पणजी (सारिका शिरोडकर) : चिरे आहेत; पण सिमेंट नाही. रेती आहे; पण खडी नाही. अशा स्थितीत घर बांधायचे तरी कसे? सरकारकडून काहीजणांना दोन लाख रुपयांची मदत मिळाली. मात्र, या दोन लाखांत घर बांधावे तरी कसे, या विवंचनेत सध्या गुळेलीतील (Guleli Flood) काही पूरग्रस्त आहेत. सत्तरी (Sattari) तालुक्याला सहा महिन्यांपूर्वी महापुराचा जोरदार फटका बसला होता. यात गुळेलीतील अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अजूनही त्यांचे संसार आभाळाखालीच आहेत.
‘गोमन्तक’ने शुक्रवारी गुळेली गावाचा खास दौरा केला. सगळीकडे नववर्षोत्सवाचा आनंद साजरा करण्याची धूम असताना गुळेलीवासियांच्या जीवनात मात्र अंधाराशिवाय काहीच नाही. आजही ते महापुराच्या आठवणींनी भेदरतात. महापुराच्या (Goa Flood) आठवणी सांगताना त्यांचे डोळे पाणावतात. नुकसान भरपाईच्या नावाखाली सरकारकडून मिळालेली तुटपुंजी मदत म्हणजे पूरग्रस्तांची क्रूर चेष्टाच आहे. अशा सर्वसामान्यांची आठवण मायबाप सरकारला कशी काय येत नाही, असा सवाल केला जात आहे.
काहींचा संसार शिशुवाटिकेत
गांजे येथील सरस्वती शिशुवाटिकेत काही महिलांनी गेल्या पाच महिन्यांपासून संसार थाटला आहे. महापुरात घर गेले. कपडेही वाहून गेले. सहा महिन्यांपासून आम्ही कष्टप्रद जीवन जगत आहोत. पण शिशुवाटिका सुरू झाल्यानंतर कुठे जायचे, हे आम्हाला ठाऊक नाही. सरकारच्या दोन लाखांमध्ये घर कसे बांधायचे, या विवंचनेत मी आहे, असे सोनिया गावकर यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले.
भरपाईच्या नावाखाली बोळवण
पार्वती फडते म्हणाल्या, नुकसान भरपाई म्हणून सरकारने दोन लाख दिले. घर बांधण्यासाठी हे पुरसे नाही. त्यामुळे आम्ही घर बांधू शकलो नाही. काही जणांना केवळ सहा हजार रुपयेच मिळाले. मात्र या तोकड्या पैशांत घर होणार का, असा सवाल सायली गावकर यांनी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.