Maharashtra Medal Century in National Games Goa 2023 Dainik Gomantak
गोवा

National Games 2023: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र संघाने पार केली पदकांची सेंच्युरी! अव्वल स्थान मजबूत

४६ शिलेदार सुवर्णपदकाचे मानकरी

Kavya Powar

अनिल पाटील

तळागाळातील मराठमोळ्या युवा शिलेदारांनी प्रचंड मेहनत आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर सर्वोत्तम कामगिरीतून महाराष्ट्र संघाचे ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकांचे शतक साजरे केले. आपल्या पदकांची मोहीम अबाधित ठेवताना महाराष्ट्र संघाने रविवारी १०६ पदकांचा पल्ला गाठला.

यामध्ये ४६ सुवर्णांसह २९ रौप्य आणि ३१ कांस्यपदकांचा समावेश आहे. राज्यातील ४१ युवा शिलेदार हे सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. महाराष्ट्र संघाने या शतकी पदकांसह पदकतालिकेतील आपले अव्वल स्थान अधिक मजबूत केले.

महाराष्ट्र संघाची ही पदकांमधील कामगिरीतून महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सचिव नामदेव शिरगावकर, पथकप्रमुख स्मिता शिरोळे यांनी पदक विजेत्या खेळाडूंचे कौतुक केले आहे.

पेंचाक सिलाट, जलतरण, ॲथलेटिक्स, वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारांनी रविवारी महाराष्ट्राची यशोपताका फडकवत ठेवली. दुसऱ्या स्थानावरील हरयाणापासून दुप्पट सुवर्ण पदकांच्या अंतराने पदकतालिकेत अग्रस्थानी कायम असलेल्या महाराष्ट्राने आज ६ सुवर्ण, ५ रौप्य, ४ कांस्य अशा एकूण १५ पदकांची कमाई केली.

मॉडर्न पेंटॅथलॉन क्रीडा प्रकारात महाराष्ट्राने पाच सुवर्ण आणि एक कांस्य अशी सहा पदके प्राप्त केली. पेंचाक सिलाट क्रीडा प्रकारात भक्ती किल्लेदारने सुवर्ण पदक तसेच अनुज सरनाईक आणि ओमकार अभंग यांची रौप्य पदके पटकावली. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जलतरणाच्या पहिल्या दिवशी दोन रौप्य व एक कांस्य अशी तीन पदके जिंकून शानदार सलामी दिली.

ॲथलेटिक्समध्ये प्रणव गुरवने १०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकले आणि महाराष्ट्राच्या पहिल्या पदकाची नोंद केली. त्यानंतर महाराष्ट्राच्या संजीवनी जाधव व पूनम सोनुने यांनी १० हजार मीटर्स धावण्याच्या शर्यतीत अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले. वेटलिफ्टिंगमध्ये अखेरच्या दिवशी महिलांच्या ८७ किलो वजनी गटात महाराष्ट्राच्या योगिता खेडकरने कांस्य पदक पटकावले.

वेटलिफ्टिंग

योगिता खेडकरला कांस्य पदक

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकाराच्या अखेरच्या दिवशी रविवारी महिलांच्या ८७ किलो वजनी गटात महाराष्ट्राच्या योगिता खेडकरने कांस्य पदक पटकावले.

योगिताने ८९ किलो स्नॅच आणि १०९ किलो क्लीन-जर्क असे एकूण १९८ किलो वजन उचलून तिसरा क्रमांक पटकावला. तिने स्नॅचमध्ये पहिल्या प्रयत्नात ८५ किलो वजन उचलले. दुसऱ्या प्रयत्नात ती अपयशी ठरली.

तर तिसऱ्या प्रयत्नात उचललेले ८९ किलो वजन ग्राह्य धरण्यात आले. क्लीन-जर्कमधील तीन प्रयत्नांत तिने अनुक्रमे १०३, १०७ आणि १०९ किलो वजन उचलले. महाराष्ट्राच्या रुचिका ढोरेने ८८ किलो स्नॅच व १०९ किलो क्लीन-जर्क असे १९७ किलो वजन उचलले. पण तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

उत्तर प्रदेशच्या पूर्णिमा पांडेने १०५ किलो स्नॅच आणि १२२ किलो क्लीन-जर्क असे एकूण २२७ किलो वजन उचलत सुवर्ण पदक मिळवले. केरळच्या एनमारिया टी हिने ८८ किलो स्नॅच आणि ११८ किलो क्लीन-जर्क असे एकूण २०६ किलो वजन उचलत रौप्य पदक प्राप्त केले.

