
परवा मडगावात आणखी एक मल्टिप्लेक्स थिएटर सुरू झाले. मडगावच्या बाबांनी उद्घाटन केले. त्यावेळी त्यांनी केवळ सिनेमाप्रति आपले प्रेम विषद केले नाही तर आपल्या पूर्वीच्या सिनेमांबद्दलच्या अनेक आठवणीही सांगितल्या. त्यामुळे उपस्थितांची करमणूकही झाली. पण मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा पाहण्यासाठी येणाऱ्यांनी आपली वाहने कुठे पार्क करायची, असा प्रश्न अनेकांनी केला. पूर्वी तेथे एकच सिनेमागृह होते. आता तेथे एक मॅाल व त्यानंतर परवापासून मल्टिप्लेक्स झाले आहे. असे म्हणतात की, गोवा मुक्तीनंतर येथे थिएटर सुरू करण्याचा बेत सुरू झाला तेव्हा म्हणे प्रमुख स्वातंत्र्यसैनिकांनी पार्किंगच्या मुद्यावरून त्यास विरोध केला होता. पण आता तसा विरोध करणारे कुणी नाहीत का? ∙∙∙
रस्त्यांवरील खड्ड्यांचा मुद्दा आता केवळ सार्वजनिक त्रासाचा न राहता थेट राजकीय रणधुमाळीचं केंद्र बनला आहे. सत्ताधारी पक्षाला याचा किती ‘खड्डा’ पडतो, हे कळेलच. या विषयावर नेहमीची टीका न करता, ‘आप’ने एक अनोखी शैली अवलंबली. प्रथम पणजी ते पर्वरी दरम्यानच्या खड्डेमय रस्त्यांवरून काढलेली दुचाकी फेरी भलतीच गाजली. पण खरी चर्चा तर आता सुरू झाली आहे. ‘आप’च्या आमदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी थेट मंत्रालयात जाऊन रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दलची लाखो लोकांच्या सह्या असलेली तक्रारच दाखल केली. याचा अर्थ स्पष्ट आहे... हा फक्त रस्त्याचा प्रश्न नाही तर लोकांचा आवाज आहे. साहजिकच ‘आप’चा आवाज राज्यभर घुमला. ‘खड्डा’ ते ‘सही’ असा हा प्रवास लक्षवेधक ठरला. आता हा ‘आप’चा रस्त्यावरील संघर्ष आगामी निवडणुकीत मतांमध्ये रूपांतरित होतो की केवळ लोकांना आकर्षित करून राहतो, हे बघावे लागेल. ∙∙∙
गत विधानसभा निवडणुकीत विधानसभेच्या दोन जागा जिंकल्यापासून ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोवा काबीज करण्याचे स्वप्न बाळगले होते. तेव्हापासून ते आणि माजी मुख्यमंत्री आतिशी वारंवार गोव्याला भेट देऊन आगामी जिल्हा पंचायत आणि विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. आता केजरीवाल यांनी काँग्रेससोबत न जाता वैयक्तिकरीत्या या निवडणुका लढवून गोव्यात ‘राजकीय क्रांती’ घडवून आणण्याचा निर्धार केला आहे. त्या अनुषंगाने ते प्रयत्नही करत आहेत. परंतु, गोव्यातील राजकारण इतर राज्यांतील राजकारणापेक्षा वेगळे असल्याचे माहीत असतानाही केजरीवालांनी ही ‘रिस्क’ का घेतली असेल, याचे उत्तर आता राजकीय जाणकार शोधत आहेत. ∙∙∙
सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत म्हणे आता पंधरा दिवसांत सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येणार आहेत. चांगली गोष्ट आहे, पण हे खड्डे कुठल्या रस्त्यांवर कुठे-कुठे आहेत, ते आधी शोधून काढा आणि मगच रस्ते चकाचक करण्याच्या घोषणा करा, असा सल्ला लोक देऊ लागले आहेत. फोंड्यात तर कोण कुठून येईल आणि रस्ते खोदून जाईल हे सांगता येत नाही. गेली सात-आठ वर्षे रस्ते खोदण्याचे काम सुरूच आहे. पण हे काम करताना कोणत्याच खात्यांमध्ये समन्वय नाही. कारण हॉटमिक्स डांबरीकरण केलेले रस्तेसुद्धा फोडण्यात येतात. काय म्हणावे याला? ∙∙∙
निवडणुका जवळ आल्यानंतरच इतर पक्षांबाबत युती करण्याचा निर्णय घेतला जाईल असे वारंवार सांगणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सोमवारी एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत मात्र लोकांना हवी असल्यास गोवा फॉरवर्ड आणि रिव्हॉल्युशनरी गोवन्स (आरजीपी) या पक्षांशी युती करण्याची तयारी दाखवली. विरोधकांच्या युतीसाठी गेले काही महिने झटत असलेले गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाईंनी प्रदेश काँग्रेसचा ‘नाद’ सोडत ‘आरजीपी’शी जवळीक साधली. ‘आरजीपी’चे अध्यक्ष मनोज परब यांनीही काही दिवसांपूर्वी युतीबाबत आपली गोवा फॉरवर्डशी चर्चा सुरू असल्याचे जाहीर केले. हे दोन पक्ष एकत्र येऊन काँग्रेसला धडा शिकवू शकतात, याची जाणीव झाल्यामुळे पाटकर युतीसाठी लगेच तयार झाले नाहीत ना, अशी चर्चा आता मतदारांमध्ये सुरू झाली आहे. ∙∙∙
‘शंभर अपराधी सुटले तरी चालतील, मात्र एका निरपराध्याला शिक्षा होता कामा नये’ या घोषवाक्यावर आपली न्यायव्यवस्था चालते. म्हणूनच जनतेचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. कुंकळ्ळी पालिका क्षेत्रातील कुंकळ्ळी औद्योगिक वसाहत ही केवळ राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वांत प्रदूषणकारी औद्योगिक वसाहत म्हणून कुप्रसिद्ध झाली आहे. याच औद्योगिक वसाहतीच्या बाहेर आणखी एक फिश मिल उभारण्यासाठी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे मागितलेली परवानगी मंडळाने नाकारली. त्यामुळे त्या फिश मिलचे मालक आता न्यायालयात गेले आहेत. हा फिश मिल प्रकल्प प्रदूषणकारी नाही. साफ, स्वच्छ असलेल्या चांगल्या प्रकल्पाला परवानगी नाकारणे अन्यायकारक असल्याचे फिश मिलच्या मालकाचे म्हणणे आहे. हा प्रकल्प आमच्यामुळे बंद झाला म्हणून सेलिब्रेशन करणाऱ्यांना आता न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार हे निश्चित. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.