Nilesh Cabral Dainik Gomantak
गोवा

कुडचडे मतदारसंघात नीलेश काब्राल यांचा तिसऱ्यांदा विजय

काब्रालच्या मदतीला आरजीचे आदित्य देसाई

दैनिक गोमन्तक

गोवा: कुडचडे मतदारसंघात कुठल्याही आमदाराने दोनपेक्षा अधिक वेळा विजय मिळविला नव्हता. मात्र, नीलेश काब्राल यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवून नवीन विक्रम केला खरा, पण नवख्या अमित पाटकर यांच्यासमोर घाम गाळला हेही तितकेच खरे. एरवी नीलेश सहा सात हजार मतांच्या आघाडीने निवडून यायचे. मात्र, यावेळी त्यांची आघाडी अवघ्या साडेसहाशे मतांवर आली. कुडचडे मतदारसंघात आरजीचे आदित्य देसाई यांनी जवळपास 2000 मते काढली. त्यामुळे काँग्रेसची बरीच मते गळाली. एका अर्थाने काब्राल यांना आरजी पावला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

तृणमूलचा हेतू साध्य

गोव्यात विरोधी मतांमध्ये फूट घालण्यासाठी म्हणजेच काँग्रेसला अपशकून करण्यासाठीच तृणमूल काँग्रेस विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गोव्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेते सतत करत होते. ताज्या निकालानंतर ते सत्य असल्याचे दिसून आले आहे. निवडणूक निकालातील विश्लेषणात अनेकांनी त्याकडे लक्ष वेधले. दक्षिण गोव्यातील वेळ्ळी, नावेली, बाणावली हे बालेकिल्ले त्या पक्षाला एकतर आप वा तृणमूलमुळे गमवावे लागले हेच खरे, पण काही काँग्रेसवाले मात्र त्या पक्षाने बंगाली वा दिल्लीवाल्यांना गांभिर्याने घेतले नाही व त्याचाच हा परिणाम असल्याचे सांगतात.

तृणमूलची पाटी कोरीच

निवडणुकीच्या तोंडावर गोव्यात दाखल होऊन तृणमूल काँग्रेस व त्यांच्या प्रशांत किशोर यांनी येथे भलतीच हवा निर्माण केली. तिच्यावर भाळून लुईझिन फालेरोंसारखे अनेकजण तिच्या गोटांत गेले व भ्रमनिरास झाल्यावर तेथून बाहेरही पडले. आता मतमोजणीनंतर पाहिले तर तो पक्ष येथे प्रभाव पाडू शकलेला नाही असेच दिसून येते. तो पक्ष म.गो. लाही कुठे मदतरूप ठरला नाही. कारण त्याला खातेही उघडता आलेले नाही. त्यामुळे त्या पक्षाच्या साथीने किंग बनू पाहणाऱ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला.

म्हापसा पालिकेचा श्रीमंती थाट!

नेहमीच श्रीमंती थाटात व्यवहार चाललेल्या म्हापसा पालिकेला सध्या कामासाठी वाहनांचा तुटवडा भासतोय, हे ऐकून कुणालाही आश्चर्यच वाटेल. लोकप्रतिनिधींनी तसेच नेमून दिलेले पालिका निरीक्षक व निरीक्षक यांनी पालिका क्षेत्रात चाललेल्या बेकायदा कारभारावर नजर ठेवणे हे त्यांचे कर्तव्यच असते.

परंतु तसे न होता एखाद्या सामाजिक संस्थेतर्फे बेकायदा कृतीविरोधात आवाज उठवल्यानंतरच त्याची पाहणी करण्यासाठी केवळ ‘तारीख पे तारीख’ दिली जात आहे. इन्स्पेक्शन का ठेवले नाही, अशी विचारणा केल्यास एक तर अभियंता विभागातील अधिकारी गैरहजर असल्याचे अथवा वाहन उपलब्ध नसल्याचे कारण पुढे केले जाते. वास्तविक एक-दोन किलोमीटरच्या परिघात पालिकेच्या वाहनाची आवश्यकता नसते. कारण गलेलठ्ठ वेतन घेणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांकडे स्वत:ची वाहने असतातच. त्यासाठी केवळ हवी असते ती इच्छाशक्ती.

त्यांना खरोखरच परवडत नसल्यास भाडोत्री वाहनाचा वापर करणेही शक्य असते; कारण पालिकेच्या सोपो कंत्राटदारांना 11 लाख रुपये माफ करण्याचा दानशूरपणा अलीकडेच दाखवलेल्या या तथाकथित श्रीमंत पालिकेला भाडोत्री वाहनाचा खर्च परवडत नाही, हे मोठे आश्चर्य असल्याची चर्चा सध्या म्हापशात सुरू आहे.

सावित्री का पडल्या?

सांगेत सावित्रीच जिंकणार असे सगळे म्हणत होते, पण शेवटी तिथे सुभाष फळदेसाई यांनी बाजी मारली. भाजपची मते एकसंध ठेवण्यास सुभाष यांनी यश मिळविले. त्यामुळे पैशांचा सढळहस्ते वापर करूनही सावित्री जिंकू शकल्या नाहीत. असे म्हणतात, सांगे मतदारसंघात एका संस्थेने सर्व उमेदवारांची डिबेट ठेवली होती. त्या डिबेटला सावित्री स्वतः हजर न राहता मेश्यू डिकॉस्ता यांना पाठविले. त्याचवेळी लोक म्हणू लागले, उद्या आमदार म्हणून जिंकून आल्या, तर तिथेही मेश्यूलाच पाठविणार का? असे म्हणतात सांगेच्या लोकांनी त्याचवेळी सावित्रींना पाडण्याचे ठरविले.

बाबू कवळेकरांना भोवला पंगा

एरव्ही केपे मतदारसंघात बाबू कवळेकर पराभूत होतील याचा कोणी स्वप्नातही विचार केला नसेल, पण कवळेकर हरले हे आता वास्तव आहे. सांगे मतदारसंघात सुभाष फळदेसाईंविरुद्ध आपली पत्नी सावित्री कवळेकर यांना उमेदवारी देऊन कवळेकरांनी सुभाष विरुद्ध पंगा घेतला. आपल्या पत्नीला उमेदवारी मागे घेण्याचा प्रयत्नही त्यांनी केला नाही. ही दुसरी वेळ आहे. त्यामुळे यावेळी केपे मतदारसंघातील देसाई समाजाच्या मतदारांनी यावेळी त्यांच्यावर राग काढला असे आता तेथील लोक बोलायला लागले आहेत.

सांगेकरांची ती भविष्यवाणी ठरली खरी!

अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणे हे गैरच. मात्र, कधी कधी अशा अंधश्रद्धा खऱ्या ठरतात तेव्हा जनतेला त्यावर विश्वास ठेवणे भाग पडते. सांगे मतदारसंघातील सावित्री समर्थक त्रिकुटाबद्दल आपण याच सदरात लिहिले होते, हे त्रिकुट ज्याला पाठिंबा देते तो उमेदवार निश्‍चित पडतो असे सांगेकर वारंवार सांगत आले आहेत.

त्यांनी ज्या ज्यावेळी ज्या उमेदवाराला पाठिंबा दिला तो उमेदवार हरलेलाच आहे. या त्रिकुटाचे समर्थन घेऊ नका असे सावित्रींच्या जवळच्यांनी बजावले होते. मात्र, सावित्रींनी त्या त्रिकुटाचे समर्थन घेतले आणि सावित्री जिंकता जिंकता हरल्या. त्या त्रिकुटाने आपला रिकोर्ड मात्र कायम ठेवला. बिचाऱ्या सावित्री!

ढवळीकरांचे स्वप्न अधुरे!

मतमोजणीच्या काही दिवसांआधी मगो पक्षामध्ये चैतन्य होते. त्यांच्याशिवाय भाजप किंवा काँग्रेस सत्ताच स्थापन करू शकणार नाही असा ठाम विश्‍वास होता व मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी या दोन्ही पक्षांना पाठिंबा देण्याऐवजी त्यांनीच मगोला आधार द्यावा असे वक्तव्य करून सत्ता स्थापनेसाठी मगो मागे नाही असे संकेत दिले होते. मुख्यमंत्री पदासाठीही आपण दावेदार असल्याचे अप्रत्यक्षपणे दाखवून दिले होते.