वेटलिफ्टिंगमध्ये नऊ पदकांची कमाई

महाराष्ट्राने वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात यंदा तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि तीन कांस्य अशी एकूण नऊ पदकांची कमाई केली आहे. अहमदाबादला गतवर्षी झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने एक सुवर्ण आणि एक कांस्य अशी एकूण दोनच पदके मिळवली होती.

नगर, नाशिक, कोल्हापूर, पुणे, जळगाव येथील खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली. यंदा महाराष्ट्राने वेटलिफ्टिंगमध्ये शानदार यश मिळवले आहे. या यशाचे श्रेय खेळाडूंची मेहनत, त्यांच्या वैयक्तिक प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेला जाते.
प्रवीण व्यवहारे, महाराष्ट्र संघाचे मुख्य प्रशिक्षक

पेंचाक सिलाट

भक्तीला सुवर्ण पदक; अनुज, ओमकारला रौप्य पदके

भक्ती किल्लेदारचे सुवर्ण पदक तसेच अनुज सरनाईक आणि ओमकार अभंग यांची रौप्य पदके हे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पिंच्याक सिल्याट क्रीडा प्रकारातील महाराष्ट्राच्या कामगिरीचे वैशिष्ट्य ठरले. रविवारी पिंच्याक सिल्याटच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्राने एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांची कमाई केली.

कॅम्पाल क्रीडानगरीत झालेल्या पिंच्याक सिल्याटमधील महिलांच्या ८५ ते १०० किलो ओपन-१ गटात महाराष्ट्राच्या भक्तीने अंतिम सामन्यात केरळच्या अथिरा एमएस हिचा पराभव केला. त्याआधी उपांत्य सामन्यात तिने उत्तर प्रदेशच्या शालिनी सिंगला नामोहरम केले.

पुरुषांच्या ८५ ते ९० किलो टँडिंग गटातील अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या अनुजला मध्य प्रदेशच्या महेंद्र स्वामीकडून हार पत्करल्याने रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीत अनुजने गोव्याच्या सागर पालकोंडावर विजय मिळवला.

पुरुषांच्या ७० ते ७५ किलो टँडिंग गटाच्या सुवर्ण पदकाच्या लढतीत महाराष्ट्राच्या ओमकार दिल्लीच्या सूरज कुमारकडून पराभूत झाला. उपांत्य सामन्यात ओमकारने जम्मू काश्मीरच्या मोहम्मद इम्रानला धूळ चारली.

नवख्या खेळात एकूण १७ पदकांसह वर्चस्व

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रथमच समावेश करण्यात आलेल्या पिंच्याक सिल्याट क्रीडा प्रकारात महाराष्ट्राने वर्चस्वपूर्ण कामगिरीचे प्रदर्शन करताना ७ सुवर्ण, ५ रौप्य, ५ कांस्य अशी एकूण १७ पदकांची लयलूट केली. या संघाला सुहास पाटील (वरिष्ठ संघ) आणि अभिषेक आव्हाड (कनिष्ठ संघ) यांचे मार्गदर्शन लाभले, तर साहेबराव ओहोळ यांनी व्यवस्थापक पदाची जबाबदारी सांभाळली.

भक्ती किल्लेदार

जलतरण

महाराष्ट्राची तीन पदकांची सलामी

महाराष्ट्राच्या खेळाडूंनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील जलतरणाच्या पहिल्या दिवशी दोन रौप्य व एक कांस्य अशी तीन पदके जिंकून शानदार सलामी दिली.

महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय खेळाडू मिहीर आंम्ब्रेने पुरुषांच्या १०० मीटर बटरफ्लाय शर्यतीत रौप्यपदक जिंकले. त्याने ही शर्यत ५४.३२ सेकंदात पार केली. केरळचा आंतरराष्ट्रीय खेळाडू साजन प्रकाशने या शर्यतीत सुवर्णपदक जिंकताना ५३.७८ सेकंद अशी वेळ नोंदवली. मिहीरने महाराष्ट्र रिले शर्यतीतही पदक मिळवून दिले.

मित मखिजा, मिहीर, ऋषभ दास, वीरधवल खाडे यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राने पुरुषांच्या चार बाय ४०० मीटर फ्री स्टाईल रिले शर्यतीत कांस्य पदक जिंकले. त्यांना हे अंतर पार करण्यास ३ मिनिट, २८.७२ सेकंद वेळ लागला. या शर्यतीत कर्नाटक व तमिळनाडू संघांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदक जिंकले.

