म्हापसा: म्हापसा पालिका बाजारपेठेतील प्रवेशद्वारावर बॅरिकेड्स घालून वाहनचालकांना प्रवेश बंद करीत पे पार्किंगच्या नावाखाली त्यांच्याकडून म्हापसा पालिका मंडळाने पे पार्किंगच्या कंत्राटदाराला हाताशी धरून वाहनचालकांना लुटण्याचा डाव आखल्याने त्याला व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केला. ही कृती नियमबाह्य असल्याचा दावा करून बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी पालिकेचा तसेच कंत्राटदाराचा हा डाव पूर्णत: उधळून लावला. अखेर ती बॅरिकेड्स हटविण्यात आली.
बाजारपेठेतील रस्त्यांवर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना पार्किंग बाजारात नकोच आहे. तसेच अन्य काही व्यापाऱ्यांचा बाजारपेठेतील पार्किंगला विरोध आहे, पण बहुसंख्य व्यापाऱ्यांना बाजारात पार्किंग हवे आहे. बाजारपेठेत पार्किंगची सोय करणे हा व्यापाऱ्यांचा तसेच ग्राहकांचाही अधिकार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. रस्त्यावरील विक्रेत्यांची अन्यत्र सोय करावी, अशीही त्यांची मागणी आहे. (Mapusa Market News)
काही व्यापाऱ्यांना व व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मोफत पार्किग हवी असल्याने आज सकाळी पालिका मंडळाने बॅरिकेड्स घातल्याने पार्किंग कंत्राटदार व व्यापाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर व्यापाऱ्यांनी स्वत:हून बॅरिकेड्स काढून टाकून वाहनचालकांना प्रवेश दिला. पे पार्किंग कंत्राटदार पार्किंगचे शुल्क घेत असल्याने व्यापाऱ्यांनी अधिकच संताप व्यक्त केला.
बॅरिकेड्स घालून पे पार्किग शुल्क वसूल करण्याच्या षडयंत्रामागे म्हापसा पालिकेतील भाजपसमर्थक नगरसेवक आहेत. या नगरसेवकांना स्थानिक आमदार ज्योशुआ डिसोझा व अन्य राजकीय नेत्यांचा आशीर्वाद असल्याने अनेक मार्गांचा अवलंब करून जनतेची पैशांसाठी सावणूक चालू आहे. सत्तेवर असलेल्या भाजप सरकारचा धाक दाखवून व सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करून बाजारात अक्षरश: लयलूट सुरू असल्याचा दावा काही व्यापाऱ्यांनी केला.
म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीपाद सावंत यांच्या नेतृत्वाखाली माजी अध्यक्ष आशिष शिरोडकर, वैभव राऊळ, सुशांत पेडणेकर, जितेंद्र फळारी अन्य असंख्य व्यापारी या प्रकाराला विरोध करण्यासाठी संघटित झाले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.