चिराग नायक यांचा काँग्रेस प्रवेशाचा कार्यक्रम दुपारच्यावेळी ठेवला होता. काही कारणांमुळे तो लांबला. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर हे जेव्हा भाषण करण्यासाठी उभे राहिले तेव्हा उपस्थितांच्या पाेटात कावळे ओरडू लागले होते. आणि याची जाणीव पाटकर यांना असल्यामुळे त्यांनीही आपले भाषण थाेडक्यात आटोपते घेतले. पण जाता जाता त्यांनी एक गोष्ट सांगितलीच; ते म्हणाले, आमचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे रोज भिवपाची गरज ना, असे म्हणतात. पण चिराग नायक यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे मडगावात आता ‘भाजपला भिवपाची गरज आसा’. यापुढे जाऊन ते म्हणाले, चिराग नायक यांच्या काँग्रेस आगमनामुळे दोन भाजप नेत्यांची झोप उडाली असेल. त्यातील एक मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि दुसरे असतील ते दिगंबर कामत. ∙∙∙
गोव्यात एन.ई.पी २०२० राबविण्यासाठी शिक्षणखात्याने आणि सरकारने कंबर कसली आहे. मात्र ही ‘एनईपी’ची गाडी कंत्राटी शिक्षक हाकणार असल्याने हा मांडलेला खेळ कितपत यशस्वी होतो, त्याकडे शिक्षणतज्ज्ञांचे लक्ष लागून राहिले आहे. सर्व शिक्षा अंतर्गत एका वर्षाच्या कंत्राटावर प्राथमिक शिक्षक,कला , संगीत व इतर शिक्षकांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्याला कसा प्रतिसाद मिळतो, यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत. बहुतेक सरकारी माध्यमिक विद्यालये तासिका तत्त्वावर शिक्षकांच्या मदतीने तग धरून आहेत. आता प्राथमिक स्तरावरही सरकारला कंत्राटी भरती करावी लागत आहे. त्यामुळे सरकारी शाळा विद्यार्थ्यांचे भवितव्य काय?, अशी चर्चा जोर धरतेय. ∙∙∙
जेव्हा बोट बुडायला लागते तेव्हा त्या बोटीवरील उंदीरही पाण्यात उड्या टाकतात, असे म्हणतात ते खरे. बरीच वर्षे राज्यात सत्ता गाजवलेल्या काँग्रेसला गळती लागली, ती एवढी की जो तो नको ही काँग्रेस म्हणत इतर पक्षात गेले. मात्र, आता काँग्रेसला आशेचा चिराग मिळाला आहे. तसे हल्ली काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचे धाडस कोणी करीत नव्हते. मात्र, मडगावच्या चिराग नायक यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे काँग्रेस पक्षात खुशीची लाट पसरली आहे, असे म्हणतात. चिराग म्हणतो आपल्याबरोबर नव्वद टक्के मठग्रामस्थ आहेत. मात्र चिराग काँग्रेस पक्षात आल्यामुळे मडगावात पक्ष सांभाळलेल्या सावियो कुतिन्होंचे काय होणार? ∙∙∙
राज्यात पूर्वी नाक्यानाक्यावर पोलिस उभे राहून चलन फाडायचे. पण आता हे पोलिसच गायब झाले आहेत. फोंडा शहर आणि चौपदरी महामार्गावर तर वाहतूक पोलिस दबा धरून बसायचे. पण सरकारने तालाव द्यायचा अधिकार फक्त उपनिरीक्षकांना असल्याचे जाहीर केल्याने वाहतूक व्यवस्था सांभाळणारे पोलिस गायब झाले आहेत. ‘आवो जावो घर तुम्हारा’ असा प्रकार सध्या राज्यात घडला असून फोंड्यात तर अल्पवयीन मुले दुचाकी भन्नाट पळवत आहेत, आणि त्यांना आवरायला कुणीच नाही. काय हे...! ∙∙∙