मात्र, त्यांच्या स्वप्नांचा फुगा फुटला. 5 जागांची स्वप्ने पाहणाऱ्या मगोला 2 जागांवर समाधान मानावे लागले आणि असलेली स्वप्ने धुळीस मिळाली. गेल्या अडीच वर्षापासून सरकारमधून बाहेर असलेले सुदिन ढवळीकर हे सत्तेसाठी आसुसलेले होते. त्यांनी भाजपला कोणत्याही अटी न घालता पाठिंबा दिला आहे. डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये जाणार नाही असे वक्तव्य करणारे ढवळीकर सत्तेसाठी किंवा कामे होण्यासाठी भूमिका बदलणार की वक्तव्याशी ठाम राहणार याबाबत लोकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

‘त्या’ पैशांचा हिशोब घेणार

निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवाराला निवडणुकीसाठी 28 लाख रुपये खर्च करण्याची सीमा घातली होती. मात्र, आपल्या उमेदवारांनी कायद्याने 12 लाखांच्या वर पैसे खर्च केले नसले तरी किती पैशांचा चुराडा झाला याचा हिशोब लागणार नाही. काही मतदारसंघांत एका मताला दहा हजार रुपये दाम दिल्यामुळे एका उमेदवाराने किती कोटी खर्च केले, याचा हिशोब लावणे कठीण. उमेदवारांनी जवळच्या कार्यकर्त्यांना व स्थानिक लोकप्रतिनिधींकडे मते आणण्यासाठी लाखो रुपये दिले होते. आपल्या बुथवर एवढी मते मिळणार, असा दावा स्थानिक नेते करीत होते. आता निकालानंतर उमेदवार बूथवर पडलेल्या मतांचा हिशोब नक्कीच घेणार.

बाबू कवळेकरांना भाजपनेच नाकारले

बाबू कवळेकर हे केप्यात हरण्यासाठी भाजपचे मूळ कार्यकर्तेच जबाबदार असल्याचे सांगितले जाते. बाबूंनी केपेत बराच पैसा ओतला, पण त्याचा फायदा झाला नाही. केपेचे भाजपचे स्थानिक नेते योगेश कुंकळयेकर वगैरेंनी यावेळी कवळेकर यांच्या विरोधात उघड काम केले. बाबूंना केपेत जिंकून यायचे असेल, तर त्यांनी सांगेतून सावित्री यांना मागे घ्यावे अशी मागणी कुंकळयेकर व इतरांनी केली होती, पण त्यांना ‘अंडर इस्टीमेट’ करण्यात आले. शेवटी त्याचे पर्यवसान म्हणजे बाबू आणि सावित्री दोघेही आपटले.

मगोला आली उपरती...

या निवडणुकीत मगो पक्ष सत्ता स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावेल असा आडाखा बांधण्यात आला होता. खुद्द मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी तर भाजपविरोधात मोठे विधान केले होते. शेवटी सगळे फोल ठरले ना. असे भाजप कार्यकर्तेच बोलत आहेत. आता तर मगोला सत्तेत सहभागी व्हायचे आहे. त्यामुळेच तर शितापुढे मीठ खाऊ नये ते यासाठीच. असेही बोलायला भाजप कार्यकर्ते आता मागे पुढे पाहत नाहीत. काळाचा महिमा म्हणतात तो हा असा. ∙∙∙

सांताक्रुझमधून ‘हाफ चड्डी’ गुल

सांताक्रुझ मतदारसंघात व्हिक्टोरिया फर्नांडिस यांचे पुत्र रुडॉल्फ ऊर्फ बाबा फर्नांडिस याला मतदारांनी निवडून देताना भाजपचे उमेदवार टोनी फर्नांडिस यांची मात्र ‘हाफ चड्डी’ गुल केली आहे. सांताक्रुझ मतदारसंघातून कमळ फुलवण्यात टोनी कमी पडले. आतापर्यंत या मतदारसंघामधून काँग्रेस व्यतिरिक्त इतर कोणत्याच पक्षाचा उमेदवार निवडून आलेला नाही. मागील निवडणुकीत टोनी काँग्रेसमध्ये होते त्यामुळे रुडॉल्फने अपक्ष निवडणूक लढविली होती. मात्र, यावेळी टोनी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर मतदारांनी त्याला योग्य धडा शिकवण्याचा निर्णय घेतला होता.

त्यामुळे काँग्रेसने रुडॉल्फ यांना उभे केले. जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी काँग्रेसच्या उमेदवार निवडून आली होती. त्यामुळे टोनी फर्नांडिस यांना भाजप तिकीट देण्याबाबतही शेवटपर्यंत निर्णय होत नव्हता. मात्र, त्याला तिकिट दिल्यानंतर टोनी यांनी सांताक्रुझ मतदारसंघातील सर्व पंचायती आपल्याकडे असल्याचा दावा केला. मात्र, या पंचायतीच्या सदस्यांसोबत मतदार नव्हते हे आजच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे.

