

पणजी: नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची गर्दी लक्षात घेता गोवा पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर आणि दक्षिण गोव्यात १०० पेक्षा जास्त महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी आणि कडक तपासणी केली जाणार आहे.
या बंदोबस्तासाठी नुकतेच प्रशिक्षण पूर्ण करून परतलेले ७०० आयआरबी जवानदेखील तैनात करण्यात आले आहेत. यामुळे पोलिस दलाचे संख्याबळ लक्षणीयरीत्या वाढले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी नियमित पोलिसांसह विविध विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.
किनारपट्टीवरील भागांत पर्यटकांच्या सुरक्षेसाठी टूरिस्ट आणि कोस्टल पोलिस कार्यरत करण्यात आले आहेत तसेच कोणत्याही संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्यासाठी एटीएस आणि बॉम्ब शोधक पथक तैनात केल्याची माहिती पोलिस महासंचालकांनी दिली. गर्दीच्या ठिकाणी तपासणीसाठी श्वान पथकदेखील तैनात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
७०० नवीन जवानांच्या उपलब्धतेमुळे आता पोलिसांची उपस्थिती अधिक वाढणार आहे. सायंकाळी आणि उशिरा रात्रीपर्यंत पोलिसांची गस्त सुरू राहणार आहे. आमच्याकडे आता पुरेसे संख्याबळ आहे. पर्यटकांना किंवा स्थानिकांना कोणताही त्रास दिला जाणार नाही. मात्र, सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. सर्व काही रितसर आणि शिस्तीत सुरू राहील यावर आमचा भर आहे, असे आलोक कुमार यांनी स्पष्ट केले.
नववर्षाच्या काळात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे. मद्यपान करून वाहन चालवणे आणि वेगाने गाड्या चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. गर्दीच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अतिरिक्त वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले आहेत, असेही आलोक कुमार यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.