Rohan Khaunte पर्यटन क्षेत्रातील साधन सुविधांची निर्मिती, पर्यटन आकर्षण स्थळांचा विकास, पर्यटकांची सुरक्षा आणि बेशिस्तीला आळा घालण्यासाठी नव्या पर्यटन धोरणाला चालना देणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी दिली आहे.
राज्यात होऊ घातलेल्या पर्यटन विकासाच्या विविध योजनांची माहिती मंत्री खंवटे यांनी दैनिक गोमंतकला दिली. ते म्हणाले राज्यात पर्यटन क्षेत्राचा विकास झपाट्याने होत आहे. अगदी 20- 30 वर्षांपूर्वीची पर्यटक संख्या आता लाखो, कोटींच्या घरात गेली आहे.
यात विदेशी पर्यटकांचा भरणा ही जास्त आहे. त्या तुलनेत राज्यात पर्यटनाच्या साधन सुविधांचा विस्तार, पर्यटकांसाठी असलेल्या पर्यटन स्थळांचा विकास, पर्यटकांची सुरक्षा आणि या व्यवसायात घुसलेल्या बेकायदेशीर आणि बेशिस्तीला आळा घातल्याशिवाय पर्यटन क्षेत्र विस्तारणार नाही.
पर्यटन खात्याच्या वतीने सध्या अनेक प्रकल्पांची पुनर्बांधणी सुरू असून विविध धोरणांची अंमलबजावणी सुरू झाली. काही योजना पूर्णत्वास गेल्या आहेत. याचा लाभ भविष्यातील पर्यटनाला नक्कीच होईल, असेही म्हणाले.
अनेक देशांमध्ये रोड-शो
मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत मंत्री म्हणाले, हे विमानतळ गोव्याच्या पर्यटनासाठी ‘गेम चेंजर’ बनत आहे. सध्या या विमानतळावरून देशांतर्गत विविध शहरांसाठी सरळ विमान सेवा सुरू झाली आहे.
यात जम्मू कश्मीर, उत्तराखंड ,राजस्थान, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल कर्नाटक, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र तामिळनाडू राज्यातील मुख्य २१ शहरांचा समावेश आहे. ही शहरे आता गोव्याला सरळ जोडली गेल्याने गेल्या तीन-चार महिन्यांत लाखो पर्यटक गोव्यात आले आहेत.
येत्या काही महिन्यात या विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होईल. याचा फायदा संबंधित देशांमधून येणाऱ्या पर्यटकांना नक्कीच होईल आणि विदेशी पर्यटकांमध्ये भर पडेल.
आम्ही केवळ युके आणि रशियाच्या पर्यटकांवरती अवलंबून होतो; पण कोरोना काळात विदेशी पर्यटकांची संख्या झपाट्याने घटली हे लक्षात घेऊन अनेक देशांमध्ये रोड-शो करत आहोत.
सध्या नवीन काय?
1. आम्ही पर्यटकांना वेगवेगळ्या नव्या संधी उपलब्ध करून देत आहोत. समुद्र स्पोर्ट्स, पर्यटनासह वैद्यकीय पर्यटन, आध्यात्मिक पर्यटन, राज्यांतर्गत हिंटरलँड पर्यटन, ॲडव्हेंचर आणि जंगल पर्यटनाचा समावेश आहे.
2. राज्यात नव्याने सुरू झालेल्या आयुष मंत्रालयाच्या रुग्णालय आणि संशोधन केंद्रामुळे आरोग्य क्षेत्रातील पारंपरिक उपचार प्रणाली आणि उपचार पद्धतींचा विस्तार होत आहे. योग आयुर्वेद होमिओपॅथी सारख्या उपचार पद्धती उपलब्ध होत आहेत याचा लाभ वैद्यकीय मेडिकल पर्यटनाला नक्कीच होईल.
3. आध्यात्मिक पर्यटनासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. सरकारने सप्तकोटेश्वराच्या मंदिराचा संपूर्ण विकास करत पुनर्बांधणी आणि संवर्धन केले आहे. याशिवाय राज्यातील अनेक मंदिरे, चर्चेस यांच्या विकासासाठी ही विशेष लक्ष देण्यात येत आहे.
4. केंद्र सरकारच्या ''पर्यटन गाव विकास'' या योजनेअंतर्गत राज्यातील दहा गावांचा विकास पर्यटनाच्या अँगलने करण्यात येणार आहे. या गावांच्या पंचायतींना केंद्राकडून ५० लाख रुपये देण्यात येत आहेत.
क्षेत्र विस्तारासाठी प्रयत्न
खंवटे पुढे म्हणाले राज्य सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. अजूनही अनेक बाबी ठिकाणावर बसायच्या आहेत. मात्र ज्या पद्धतीने पर्यटन क्षेत्राच्या विकासाची कामे सुरू आहेत, ती पाहता येत्या काही महिन्यात पर्यटन क्षेत्राला नवी दिशा मिळेल.
कोणत्याही क्षेत्राचा सर्वांगीण विकास करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. गोव्याला यापूर्वीच आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला आहे.
देश-विदेशातून लाखो लोक गोव्याला आवर्जून येतात. त्याचा ह्या क्षेत्रातील व्यावसायिकांना नक्कीच लाभ होतो आहे. आता या क्षेत्राच्या विस्तारासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
बेशिस्तीबाबत सडेतोड विचार
ते म्हणाले, काही लोक या पर्यटन क्षेत्राला गालबोट लावण्याचे लावण्याचे काम करत आहेत. अमली पदार्थ, वेश्या व्यवसाय, डान्सबार सुरू आहेत. दलालांकडून (स्टाउटगिरी) पर्यटकांची लूट सुरू आहे. अशा अनेक तक्रारी समोर येत आहेत.
हे टाळण्यासाठी पोलीस आणि पर्यटन खात्याने संयुक्त बैठक घेतली आहे. यापुढे पर्यटन क्षेत्रातील बेकायदेशीर बाबींवर आळा घालण्यासाठी ठोस निर्णय घेतले जाणार आहेत.
पर्यटन क्षेत्रातील नियम, कायदे जुने झाले आहेत. आता यासाठीच शॅक धोरण, व्यवसाय धोरण (ट्रेड पॉलिसी) यात बदल करण्याचे काम सुरू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.