तवडकरांना राजयोग

या निवडणुकीत भाजपसाठी काणकोण व मांद्रे हे दोन मतदारसंघ जास्त प्रतिष्ठेचे होते. कारण त्या दोन्ही ठिकाणी भाजप विरुध्द भाजप अशीच लढत होती. मांद्रेत तर भाजपच्या सोपटे विरुध्द माजी मुख्यमंत्री पार्सेकर व काणकोणात तवडकरांविरुध्द भाजपचेच विजय पै खोत व इजिदोर फर्नांडिस रिंगणात होते. खोत यांनी तर विजयाचा नव्हे, तर रमेशचा पराभव हेच ध्येय मानले होते, पण मतदारांनी रमेशची बाजू उचलून धरली. कदाचित त्यांना राजयोग असावा अशी चर्चा चावडीवर सुरू होती.

देवालयाच्या निवडणुकाही होणार जंगी!

‘कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है’ असे म्हणतात ते खरेच. पद मिळविण्यासाठी खर्च करावा लागतो हे आम्ही सांगण्याची गरज नाही. विधानसभेच्या निवडणुकीचा शिगमा सरला, आता देवालय निवडणुकीचा शिगमा सुरू झाला आहे. देवालयात सेवा देण्यास इच्छुक असलेले दानवीर महाजन उमेदवार महाजन मतदारांना आकर्षित करण्यासाठी ‘गेट टुगेदर’साठी सढळ हस्ते खर्च करीत आहेत. आता देवालय निवडणुकीतही असे होऊ लागले तर देवच वाचवू शकेल लोकशाहीला.

‘साबांखा’वाल्यांची कुचंबणा

काणकोणमधील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना तेथील काँग्रेस नेत्यांशी कसे वागावे, हेच कळेनासे झाले आहे. या नेतेमंडळींनी मडगावात जाऊन त्या खात्याच्या वरिष्ठांना घेराव घातला. यावेळी कॉंग्रेस नेत्यांनी गुळे ते माशे या महामार्गाच्या हॉटमिक्स कामाच्या दिरंगाईबद्दल जाब विचारला. त्यानंतर त्यांनी ते काम सुरू केल्यावर आता ते निकृष्ट असल्याचा कांगावा करत आहेत. त्यामुळे या लोकांशी कसे वागायचे? कामाचा दर्जा तपासायला हे त्यातील तज्ज्ञ आहेत का? अशी विचारणाही ते खालच्या सुरात करत आहेत.

उल्हास यांनी राखला सासष्टीचा गड

सासष्टी तालुक्यातील आठही मतदारसंघात भाजपाने उमेदवार उतरविले होते. चार मतदारसंघात अनामत रक्कम जप्त झाली. मात्र, नावेली मतदारसंघात बड्या बड्या नेत्यांना हरवून भाजपाचे उल्हास तुयेकर जायंट किलर ठरले. मनोहर पर्रीकर व डॉ. प्रमोद सावंत यांचे मिशन सासष्टी जरी यशस्वी झाले नसले, तरी एका सामान्य गाडेवाल्याने सासष्टीत भाजपाचा झेंडा रोवला. आता भाजपाने उल्हास यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन सासष्टीची ज्योत प्रज्ववलीत करावी अशी अपेक्षा आम्ही नव्हे सासष्टीतील भाजप कार्यकर्ते करीत आहेत. जर असे झाले तर एका प्रामाणिक कार्यकर्त्याचा तो सन्मान ठरेल.

‘अजीब है ए गोवा के लोग’

विधानसभा निवडणुकीच्या निकालाने 1963 नंतर पुन्हा एकदा गोव्याने साऱ्या देशाला पंडित नेहरूंच्या वरील उद्‌गारांचा प्रत्यय आणून दिला आह़े. कारण निवडणुकीला काही महिने असताना सर्व थरांतून भाजप सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात होते. विरोधी पक्षांसह सर्वांनीच भाजप एकेरी संख्येवर येईल अशी भाकिते करून नवे सरकार स्थापन करण्याची तयारी केली होती, पण मतदारांनी त्या सर्वांना चांगलाच इंगा दाखवला. त्यामुळे निकाल गृहीत धरून आखलेल्या पार्ट्यांचा मात्र फज्जा उडाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT