Temple  Dainik Gomantak
गोवा

Virnoda Pernem: नदी, देवराई आणि इतिहासाची सफर घडवणारा निसर्गसंपन्न गाव- विरनोडा

Virnoda Pernem: गोव्याच्या विरनोडा गावाची भौगोलिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये पहाण्यासाठी जरुर भेट द्या

Ganeshprasad Gogate

Virnoda Pernem: गोव्यातील प्रत्येक गावातील भौगोलिक रचना वेगवेगळी आहे. इथे मिळणाऱ्या वनस्पती, वन्यजीव, गावातील ऐतिहासिक- धार्मिक वास्तू या सगळ्या गोष्टींमुळे गोव्यातील या छोट्या गावांची ओळख दूरवर झालीय. 

आदिलशाही राजवटीत ज्या एकोणतीस गावांचा उल्लेख आढळतो त्यात पेडणे तालुक्यातील विरनोडे गावाचे नाव प्रामुख्याने आढळते. पणजी ते पत्रादेवी या राष्ट्रीय महामार्गावरती हा निसर्गसुंदर गाव वसलेला आहे.

एकेकाळी कृषी व्यवसायावर जगणाऱ्या इथल्या कुळवाड्यांना आज उपजीविकेची नवनवीन साधने उपलब्ध झालेली आहेत. बारमाही अन्नधान्याची सुबत्ता आणि पिण्याच्या पाण्याची मुबलकता विरनोड्याला लाभण्यास इथली जीवनदायिनी विरनोडा नदी कारणीभूत आहे.

विरनोडा गावच्या सीमेवरती मालपेची डोंगर टेकडी असून, तिथल्या जंगलात बरसोडचाच्या नदीचा उगम होत असतो. मालपेच्या टेकडीवर धनगर गावातली जमातीचे वास्तव्य असून, पायथ्याशी असणारी चांदेलची झर त्यांच्चा पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण करीत असे.

गावाचे व्यवसाय:-

मालपेहून विरनोडची नदी विरनोडा गावातून, धारगळ आणि तिथून तुये गावातील आरोब्याद्वारे कोलवाळ नदीच्या मुख्य प्रवाहाशी एकात्म होऊन जाते. धारगळमधील तिवाडो येथे या नदीत खारे पाणी घुसते आणि त्यामुळे या परिसरात बऱ्याच मानशी आहेत.

विरनोडा येथील लोक पूर्वी चवदार मासे, सुंगटे, खेकडे यांचा आस्वाद घेण्यासाठी याच नदीचा आधार घेत असत. विरनोडची ही नदी 'चिपचोकची न्हंय' म्हणून प्रसिद्ध आहे. याच नदीच्या काठावरती इथली सुपीक जमीन असून, तिथे शेती मोठ्या प्रमाणात केली जायची.

कातुलीं जाण्याच्या वाटेवर मध्ये नागार्डेश्वर देवचाराची देवराई असून, वड, जांभूळ, कोकम यांची हाताच्या बोटांवर मोजण्या इतकी शिल्लक असणारी झाडे देवराईच्या गतवैभवाची कल्पना आणून देतात.

गावच्या प्रथा परंपरा:-

शारीरिक वेदना आणि प्रापंचिक अडचणीचे निराकरण व्हावे म्हणून भाविक नागार्डेश्वराला लाकडी हात, पाय, मस्तक अर्पण करतात. नांगराच्या प्रतिकृती अर्पण करण्याची परंपरा इथे रूढ आहे. विरनोड्याची शेतीभाती आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा राखणदार म्हणून नागार्डेश्वराला आदराचे स्थान आहे.

विरनोडा हा नावाप्रमाणे एकेकाळी मर्दानी वीर पुरुषांची भूमी असली पाहिजे. शतकांपासून प्रचलित असलेल्या या गावचा क्षात्रतेजाचा वारसा इथल्या सण, उत्सवातून प्रतिबिंबित होत असतो.

गोव्यात उत्तरेत तरंग मेळाची मिरवणूक बहुतांश ठिकाणी विजयादशमीला तर दक्षिणेत शिगम्याच्या आसपास असतात. परंतु विरनोड्याला मात्र रवळनाथ, भूतनाथ आणि पावणाई यांच्या तरंगामेळाची मिरवणूक रणरणत्या वैशाखातल्या द्वादशीला सुरू होते.

मध्ययुगीन इतिहासाशी गावाचा संबंध:-

विरनोड्यात इसवी सनाच्या नवव्या व दहाव्या शतकाशी नाते सांगणाऱ्या महिषासूरमर्दिनीच्या दोन मूर्ती आढळल्या होत्या. मध्ययुगीन इतिहासाशी संबंधित तीन कुळ पुरुषाच्या मूर्ती सध्या जुन्या गोव्यातील भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या वस्तुसंग्रहालयात आहेत.

कुळकार, ब्राह्मण, भगवती, भावकादेवी, रवळनाथ, बारांचा कुळकार, सत्पुरुष. माउली, नारायण, महादेव, नितकारी, पुरमार आणि म्हारिंगण या लोकदैवतांच्या आशीर्वचनाने आणि इथल्या भूमिपुत्रांच्या क्षात्रतेजाने विरनोड्याच्या इतिहासाला गती आणि दिशा लाभलेली आहे.

सातेरी आणि कुळाकार यांच्यासमोर पाच दिवस रंगणारा इथल्या स्त्रियांचा धालोत्सव, गावातील देवाची तळी, देवाची विहीर आणि नांगार्डेश्वराची देवराई... याद्वारे विरनोड्याच्या पर्यावरणीय संस्कृतीचा वारसा प्रतिबिंबित होतो.

गावाला भेट देण्यासाठी कसे जाल?

राजधानी पणजीपासून अवघ्या 40 किलोमीटरवर पेडणे तालुक्यात विर्नोडा गाव वसले असून राजधानीतून या ठिकाणी जाण्यासाठी कदंब बसेस ची सोया उपलब्ध आहे. तसेच म्हापसा शहरातून देखील तुम्ही बसने या गावी जाऊ शकता. गोव्यात रेंटवर मिळणाऱ्या गाड्या, दुचाकी याद्वारेही हा प्रवास तुम्हाला आनंद देऊन जाईल.

तर तुम्ही महाराष्ट्रातील सिधुदुर्गातून येणार असाल तर सावंतवाडी शहरापासून विर्नोडा गाव अवघ्या 38 किलोमीटर अंतरावर आहे. सावंतवाडीहून पणजी बसने निघाल्यावर वाटेतच हे गाव लागतं.

(सदर माहिती ही गोव्यातील विविध क्षेत्रातील अभ्यासकांशी आणि मान्यवरांशी संवाद साधून, वेगवेगळे संदर्भ घेऊन संकलित केली असून यातून गोव्याचे सकारात्मक आणि आदर्श चित्र उभा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT