून गंभीर जखमी झाली होती.

गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. ही दुर्घटना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी तेथे उभ्या केलेल्या दोन वाहनांचेही नुकसान झाले. या परिसरात आठवडाभरात तीन ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्याने लोकांमध्ये घबराट पसरली आहे.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सुरू असलेल्या पावसामुळे पणजीत रस्त्याच्या बाजूला असलेले झाड अचानक मोडून पडले. त्याचवेळी तेथील एका शोरूममध्ये कामाला असलेली आरती गोंड ही तरुणी चालत जात होती.

अचानक मोडून पडलेल्या या झाडाच्या फांद्या तिच्यावर अंगावर पडल्या. त्यामुळे ती या फांद्यांखाली अडकली. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली आणि दलाचे जवान काही क्षणांतच घटनास्थळी दाखल झाले.

फांद्यांखाली अडकलेल्या तरुणीला बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू झाले. तिला बाहेर काढले, तेव्हा ती बेशुद्धावस्थेत होती. तिच्या डोक्याला जखम झाल्याने रक्तस्राव होत होता. तिला १०८ रुग्णवाहिकेतून घेऊन जात असताना ती शुद्धीवर आली.

तिला त्वरित गोमेकॉ इस्पितळात नेले. उपचार सुरू असतानाच आज संध्याकाळी तिचा मृत्यू झाला. ही तरुणी मूळची उत्तर प्रदेशची असून सध्या बेती येथे राहात होती, असे पोलिसांनी सांगितले. हवामान खात्याने राज्यात २२ ते २५ जुलै या चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

बांदोडकर मार्ग धोकादायक

पणजी शहरातील दयानंद बांदोडकर मार्गावरील अनेक झाडांच्या फांद्या रस्त्यावर आलेल्या आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या पादचारी तसेच वाहन चालकांनाही धोका निर्माण झाला आहे. संबंधित खात्याने याची दखल घेण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया या दुर्घटनेवेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

पणजीत अपघातांची भीती

स्मार्ट सिटीच्या कामांसाठी खोदलेले रस्ते अजूनही तसेच पडून आहेत. भाटले येथील रस्त्याचे मे महिन्यात डांबरीकरण करण्यात आले होते हा रस्ता वाहून गेला आहे. येथे पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमधून मार्ग काढताना जीव कासावीस होत आहे.

एक महिला स्कूटवरुन पडल्याची घटनाही घडली. त्यामुळे ‘स्मार्ट’ शहरात रस्त्यांची अवस्था पाहून अपघाती बळी वाढवणार का, असा सवाल संतप्त नागरिक विचारत आहेत. रस्त्यांच्या या समस्येकडून माजी महापाैर उदय मडइकर यांनी लक्ष वेधले होते.

‘स्मार्ट सिटी’चे काम झाडांच्या मुळावर

राजधानी पणजीत स्मार्ट सिटीचे काम सुरू आहे. शहरातील जुनाट झाडांची मुळे रस्त्याखाली गेली आहेत. या कामावेळी मुळे कापल्याने ही झाडे कमकुवत झाली आहेत. त्यामुळे ही झाडे वादळी वाऱ्यावेळी मोडून पडण्याचे प्रकार घडत आहेत. या झाडांची मुळे कमकुवत बनल्याने झाडे वाकलेल्या स्थितीत आहेत. ती कधीही उन्मळून वा मोडून पडण्याची शक्यता आहे.

पणजी स्थानकाचा फोन नादुरुस्त

पणजीत झाड पडून तरुणी जखमी झाल्याची माहिती मिळताच येथील काही नागरिकांनी मदतीसाठी पणजी पोलिस स्थानकाच्या फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, फोनच लागत नव्हता. हा फोन गेल्या काही दिवसांपासून नादुरुस्त असल्याचे समजले.

त्यानंतर पणजी पोलिस निरीक्षकांचा मोबाईल फोन क्रमांक मिळवून त्यांना या घटनेची माहिती देण्यात आली.

१५ दिवसांत ९७९ कॉल्स : सुमारे दोन कोटींची मालमत्ता वाचविली

राज्यात संततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पडझडीच्या घटना घडल्या आहेत. गेल्या १५ दिवसांत (६ ते २० जुलै) अग्निशमन दलाला ९७९ कॉल्स आले आहेत. सरासरी दिवसाला ६५ कॉल्सची नोंद होत आहे.

त्यामध्ये दरडी कोसळणे, घराच्या भिंती कोसळणे, रस्त्यावर व घरांवर झाडे पडणे यांचा समावेश आहे. या काळात सुमारे ८३.३४ लाखांचे नुकसान झाले आहे, तसेच काहींना जीवही गमवावा लागला आहे. याच काळात सुमारे १.८९ कोटींची मालमत्ता वाचविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

कुठे काय घडले?

हरवळेत वीजवाहिन्यांसह कारवर पडले झाड. सुदैवाने चार कामगार बचावले. मात्र, वाहतुकीला अडथळा.

मये मतदारसंघात हळदणवाडी आणि शिरगावातील पाण्याखाली गेलेल्या शेतजमिनीची आमदार प्रेमेंद्र शेट यांनी केली पाहणी. नुकसानीचा अहवाल तयार करण्याचे कृषी अधिकाऱ्यांना निर्देश.

तिराळ-उसगाव येथील राजश्री नाईक यांच्या घराचा काही भाग कोसळला. उर्वरित भागही कोसळण्याच्या मार्गावर.

कुठ्ठाळी येथे दरड कोसळल्याने क्लीप वाझ यांच्या घराचे नुकसान. आमदार संकल्प आमोणकर, आंतोन वाझ यांनी केली पाहणी.

झाड पडून तरुणीच्या मृत्यूची घटना दुर्दैवी आहे. मी लोकांना विनंती करतो की, त्यांनी जुनाट झाडांबाबत खबरदारी बाळगावी. अशा झाडांखाली उभे राहू नये, तसेच वाहने उभी करून नयेत. वन खात्याकडून राजधानी पणजीतील धोकादायक झाडांबाबत अहवाल मागवून घेण्यासंबंधी पणजी महापालिकेच्या आयुक्तांना निर्देश दिले आहेत.
बाबूश मोन्सेरात, आमदार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar: क्रिकेटच्या देवाचा मुलगा चमकला, कर्नाटक संघाचे कंबरडे मोडले; गोव्याला मिळवून दिला मोठा विजय

Hit and Run Case: पेडणे हिट अँड रन प्रकरणातील फरार ट्रकचालकाला अटक

Mumbai Goa Highway Accident: मालवणमधून कोल्हापूर - तुळजापूरला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात, 26 प्रवासी जखमी

Whirlwind at Arambol Beach: हरमल समुद्रकिनारी अचानक वावटळीची धडक; काही स्टॉल्सचे नुकसान

Goa Fishing: कर्नाटकातील मच्छीमारांची घुसखोरी, गोव्यातून होतोय तीव्र विरोध

SCROLL FOR NEXT