Navratri Special Dainik Gomantak
गोवा

Navratri Special: हाती रिक्षा आली अन् संसाराला हातभार लागला

पिंक रिक्षा सुविधेबाबत अधिक जनजागृती होणे आवश्यक आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गोव्यात पिंक रिक्षा ही संकल्पना राबविण्यात आली. पहिल्या खेपेत आठ महिलांना 15 ऑगस्ट रोजी पिंक रिक्षांचे वितरण करण्यात आले. यासाठी रोटरी क्लब या सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. पिंक रिक्षासाठी महिलांना EDC मार्फत 3 टक्के व्याज दराने कर्ज दिले जात आहे. तर, अनुसूचित जमातीतील महिलांना 2 टक्के व्याजदराने कर्ज देण्याची तरतूद केली आहे. तसेच, सरकारकडून यासाठी सबसिडी देखील मंजूर करण्यात आली आहे. रिक्षामुळे महिलांच्या संसाराला हातभार लागला आहे. तसेच, आर्थिक स्वातंत्र्य देखील मिळाले आहे.

महिलांना रिक्षा मिळून दिड महिना पूर्ण होत आहे, त्यातच सुरू असलेल्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंक रिक्षा लाभार्थी महिलांचा अनुभव 'गोमन्तक'ने जाणून घेतला. महिलांना पिंक रिक्षामुळे अधिक बळ मिळाले असून, संसाराला देखील हातभार लागला असल्याचे मत व्यक्त केले.

नंदा जामुडेकर (खोर्ली)

नंदा जामुडेकर या खोर्ली येथील रहिवासी महिला आहेत. पिंक रिक्षाच्या त्या एक लाभार्थी असून, खोर्ली परिसरात त्या पिंक रिक्षाची सुविधा पुरवतात. जामुडेकर म्हणाल्या, "पिंक रिक्षा आल्याने अधिक सक्षम आणि स्वयंपूर्ण वाटत आहे. अनेक महिला प्रवाशांना या माध्यमातून मदत करत येतेय ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. रस्त्यावरची भिती कमी झाली आहे. रिक्षातून कुठेही प्रवास करता येतोय. दिड महिन्यात रिक्षाच्या मदतीने संसाराला आर्थिक हातभार देखील लागला आहे. पतीच्या पगारावर घराचा खर्च चालत होता त्यात आता माझ्याही कमाईतून घराला हातभार लागत आहे. चतुर्थीच्या काळात रिक्षाचा अधिक फायदा झाला."

नंदा जामुडेकर यांनी रिक्षाच्या चार्जिंगसाठी स्टेशनस् उभारता आली तर त्याचा फायदा होईल असे सांगितले.

शिल्पा सावंत (खोर्ली)

शिल्पा सांवत देखील खोर्ली परिसरात पिंक रिक्षाची सेवा पुरवतात. शिल्पा सावंत म्हणाल्या रिक्षा पाहता अनेकजण कौतुक करतात. आर्थिक दुर्बल महिलांसाठी पिंक रिक्षा ही संकल्पना अधिक फायदेशीर आहे. महिला काहीतरी करण्यासाठी बाहेर पडतोहेत ही महिला सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्वाची बाब आहे. पिंक रिक्षामुळे अनेक महिलांना आधार मिळाला आहे. विशेषत: रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या महिलांसाठी याचा लाभ होत आहे.

सध्या रिक्षासाठी जी विचारणा होत आहे, त्यासाठी आमच्या वैयक्तिक फोन वरती कॉल येतात. त्यामुळे अनेकांकडे आमचे नंबर नसल्याने मर्यादीत फोन कॉल्स येतात. यासाठी अॅपबेस किंवा काही केंद्रीय सुविधा करता आली तर फायदेशीर ठरेल असे शिल्पा सावंत म्हणाल्या.

सुलोचना सुरेश नाईक (पणजी)

सुलोचना नाईक या पणजी परिसरात पिंक रिक्षाची सुविधा पुरवतात. सुलोचना नाईक यांनी पिंक रिक्षाची खूप मदत झाल्याचे सांगितले. अनेक गोष्टी स्वत:च करण्याची यामुळे सवय आणि धाडस निर्माण झाले. अनेक गरजू महिलांना याचा फायदा होत आहे. समाजात देखील वेगळी प्रतिमा निर्माण झाली आहे. आर्थिक दुर्बल महिलांनी पिंक रिक्षासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे नाईक यांनी सांगितले. म्हापसा येथे पहिल्यांदा पिंक रिक्षाच्या मानकरी ठरलेल्या प्रिती केरकर सध्या महिलांना रिक्षाचे प्रशिक्षण देत असल्याचे सुलोचना नाईक म्हणाल्या.

सबसिडी बाबत अनिश्चितता

पिंक रिक्षाची किंमत 3.10 लाख रूपये आहे. रोटरी क्लबने यासाठी 60 हजार रूपयांची आर्थिक सहाय्यता केली आहे. उरलेली रक्कम भरण्यासाठी EDC मार्फत 3 टक्के व्याज दराने कर्ज दिले जात आहे. तसेच, गोवा सरकारकडून यासाठी सबसिडी दिली जाणार आहे. पण, सरकारने अलिकडेच वाहनांची सबसिडी बंद केल्याने ती मिळत नाही तोवर त्याबाबत अनिश्चितता वाटत असल्याची महिलांकडून सांगण्यात आले.

चार्जिंग स्टेशन, बुकिंग अॅप

रिक्षा उभे करण्यासाठी पिंक अॅटोसाठी रिक्षा स्टँड नसले तरी हरकत नाही पण, ठिकठिकाणी चार्जिंग स्टेशन असणे आवश्यक आहे. एका चार्जिंगमध्ये रिक्षा 120 कि.मी धावते त्यामुळे दूरचा प्रवास करता येत नाही. त्यामुळे चार्जिंग स्टेशन असल्यासा त्याचा फायदा होईल. तसेच, सध्या वैयक्तिक फोनवरतीच रिक्षा बुकिंगसाठी फोन येतात. त्यामुळे बुकिंगसाठी अॅप किंवा इतर सुविधा निर्माण करता आली तर, त्याचा फायदा होईल. तसेच, पिंक रिक्षा सुविधेबाबत अधिक जनजागृती होणे आवश्यक आहे. असे मत महिलांना व्यक्त केले.

Edited By - Pramod Yadav

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT