नवी दिल्ली: ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तानचे बरेच नुकसान केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासीयांशी संवाद साधतानाच पाकिस्तानलाही दम दिला.
‘‘पाकिस्तानचे कोणतेही आण्विक ब्लॅकमेल सहन करणार नाही आणि त्याआडून फोफावणाऱ्या दहशतवादी तळांवर भारत अचूक आणि निर्णायक प्रहार केल्याशिवाय राहणार नाही,’’ असा इशाराच मोदींनी पाकिस्तानला दिला. तसेच, यापुढे पाकिस्तानशी चर्चा केवळ दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीर या मुद्द्यांवरच होईल, अशी स्पष्ट भूमिकाही त्यांनी मांडली.
पंतप्रधान मोदींनी आज केलेल्या भाषणात ‘ऑपरेशन सिंदूर आम्ही केवळ स्थगित केले आहे,’ असे विधान करत पाकिस्तानला एक प्रकारे इशाराच दिला. ते म्हणाले, सर्जिकल स्ट्राईक आणि हवाई हल्ल्यानंतर आता ऑपरेशन सिंदूर ही दहशतवादाविरुद्ध भारताची नीती आहे. आम्ही पाकिस्तानातील दहशतवादी आणि सैन्यतळांवरील कारवाईला केवळ स्थगित केले आहे. आगामी काळात पाकिस्तानची प्रत्येक कृती या कसोटीवर जोखली जाईल.
भारताची संरक्षण दले पूर्णपणे सावध आहेत. ऑपरेशन सिंदूरने दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक नवी रेष ओढली आहे. नवा निकष निश्चित केला आहे. यापुढे भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल.
आम्ही आमच्या पद्धतीने, आपल्या अटींवर प्रत्युत्तर देऊ. जिथून दहशतवादाची मुळे बाहेर येतात त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन कठोर कारवाई करू.’’ आपण आज विश्वसमुदायालाही सांगू इच्छितो; जर पाकिस्तानशी चर्चा करायची असेल तर ती केवळ दहशतवादावरच होईल, पाकव्याप्त काश्मीरवरच होईल, अशी भारताची कणखर भूमिका पंतप्रधानांनी अधोरेखित केली.
आपल्या बावीस मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी सर्वप्रथम भारताची पराक्रमी सेना, सशस्त्र दल, गुप्तचर संस्था आणि शास्त्रज्ञांना प्रत्येक भारतीयाच्या वतीने मानवंदना दिली. आमच्या वीर सैनिकांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या लक्ष्यप्राप्तीसाठी असीम शौर्याचे प्रदर्शन केल्याचे नमूद करुन त्यांची वीरता, साहस आणि पराक्रमाला देशाच्या प्रत्येक माता, भगिनी आणि मुलींना समर्पित करीत असल्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले.
‘ऑपरेशन सिंदूर’ हे केवळ नाव नाही तर देशाच्या कोट्यवधी जनतेच्या भावनांचे प्रतिबिंब आहे, न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे, असे सांगताना मोदी यांनी, साऱ्या जगाने या प्रतिज्ञेला परिणामात परिवर्तित होताना पाहिल्याचे निदर्शनास आणून दिले.
भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविरामाच्या ४३ तासांनंतर सोमवारी ९ राज्यांमधील ३२ विमानतळ तत्काळ प्रभावाने सुरू करण्यात आले. विमान कंपन्यांनी प्रवाशांसाठी बुकिंग सुरू केले आहे. ९ मेपासून २३ मेपर्यंत ३२ विमानतळांवरील सेवा बंद ठेवण्यात येणार होती. परंतु आता युद्धविरामाची घोषणा झाल्याने तसेच परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने विमानतळ खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी अशक्य
‘ऑपरेशन सिंदूर’ संपलेले नाही
पाकने आगळीक केली,
तर अशीच कारवाई
एक दिवस दहशतवादच पाकिस्तानला नष्ट करेल
पाकिस्तानी सैन्य व सरकारकडून दहशतवादाला प्रोत्साहन
दहशतवादाला पोसणारे सरकार व म्होरके यांना वेगळे समजणार नाही
पाकिस्तान सरकार पुरस्कृत दहशतवादाचा चेहरा जगाने पाहिला
युद्धाच्या मैदानावर आम्ही पाकिस्तानला नेहमीच धूळ चारली
भारताने नव्या प्रकारच्या युद्धशैलीची सिद्धता केली
मेड इन इंडिया शस्त्रांची विश्वासार्हता सिद्ध झाली
अण्वस्त्रांच्या आडून दिलेली धमकी सहन करणार नाही
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.