राज्यासह पणजी शहरात गेले तीन दिवस धुवांधार पाऊस पडत आहे. त्यातच स्मार्ट सिटी योजनेंतर्गतची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी कंत्राटदार धडपडत आहे. पणजी महापालिकेचे कर्मचारी रस्त्यांवर तुंबलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी भरपावसात काम करत आहेत. अजून पाऊस सुरू झालेला नाही, तोच दाणादाण उडालेल्या पणजी शहराचे पुढील तीन महिने काय होईल, याचा अंदाजच लावता येत नाही. पणजी पोलिस स्थानकासमोरील रस्ता हल्लीच खोदून नव्याने करण्यात आला. तेथील पदपथाचेही काम करण्यात आले. मात्र, पाणी निचरा होण्यासाठी आवश्यक असलेले चर ठेवण्यातच न आल्याने पाणी तुंबले. महापालिका कर्मचारी या पाण्याचा निचरा होण्यासाठी भरपावसात कुदळ व खोरे घेऊन खोदकाम करत होते. त्यामुळे स्मार्ट सिटी योजनेंतर्गत असलेली कामे ही अधिक ‘स्मार्ट’ झालीत असेच म्हणावे लागले. पणजी शहर अधिक ‘स्मार्ट’ बनवण्याच्या नादात अनेक ठिकाणी राहिलेल्या त्रुटी येत्या पावसात उघड्या पडणार हे नक्की. स्मार्ट सिटीचे काम पाहणारे नोडल अधिकाऱ्यांचीही गोव्यातून बदली झाली आहे. त्यामुळे या स्मार्ट सिटीचे पावसाळ्यातील भवितव्य काय, अशी भीती लोकांना सतावतेय. ∙∙∙
सरकारी खात्यामध्ये कामचुकार कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल, अशा इशारा मुख्यमंत्र्यांनी एका वर्षापूर्वी दिला होता व स्वतःच काही सरकारी खात्यामध्ये अचानक भेटी देऊन तेथील कर्मचाऱ्यांना झलक दाखवली होती. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून काही मंत्र्यांनीही आपापल्या खात्यात भेटी दिल्या तसेच कार्यालयात उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्पष्ट संकेत दिले होते. कालांतराने या भेटी देण्यात वेळ व्यर्थ घालवण्यापेक्षा त्यांनी ही जबाबदारी अधिकाऱ्यांवर सोपवली. मात्र, सरकारमधील एकमेव मंत्री असे आहेत की ते आपल्या खात्यामधील प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या शिस्तीबाबत तसेच लोकांना ताटकळत ठेवून कामात विलंब करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यासही घाबरत नाहीत. ते आहेत आरोग्यमंत्री विश्वजित राणे. त्यांनी गेल्या काही दिवसांत आरोग्य तसेच अन्न व औषध प्रशासन खात्यातील कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याबरोबरच काहींना घरी पाठवले. त्यांचा निर्णय ‘ऑन द स्पॉट’ असल्याने त्यांच्या या धडक कारवाईमुळे कर्मचाऱ्यांच्या ह्रदयात धडकी भरली आहे. ∙∙∙
सदानंद या नावाची फोड सदैव आनंदी असणारा अशी उपराष्ट्रपती जगदीश धनकड यांनी गुरुवारी केली. खासदार सदानंद शेट तानावडे यांनी राज्यसभेत पाऊल ठेवल्यानंतर कोणती छबी निर्माण केली याचे नेमके उत्तर उपराष्ट्रपतींनी तानावडे यांच्याविषयी काढलेल्या उद्गारातून मिळाले. ते म्हणाले, सदाच सक्रिय, उत्साही व शिस्तप्रिय संसदपटू तानावडे आहेत. त्यांना मी सदैव आनंदी असणारे म्हणूनच ओळखतो. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पिठासीन अधिकारी असले तरी राज्यसभेतील २५० खासदारांतून त्यांनी तानावडे यांचे वैशिष्ट्य टिपले हे तितकेच महत्वाचे. ∙∙∙
सरकारने सुरू केलेली ‘म्हजी बस’ ही योजना विशेषतः ग्रामीण भागांतील रहिवाशांना दिलासा देत होती.खोतीगाव सारख्या दुर्गम भागांतील लोकांचे अन्यथा रविवार व सुट्टीच्या दिवशी प्रचंड हाल होत होते. पण केवळ सांगे -केपे व काणकोण मधील खासगी बसमालकच या योजनेत सहभागी झाले होते तर बसमालक संघटना त्यापासून दूर राहिली होती. आता सरकारने सर्व बसमालकांनी त्यात सहभागी व्हावे म्हणून सुधारीत योजना अधिसूचित केली आहे. तरीही खासगीवाले तर दूर राहिले आहेतच पण पूर्वी त्यात सहभागी झालेले सांगे, काणकोण मधील बसवाल्यांनीही त्या योजनेमधून अंग काढून घेतलेले असल्याने लोकांची स्थिती ‘ये रे माझ्या मागल्या’ गत झाली आहे. त्यामुळे ही नवी योजना तरी पुढे जाईल, की सर्वसामान्यांना पूर्वीप्रमाणे हालअपेष्टांना तोंड द्यावे लागेल, असा प्रश्न हे लोक करू लागलेत. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.