OM Birla Address To Goa Assembly: "विधानसभा लहान आहे पण लोकांच्या अपेक्षा अधिक असतील, तर त्यातील प्राथमिकता काय आहेत, याचा विचार करून अर्थसंकल्पात त्या प्राथमिकतांना प्राधान्य देत लोकांच्या मागण्या आणि अपेक्षा पूर्ण केल्या तर 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न सर्वात पहिल्यांदा गोवा पूर्ण करेल. असा विश्वास लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्त केला आहे. बिर्ला यांनी गुरूवारी गोवा विधानसभेत त्याचे विचार व्यक्त केले.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी “विकसित भारत 2047 आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींची भूमिका” या विषयावर त्यांचे विचार व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि सभापती रमेश तवडकर, उपसभापती जोशुआ डिसोझा, राज्यातील आजी माजी मंत्री, आमदार उपस्थित होते.
सभापती रमेश तवडकर यांनी स्वागत भाषण केले. "आम्हाला 'आत्मनिर्भर भारत' आणि 'स्वंयपूर्ण गोवा' ही दोन्ही ध्येय पूर्ण करायची आहेत. पक्षाचा सदस्य झालो तेव्हापासून मी स्वत:ला लोकसेवेसाठी समर्पित केले आहे. श्रम-धाम योजनेतून मी पाहिलेले एक महत्वकांक्षी स्वप्न आता पूर्णात्वास जात आहे. याशिवाय शिक्षण, आरोग्य यासारख्या कामासाठी मी प्रयत्नशील आहे. देशाचा विकास हे नेहमीच केंद्र आणि राज्य यांचे ध्येय राहिले आहे." असे तवडकर म्हणाले.
दिवंगत राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्यानंतर आता देशाचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला गोव्यात लोक प्रतिनिधींना संबोधित करण्यासाठी उपस्थित राहिले आहेत. अलिकडेच देशाला नवीन संसद मिळाली आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री सावंत यांनी गोव्याच्या वतीने बिर्ला यांचे अभिनंदन केले.
'गोवा देशातच नव्हे तर जगातील एक प्रसिद्ध पर्यटन ठिकाण म्हणून उदयास आले आहे. यासाठी प्रयत्न केलेल्या विद्यमान मुख्यमंत्री आणि आजी माजी मंत्र्यांचे मी अभिनंदन करतो. स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होतील त्यावेळेला आपल्याला विकसीत भारताचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. 1947 नंतर देखील गोव्याने स्वातंत्र्यासाठी मोठी लढाई लढली. शिक्षण, आरोग्य यासारख्या क्षेत्रात गोवा पुढे जात आहे ही चांगली बाब आहे.'
'देश स्वातंत्र्य झाल्यानंतर आपल्यासमोर अनेक संकटे होती. पण, सामुहिक प्रयत्नाच्या जोरावर देशाच्या विविधतेतील एकता आपण जगाला दाखवून दिली. 75 वर्षात देशाची लोकशाही अधिक मजबूत झाली आहे.' असे ओम बिर्ला म्हणाले.
'लोकशाहीच्या 75 वर्षाच्या प्रवासात सर्वांनी चर्चा आणि संवादातून विकासाच्या दिशेने वाटचाल केली आहे. संसद असो किंवा विधानसभा असो हा सरकारपर्यंत पोहचण्याचा मार्ग आहे. पण, अलिकडे विरोध करण्याचा नवा मार्ग निर्माण झाला आहे. पण, सभागृहात योग्यप्रकारे चर्चा व्हायला हवी.'
'विधानसभेत होणाऱ्या चर्चा कमी होत चालल्या आहेत हा चिंतेचा विषय आहे. मात्र, गोव्यात 40 दिवसांपासून अधिककाळ कामकाज चालते ही दिलासादायक बाब आहे. विधानसभेत सर्वच विषयांवर, लोकांच्या समस्यांवर चर्चा व्हायला पाहिजे.'
'गोवा विधानसभेकडून माझ्या अधिक अपेक्षा आहेत. प्रत्येक व्यक्तीसोबत आपला संवाद व्हायला हवा, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा यासारख्या गोष्टींचा गोव्यात उत्तम विकास झाला आहे.' असे बिर्ला म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.