पणजी: नववर्षाच्या स्वागतासाठी यंदा राज्यात आलेल्या पर्यटकांच्या संख्येत गतवर्षीच्या तुलनेत घट झाल्याचा दावा होत असून, मोठा फटका पर्यटनाशी संबंधित उद्योग, व्यवसायांना बसल्याची खंत गोवा हॉटेल्स अँड रेस्टॉरंटचे अध्यक्ष गौरीश धोंड आणि ट्रॅव्हल्स अँड टुरिस्ट संघटनेचे अध्यक्ष जॅक सुखिजा यांनी गुरुवारी ‘गोमन्तक’शी बोलताना व्यक्त केली.
गतवर्षी राज्यात संपूर्ण पर्यटन हंगामात देशी अणि विदेशी मिळून सुमारे १.४ कोटी पर्यटक राज्यात दाखल झालेले होते. त्यात देशी पर्यटकांची संख्या सुमारे ९९.४१ लाख इतकी, तर विदेशी पर्यटकांची संख्या सुमारे ४.६७ लाख इतकी होती.
यातील बहुतांशी पर्यटक हे २५ ते ३१ डिसेंबर या काळात दाखल झालेले होते. पर्यटकांच्या वाढलेल्या संख्येमुळे गतवर्षी या काळात राज्यातील सर्वच प्रकारची हॉटेल्स फुल्ल झालेली होती. किनाऱ्यांवर पर्यटकांची तोबा गर्दी पाहायला मिळालेली होती. परंतु, यंदा मात्र या काळात पर्यटकांच्या संख्येत घट झाल्याचा दावा धोंड आणि सुखिजा यांनी केला.
पर्यटन हंगामात आणि विशेषकरून नाताळ, नववर्ष साजरे करण्यासाठी राज्यात दरवर्षी देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत असतात. बहुतांशी पर्यटक विमान प्रवासास प्राधान्य देत असतात. अशातच यंदा गत महिन्यात कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे इंडिगोची सेवा काही दिवस ठप्प झाली. त्यामुळे अनेक पर्यटकांनी गोव्याकडे पाठ फिरवल्याने त्याचा परिणाम पर्यटनावर झाल्याचे जॅक सुखिजा म्हणाले.
दुसरीकडे गत महिन्यात हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन क्लबला आग लागून त्यात २५ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे भीतीपोटी अनेक पर्यटकांनी गोव्याऐवजी आजूबाजूचे देश आणि इतर राज्यांना प्राधान्य दिले. त्यामुळेही यंदा पर्यटकांची संख्या घटल्याचेही त्यांनी नमूद केले.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा पर्यटकांची संख्या काही प्रमाणात कमी झाली. राज्यात आलेल्या अनेक पर्यटकांनी हॉटेल्समध्ये निवास करण्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा राज्यातील हॉटेल्स हाऊसफुल्ल झाली नाहीत, असे प्रसिद्ध व्यावसायिक गौरीश धोंड म्हणाले.
मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी नववर्षानिमित्त बायणा किनाऱ्यावर ३१ डिसेंबरला रात्री आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजारो नागरिकांनी उपस्थिती लावून आनंद लुटला. आमदार संकल्प आमोणकर यांच्यासह नगरसेविका श्रद्धा आमोणकर यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
अशाप्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्याचे हे तिसरे वर्ष आहे; पण यंदा मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व होता. विविध प्रकारचे करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. नृत्य, संगीताचा अनेकांनी मनमुराद आनंद लुटला. नववर्षाच्या स्वागतासाठी जमलेले नागरिक या कार्यक्रमाबद्दल आमोणकर यांचे कौतुक करीत घरी परतले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.