Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: नावेली स्‍टेडियमचे कवित्‍व

Khari Kujbuj Political Satire: आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातच भाजपच्या कार्यालय इमारतीचे काम पूर्ण होणार असे सांगून मुख्यमंत्र्यांनी नेतृत्व बदलाच्या चर्चेतील हवा काढून टाकली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

नावेली स्‍टेडियमचे कवित्‍व

नावेलीचे मनोहर पर्रीकर इनडोअर स्‍टेडियम चार दिवसांसाठी एका लग्‍न समारंभाला भाड्याने देण्‍याचे ठरविल्‍यामुळे तो सध्‍या वादाचा विषय बनला आहे. वेगवेगळ्‍या स्‍तरांतून या सरकारच्‍या निर्णयावर टीका होऊ लागली आहे. अशा परिस्‍थितीत आता खेळाडूंनी पुढाकार घेऊन सरकारच्‍या या निर्णयावर टीका करण्‍यास सुरू केली आहे. मडगावचे एक कलाकार आणि एक चांगले क्रीडापटू असलेले सुदेश नागवेकर यांनी आपल्‍या फेसबुकवर यासंदर्भात टिप्‍पणी करताना, ‘स्‍टेडियमार लगीन, देवा हेच काय रे अच्‍छे दिन’ असे म्‍हटले आहे. नागवेकर यांची ही प्रतिक्रिया खेळाडूंचीच एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया म्‍हणता येणे शक्‍य आहे. नागवेकर हे मडगावचे आमदार दिगंबर कामत यांचे जवळचे सहकारी तरीही त्‍यांनी सरकारी निर्णयावर टीका करण्‍याचे धाडस दाखविले आहे. ∙∙∙

माझ्याच कार्यकाळात कार्यालय

राज्यात अधूनमधून मंत्रिमंडळ फेरबदल आणि त्याला जोडून कधीतरी नेतृत्व बदलाच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होतात. विधानसभेची निवडणूक २०२७ मध्ये होणार आहे. तोपर्यंतच्या आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातच भाजपच्या कार्यालय इमारतीचे काम पूर्ण होणार असे सांगून मुख्यमंत्र्यांनी नेतृत्व बदलाच्या चर्चेतील हवा काढून टाकली आहे. १९ डिसेंबर २०२६ पर्यंत कार्यालय पूर्ण करून विधानसभा निवडणूक संयोजन त्याच कार्यालयातून करण्याची मनीषा त्यांनी जाहीरपणे व्यक्त केली आहे.∙∙∙

कार्यकर्त्यांचा हिरमोड

भाजप हा शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळखला जातो. गोव्याच्या राजकीय इतिहासात भाजप प्रथमच असे स्वतःचे प्रशस्त कार्यालय बांधणार आहे. प्रतिकूल परिस्थितीत भाजप येथे रुजविण्यात, वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी हा अभिमानाचा क्षण होता. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा या कार्यक्रमाला न फिरकल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. दिल्ली दरबारी गोव्यातील पक्षाला किती किंमत आहे, हे या निमित्ताने कळून आले, अशी प्रतिक्रिया कार्यक्रमस्थळी ऐकू आली. नड्डा ऐवजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गोव्यात धाडण्यात आले. तेही तब्बल दोन तास उशिराने पोचल्याने कार्यक्रम तीन तास उशिरा सुरू झाला. यामुळे कार्यक्रमाचा पचका झाला, असा शेरा एका नेत्याने कार्यक्रम संपल्यानंतर जाता जाता मारला. ∙∙∙

भाईची भाईगिरी जिरली...

म्हापसा शहरात एका अतिहुशार सराईत गुंडाने शुक्रवारी मध्यरात्री खेळाडूंना जीवे मारण्याची धमकी देत, त्यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांकडून त्याला अटक झाली. त्याच्या दुसऱ्या साथीदाराला सुद्धा पकडले. मुळात स्वतः अगोदर दादागिरी करुन, नंतर आपण याप्रकरणी पीडित असल्याचा ‘आव’ या भाईने आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांपासून सत्य लपून राहते का? काही वेळातच पोलिसांनी खऱ्या स्टोरीचा उलगडा केला, व या भाईच्या मुसक्या आवळल्या. विशेष म्हणजे या कुख्यात भाईवर एका लोकप्रतिनिधीचा वरदहस्त आहे. त्याच लोकप्रतिनिधीने पोलिसांशी संपर्क साधून म्हणे काही होत असल्यास बघा असे सांगितले, अशी चर्चा आहे. परंतु राजकीय प्रभावाला बळी न पडता, पोलिसांनी कर्तव्य पार पाडले. आता लोकप्रतिनिधीच अशा सराईत गुंडांना पाठबळ देऊ लागल्यास, त्यांची हिम्मत वाढणार नाही का?

नागार्जुन धडा का घेत नाही?