महिलांच्या चार बाय ४०० मीटर फ्री स्टाईल रिले शर्यतीत महाराष्ट्रास रौप्यपदक मिळाले. पलक जोशी, आदिती हेगडे, अवंतिका चव्हाण व ऋजुता खाडे यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र संघाने हे अंतर तीन मिनिटे ५९.६८ सेकंदात पार केले. कर्नाटक संघाने ही शर्यत तीन मिनिटे ५९.५३ सेकंदात पार केली.

जलतरण सुवर्णपदक टीम

तलवारबाजी

उपांत्यपूर्व फेरीत पराभव

महाराष्ट्र पुरुष संघाचा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील तलवारबाजी क्रीडा प्रकारातील उपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला. यामुळे संघाचे फॉइल प्रकारातील पदकाचे स्वप्न भंगले.

ॲथलेटिक्स

प्रणव गुरवच्या रौप्यपदकाने महाराष्ट्राचे खाते उघडले

संजीवनीला रौप्य तर पूनमला कांस्य पदक

प्रणव गुरवने १०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकले आणि ॲथलेटिक्समध्ये महाराष्ट्राच्या पहिल्या पदकाची नोंद केली. त्यानंतर महाराष्ट्राच्या संजीवनी जाधव व पूनम सोनुने यांनी १० हजार मीटर्स धावण्याच्या शर्यतीत अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.

उत्कंठापूर्ण झालेल्या शर्यतीत पुणे जिल्ह्याचा खेळाडू प्रणवने १०० मीटर्सचे अंतर १०.४१ सेकंदात पार केले. तामिळनाडूच्या एलिक्य दासने ही शर्यत १०.३६ सेकंदात पार करीत सुवर्णपदक जिंकले.तर सेनादलाच्या सौरभ राजेश (१०.४८ सेकंद) याला कांस्य पदक मिळाले. प्रणव हा पुण्यातील सणस मैदानावर सराव करीत असून त्याने आजपर्यंत राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक पदके जिंकली आहेत.

पदकाची खात्री होती -प्रणव

१०० मीटर्स शर्यतीत पदक जिंकण्याची मला खात्री होती, असे प्रणव याने शर्यत संपल्यानंतर सांगितले. ' शर्यत अतिशय चुरशीची झाली. मी सोनेरी यश मिळवण्याचा प्रयत्न केला. तथापि थोडक्यात माझे हे सुवर्णपदक हुकले. महाराष्ट्राला पदक मिळवून देण्यात यशस्वी झालो, याचे मला समाधान वाटत आहे,' असे प्रणवणे पुढे सांगितले.

महिलांच्या १० हजार मीटर्स शर्यतीत संजीवनी जाधव हिला रौप्य तर पूनम सोनुने हिला ब्रॉंझ पदक मिळाले.

१० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत या महाराष्ट्राला पदकाची खात्री होती. कारण महाराष्ट्राच्या तीन खेळाडू सहभागी झाल्या होत्या. संजीवनी हिने सुरुवातीपासून आघाडी घेतली होती. मात्र शेवटच्या दोनशे मीटर्स अंतरात तिचा वेग थोडासा कमी झाला.

हिमाचल प्रदेशच्या सीमा कुमारी हिने वेग वाढविला आणि तिला मागे टाकून आघाडी घेत सुवर्णपदक जिंकले. तिने हे अंतर ते ३३ मिनिटे २०.७५ सेकंदात पार केले. संजीवनी हिने हे अंतर ३३ मिनिटे ३२.२७ सेकंदात पूर्ण केले. तिची सहकारी पूनम सोनूने हिने हीच शर्यत ३४ मिनिटे २९.७१ सेकंदात पार करून कांस्य पदक मिळवले.

मॉडर्न पेंटॅथलॉन

महाराष्ट्राला ५ सुवर्णपदके

मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये मयंक चाफेकरने सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने टेट्रथलॉनमध्ये हे यश संपादन केले. तसेच सौरभ पाटील कांस्यपदक विजेता ठरला. त्यापाठोपाठ महाराष्ट्र संघाने सांघिक गटात सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला.

संघाने २८११ गुणांसह अव्वल स्थान गाठले. तसेच टेट्रथलॉनच्या सांघिक गटात महाराष्ट्र महिला संघ सुवर्णपदक विजेता ठरला. मुग्धा वाव्हाळ, श्रृती गोडसे आणि अहिल्याने चव्हाण यांनी हे सोनेरी यश मिळवले.

मग मुग्धाने मयंक चाफेकरच्या साथीने मिश्र गटात सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला. त्यानंतर महिला वैयक्तिक् टेट्रथलॉन गटात मुग्धा आणि आध्या सिंहच्या (मध्य प्रदेश) यांना संयुक्त सुवर्ण पदक घोषित करण्यात आले. दोघांनी प्रत्येकी ७७९ गुण मिळवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT