
पणजी: आगामी विधानसभा निवडणुकीला चौदा महिने बाकी आहेत. भाजपचे मजबूत संघटन आव्हान ठरण्याची चिन्हे स्पष्ट झाल्यानंतर आता ‘आप’ वगळता इतर भाजपविरोधी पक्ष एकत्र येण्यासाठी सकारात्मकता दर्शवत आहेत.
‘राज्यात होणाऱ्या आगामी निवडणुकांत भाजपला पराभूत करण्यासाठी गरज पडल्यास गोवा फॉरवर्ड आणि रिव्हॉल्युशनरी गोवन्स (आरजीपी) या दोन पक्षांना सोबत घेऊन जाण्यास आपण तयार आहोत’, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सोमवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. तर ‘आरजी’चे मनोज परब यांनीही ‘गोवा प्रथम’ ह्या तत्वाला अनुसरून किमान समान कार्यक्रम आखून इतर पक्षांसोबत चर्चेच्या तयारीचा पुनरुच्चार केला आहे.
‘आप’ने मात्र भाजपसह काँग्रेसवर टीका कायम ठेवली आहे. राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी ज्या भागात काँग्रेस बळकट आहे, अशा भागांमध्ये सभा घेऊन काँग्रेसवर निशाणा साधला. आगामी जिल्हा पंचायत, विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारीही आपने केली आहे.
दरम्यान ‘येत्या निवडणुकांमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी युती करणे आवश्यक आहे’, असे जनतेला वाटल्यास आपण गोवा फॉरवर्ड आणि आरजीपीला सोबत घेऊन जाण्यास तयार असल्याचे पाटकर यांनी स्पष्ट केले आहे. विरोधकांत ऐक्याच्या दृष्टीने ही महत्वाची भूमिका ठरू शकते. जिल्हा पंचायत, पालिका, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने आपापला पक्ष बळकट करण्यास सुरुवात केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलासंदर्भात वरिष्ठांनी आपल्यासोबत अजूनपर्यंत चर्चा केलेली नाही. त्यामुळे या विषयावर आपण काहीही बोलू शकत नाही, असे पाटकर म्हणाले. तर, गिरीश चोडणकर यांच्यासंदर्भात विचारले असता, चोडणकर काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.