Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: जीएमसी वैद्यकीय तरुणीच्या मृत्यू प्रकरणात 'ड्रग्ज' अँगल समोर! फॉरेन्सिक रिपोर्टने गोव्यात खळबळ

GMC Trainee Death Case: वैद्यकीय प्रशिक्षणार्थी तरुणीच्या गूढ मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळाले असून प्राथमिक विषतपासणीत तिच्या रक्तात गांजासदृश अंमली पदार्थाचे प्रमाण आढळल्याची माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील (जीएमसी) २३ वर्षीय वैद्यकीय प्रशिक्षणार्थी तरुणीच्या गूढ मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळाले असून प्राथमिक विषतपासणीत तिच्या रक्तात गांजासदृश अंमली पदार्थाचे प्रमाण आढळल्याची माहिती समोर आली आहे. या निष्कर्षामुळे मृत्यूपूर्वीच्या घटनाक्रमाचा तपास करणाऱ्या पोलिसांना महत्त्वाचा धागा मिळाला असून अंमली पदार्थांच्या वापराचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

मूळची केरळ येथील असलेली ही तरुणी जीएमसीमध्ये वैद्यकीय प्रशिक्षण घेत होती. १० जून रोजी सायंकाळच्या सुमारास दोनापावला येथील हवाई बीचवर तिचा मृतदेह आढळून आला होता. समुद्रकिनाऱ्यावरील तुलनेने निर्जन भागात मृतदेह सापडल्याने या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणातील एक महत्त्वाची बाब म्हणजे, मृतदेह सापडला तेव्हा तरुणीने वैद्यकीय प्रयोगशाळेत वापरला जाणारा पांढरा गणवेश परिधान केला होता.

ती त्या ठिकाणी कशी पोहोचली, तिच्यासोबत कोण होते आणि मृत्यूपूर्वी नेमके काय घडले, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. तपासाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरील प्राथमिक विषतपासणीत तिच्या रक्तात गांजासदृश अंमली पदार्थाचे अस्तित्व आढळून आले आहे. आढळलेले प्रमाण तुलनेने जास्त असल्याचा दावा करण्यात येत असून त्यामुळे तपासाचा केंद्रबिंदू आता या दिशेनेही वळला आहे.

तथापि, केवळ रक्तात अंमली पदार्थाचे अंश आढळल्याने मृत्यूचे कारण निश्चित होत नाही, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. अशा पदार्थांच्या सेवनामुळे व्यक्तीची निर्णयक्षमता, संतुलन, आकलनशक्ती आणि हालचालींवरील नियंत्रण कमी होऊ शकते. काही वेळा अतिसेवनामुळे शारीरिक तसेच मानसिक परिणामही गंभीर स्वरूपाचे असू शकतात.

मात्र मृत्यूचा थेट संबंध या पदार्थाशी आहे की नाही, हे अंतिम न्यायवैद्यकीय तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे. या प्रकरणातील अंतर्गत अवयवांचे नमुने पुढील रासायनिक तपासणीसाठी वेर्णा येथील न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण निश्चित करता येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अंतिम निष्कर्षाकडे राज्याचे लक्ष

पोलिसांकडून तरुणीच्या मृत्यूपूर्वीच्या हालचाली, तिच्या संपर्कातील व्यक्ती, अंमली पदार्थाचा संभाव्य स्रोत आणि घटनास्थळी पोहोचण्यामागील कारणांचा सखोल तपास सुरू आहे. अंतिम अहवाल येईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नसल्याचे तपास यंत्रणांनी स्पष्ट केले आहे.

या घटनेमुळे राज्यातील युवक आणि विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांच्या वाढत्या वापराबाबत पुन्हा चिंता व्यक्त केली जात आहे. शैक्षणिक परिसरांमध्ये अंमली पदार्थांची उपलब्धता आणि त्याचा तरुणांवर होणारा परिणाम हा गंभीर सामाजिक प्रश्न बनत असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

त्यामुळे या प्रकरणाचा अंतिम तपास अहवाल आणि त्यातून समोर येणारे निष्कर्ष याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT