कोणतेही काम प्रामाणिकपणे केले तर यश निश्चित मिळते. सुभाष फळदेसाई यांनी आपल्या स्वबळावर सांगेसारख्या अनुसूचित प्राबल्य असलेल्या मतदारसंघात आपला जम बसविला.पुढे सांगे मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव बनला तर सुभाष यांचे राजकीय भवितव्य संपणार, असा समज कोणी करून घेऊ नये. सांगे मतदार संघ राखीव बनला तरी आपण घाबरत नाही.आपण आमदार मंत्री नसलो तरी राजकारणात असू.आपण पक्षाचा प्रचारक बनण्यासही तयार असल्याचे फळदेसाई यांनी आपल्या वाढदिनी जाहीरपणे सांगितले.मात्र त्यांनी सांगे राखीव बनल्यास पर्याय म्हणून कुडचडे मतदारसंघावर लक्ष केंद्रित केल्याचे कार्यकर्ते सांगतात. आता प्रचारक बनणार की, आमदार ते पुढे कळेलच.
नावेलीच्या प्रतिमाताई मध्यंतरी शांत होत्या. पण या दिवसांत त्या पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसत आहे. पण त्या सक्रियतेत पूर्वींचा जोश मात्र दिसत नाही, असे त्यांचे पूर्वींचे समर्थक म्हणत आहेत. एक खरे की, प्रतिमा मॅडम कॉंग्रेसमध्ये असताना महिला क्रॉंग्रेस ज्या इर्षेने वावरत होती, तशी ती आता नाही.पण तो मुद्दा वेगळा आहे. काहींनी प्रतिमाच्या सक्रियतेचा संबंध आगामी विधानसभा निवडणुकीशी लावला आहे व आगामी निवडणूक नावेलीतून लढविण्याची तयारी त्या करत असाव्यात, अशी शक्यता व्यक्त केली आहे. ती तशी नाकारता येण्यासारखी नसली तरी त्या कोणत्या पक्षाच्या बॅनरखाली रिंगणात उतरणार,असा प्रश्न नावेलीत केला जातो. कारण त्यांनी २०२२ची निवडणूक ‘आप’च्या उमेदवारीवर लढविली होती, नंतर त्यांनी ‘आप’ला टाटा केले होते. पण नंतर कोणत्याच पक्षात प्रवेश केला नव्हता. काहींना त्या पुन्हा कॉंग्रेसमध्ये घरवापसी करतील असे वाटते. पण त्या पक्षात आवेर्तानसह अनेकजण उमेदवारीवर दावा करू शकतात. दुसरीकडे सर्व विरोधी पक्ष जर ‘इंडिया’ आघाडी सांभाळणार असेल तर तिथे अनेकजण प्रतिमा यांच्या विरोधात आहेत, असे आजचे चित्र आहे . मग प्रतिमाची ही सक्रियता कशी तग धरेल, असे अनेकजण आताच विचारताना दिसतात. ∙∙∙
सध्या मडगाव पालिकेच्या कारभारावर सगळेच जण शिंतोडे उडवू लागलेले असताना मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी पालिकेचे मुख्याधिकारी अजित पंचवाडकर आणि अन्य काही महत्वाच्या अधिकाऱ्यांबराेबर बैठक घेतली. ही बैठक कशासाठी घेतली, असे शिरोडकर यांना विचारले असता, बैठकीचे मिनिट्स तयार झालेले नाहीत, त्यामुळे ही माहिती देता येत नाही असे सांगत त्यांनी वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. असे म्हणतात, वेगवेगळ्या वादग्रस्त विषयांमुळे सध्या पालिकेची बदनामी होत असून पालिकेवर आमदाराचे नियंत्रण नाही म्हणून मडगावकर दिगंबर कामत यांना दोष देऊ लागले आहेत. त्यामुळे कामत यांनीच नगराध्यक्षांना बोलावून स्थिती तातडीने सुधारा,अशी तंबी दिल्याचे समजते. त्यासाठीच ही बैठक झाली तर नसावी ना? ∙∙∙
पेडणे उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर टॅक्सीमालकांनी आंदोलन छेडले, अन् या आंदोलनातून ५०० टॅक्सींची मालकी असणारा आमदारही गोव्यात आहे, ही धक्कादायक माहिती समोर आली. दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी मुख्यमंत्र्यांना हा आमदार कोण, हे शोधण्याचे काम दिलेय आणि योग्य वेळ आल्यावर आम्ही त्या आमदाराचे नाव सांगू, असा इशाराही दिलाय. आता हा आमदार कोण, असे विचारल्यावर कॅप्टननी हा आमदार किनारी भागातील आहे, एवढंच सांगून वेळ मारून नेली. त्यातही आमदाराने आपल्याच नावावर टॅक्सी न घेता इतरांच्या नावावर टॅक्सी घेतल्या आणि आपली वोटबँक तयार केली, असे स्पष्टपणे त्यांनी सांगितले. खाण व्यवसाय तेजीत होता तेव्हा,अनेक आमदार, अधिकारी यांनीही ट्रक घेतले होते. आता मोपा विमानतळावर अनेकांच्या जमिनी आहेत. विरियातो यांनी टॅक्सीवाल्या आमदाराचे नाव जरूर जाहीर करावे, परंतु कोणीकोणी जमिनी घेतल्या आहेत व मोपा विमानतळाच्या कंपनीशी कोणा कोणाचे लागेबांधे आहेत, याबाबतही संशोधन केले तर बरे होईल. शेवटी हा विषय राज्याच्या आर्थिक विकासातही गुंतला आहे. खोलात शिरून नेत्यांचे बिंग त्यांनी फोडलेच पाहिजे. ∙∙∙
नोकरीचे आमिष दाखवून अन् अन्य कारणांवरून एका महिलेने राज्यातील अनेकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातला आहे. यात एक पोलिस कॉन्स्टेबल सहभागी असून त्याचे नाव समोर आले आहे. अद्याप या पोलिसावर कारवाई झालेली नाही, मात्र या कॉन्स्टेबलवर चांगलाच राजकीय वरदहस्त आहे, असे समजते. विशेष म्हणजे एका राजकीय नेत्याच्या कार्यालयातील व्यक्ती यात गुंतली आहे, अशीही चर्चा आहे. त्यामुळे याविषयावरून सर्वच वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. आता पोलिस या प्रकरणाच्या तळाशी पोहचून खऱ्या सूत्रधार शोधून काढतात की नाही, हेच पाहणे औत्सुक्याचे आहे,नाही का?.. ∙∙∙
गोवा मराठी अकादमी गेल्या दहा वर्षांपासून संघाच्या हातात आहे, तर कोकणी अकादमीच्या अध्यक्षांनीच भाजप प्रवेश करून लोकसभा निवडणुकीत उत्तर गोव्यात तळागाळात काम करून आपल्या प्रचंड जनसंपर्काच्या बळावर श्रीपाद नाईक यांना विजयी करण्यात मोलाचा वाटा उचलला. कोकणीच्या धोरणात्मक निर्णयात आता माजी अध्यक्षांचे सरकार दरबारी व पक्षीय पातळीवर बरेच वजन असून त्यांनी गोवा कोकणी अकादमीच्या अध्यक्ष नेमणुकीबाबत मार्गदर्शन करावं, अशी कोकणी चळवळीतील व्यवस्थामान्य सरकार दरबारी पुरस्कृत लेखकांची विनंती आहे. पण प्रश्न आहे, चतुर्थीपूर्वी अध्यक्ष नेमला जावा, यासाठी बाप्पा पावेल का? ∙∙∙
कॅप्टन विरियातो फर्नांडिस दक्षिण गोवा खासदार म्हणून निवडून आले , तरी संपूर्ण गोव्यातील लोक समस्या घेऊन त्यांच्यापाशी येतात. विरियातो बाबांनी संसदेत गोव्या संबंधी विषय मांडल्यानंतर राज्याचा आवाज अखेर दिल्लीत मांडणारा नेता मिळाल्याची चर्चा होऊ लागलीय. सध्या विरियातोबाब व्यग्र असून दक्षिण गोव्यातील लोकांच्या समस्यांसोबत उत्तर गोव्यातील लोकांचे गाऱ्हाणेही ते ऐकतात. त्यामुळे स्वतःसाठी त्यांना वेळ मिळत नाही. टॅक्सीवाल्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ते पेडणेत गेले. विरियातोबाबांची ऊर्जा पाहून गोवेकरांत उत्साह संचारल्याचे दिसले, कारण एकूणच लोकसभेत गोव्यातील इतर खासदारांची कामगिरी बघून हताश झालेली जनता त्यांच्याकडे आशेने बघू लागलीय. ∙∙∙
आपल्या देशात आता राजकारणात गॅरंटी नावाचा नवा फंडा तयार झाला आहे.सध्या दिल्लीत तुरूंगात असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री ‘ए.के’ यांनी ‘गॅरंटी’चे मायाजाल गुंफून यश संपादन केले. त्या नंतर राहुल गांधींनी काँग्रेसच्या गॅरंटी चे गाजर मतदारांना दाखविले. यात आपले पंतप्रधान मोदीही मागे राहिले नाहीत, त्यांनी ही आपल्या गॅरंटीचे मायाजाल गुंफले. फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी आपल्या मतदारसंघातील रस्त्याची पाच वर्षाची गॅरंटी दिली. तर सुभाष फळदेसाई यांनी सांगेतील रस्त्यांची चौदा वर्षांची गॅरंटी दिलीय.आता या राजकीय ‘गॅरंटी’ची किती ‘गॅरंटी’ हे राजकारणीच जाणोत. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.