तेलगू-हिंदी चित्रपट अभिनेता नागार्जुन या-ना-त्या कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. हैदराबाद आपत्ती दखल-मालमत्ता देखरेख आणि संरक्षण (हैद्रा) एजन्सीने शुक्रवारी अभिनेता अक्किनेनी नागार्जुन यांची मालमत्ता असलेले ‘एन कन्व्हेन्शन'' पाडण्याचे काम हाती घेतले. ही कारवाई जलकुंभ आणि सार्वजनिक जमिनींवर अतिक्रमण केलेली बेकायदा बांधकामे हटविण्याच्या सुरू असलेल्या मोहिमेचा एक भाग. या घटनेची आठवण यासाठीच की नागार्जुनने खरेदी केलेल्या मांद्रे येथील अाश्‍वेवाडा येथील जमिनीवर केलेल्या बेकायदा बांधकाम व उत्खननाचा विषय डिसेंबर २०२२ मध्ये उघडकीस आला होता. त्यावेळी पंचायतीने ते काम थांबविले होते. त्याशिवाय जी नोटीस बजावली होती, त्यावर पंचायतीने काम बंद न केल्यास आवश्‍यक कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे नागार्जुनला जो कोणी वादातीत जमीन व्यवहार करण्यास सांगत असेल, त्याचा त्याने सत्कारच करायला होता नव्हे का? ∙∙∙

खाणी सुरू होणार का?

राज्यातील खनिज खाणी आता चतुर्थीनंतर पुन्हा एकदा धडाडू लागणार असल्याची आशा खाण अवलंबितांना लागून राहिली आहे. गेली बारा वर्षे या खनिज खाणी बंदच होत्या. फक्त ई-लिलावाचा खनिज माल तेवढा वाहतूक करण्यात आला. बारा वर्षांच्या तपानंतर मुख्यमंत्र्यांनी खाणी पुन्हा सुरू होणार असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे, त्यामुळे कदाचित आता तरी खाणव्याप्त भागाला चांगले दिवस येतील, अशी आशा खाण अवलंबितांना वाटत आहे. खाणी बंद झाल्यानंतर या भागातील रोजीरोटी बंद झाल्यामुळे अनेकांना पर्यायी रोजगार शोधावा लागला, पण आता पुन्हा एकदा खाणी सुरू होणार असल्याचे ठोस आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे, त्यामुळे खाण अवलंबितांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ∙∙∙

पणजीतील अष्टमी फेरीसाठीची झुंबड

राजधानी पणजीत अष्टमीच्या फेरीत स्टॅाल घालण्यासाठी अर्ज मिळविण्यास अक्षरशः झुंबड उसळल्याचे दिसून आले. अष्टमीची फेरी असो वा फेस्ताची तेथे अशी झुंबड आता नेहमीची झाली आहे. त्यात महापालिकेच्या लोकांना मिरविण्याची मात्र चांगलीच संधी असते. पण मुद्दा तो नाही, कोणतीही फेरी असो, त्यांत उभे ठाकणारे स्टॅाल पाहिले तर ते फेस्त वा अष्टमीशी संबंधित सामानाचे नसतात, तर तयार म्हणजे रेडिमेड कपडे, प्लास्टिक वस्तू वा तशा वस्तूंचेच असतात. तेवढ्याने भागत नाही, तर स्टॅाल घालणारे गोवेकर अत्यल्प असतात. बेळगाव-हुबळीवाल्यांचा भरणा जास्त असतो. एरवी गोंय-गोंयकारपण वा भूमिपुत्र वगैरे भाषा करणारी मंडळी त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात. ते त्यांच्या लक्षात येत नाही, असा प्रश्न त्यामुळे अनेकांना पडतो. खरे तर अशा फेरीत स्टॅाल कोणत्या प्रकारचे म्हणजे तेथे कोणत्या वस्तू विकल्या जाव्यात, याबाबत काही तरी मार्गदर्शिका तयार करण्याची वेळ आता आली आहे. अन्यथा एक दिवस अशा फेरींचा मूळ उद्देशच बाजूला पडेल म्हणजे अष्टमीच्या फेरीत अष्टमी वा चतुर्थीला लागणाऱ्या वस्तुंचे स्टॅाल नसतील, अशी वेळ आली नाही, म्हणजे मिळवले असे बोलले जाऊ लागले आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

International Purple Festival 2025: 9 ऑक्टोबरपासून पणजीत रंगणार आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिव्हल, नोंदणी अनिवार्य; जाणून घ्या स्थळ, थीम आणि प्रमुख आकर्षणे

Viral Video: स्टाईल मारत रील बनवणाऱ्या कपलचा जीवावर बेतणारा थरार व्हायरल, नेटकऱ्यांनी घेतली शाळा; म्हणाले, 'लो भाई हो गया कांड'!

Goa Crime: पणजीत खळबळ! बसस्थानकाजवळ आढळला छत्तीसगडच्या 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह; परिसरात भीतीचे वातावरण

AUS W vs PAK W: भारतीय वंशाच्या अलाना किंगची कमाल, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रचला नवा इतिहास; मोडला 22 वर्ष जुना रेकॉर्ड

IND U19 vs AUS U19: 18 षटकार, 257 धावा! 14 वर्षीय 'वैभव' सूर्यवंशीचं ऑस्ट्रेलियात वादळ; युथ टेस्ट आणि वनडेत केला मोठा धमाका

SCROLL FOR NEXT