Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; पेडणे तालुका नेहमीच चर्चेत

Khari Kujbuj Political Satire: आयआरबी म्हणजेच इंडियन रिझर्व्ह बटालियन. गोव्यात या पोलिस बटालियनमध्ये अनेक स्थानिक तरुण गेल्या काही वर्षांत कामाला लागले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

पेडणे तालुका नेहमीच चर्चेत!

पेडणे हा गोव्याच्या उत्तर टोकावरील तालुका. अनेक वर्षे मागास तालुका म्हणून त्याची ओळख होती. पण मोपा विमानतळ झाला व पेडणेवासियांचे नशीब फळफळले. त्यामुळे केवळ तेथील जमिनीला सोन्याचा भाव आला, असे नाही तर सर्व प्रकारचे बरे वाईट व्यवसाय भलतेच तेजीत आले आहेत. कॅसिनो सारख्या व्यवसायामुळे तो भाग सध्या जागतिक नकाशावर झळकत आहेत.मात्र या विमानतळासाठी ज्यांच्या जमिनी गेल्या ते मात्र हेची काय मम तपाला असे म्हणत आहेत. कारण त्या जमिनी कवडी मोलाने संपादन केल्या आहेत. पेडणेत असंख्य समाजसेवकही तयार झाले आहेत तसेच तेथील ग्रामपंचायती व एकमेव नगरपालिकेवरील कारभाऱ्यांनाही मोठे महत्त्व आले आहे. त्या लोकांचे वाढदिवस वा तेथील उत्सव याचे निमित्त करून झळकणाऱ्या जाहिराती तेच तर दाखवून देत नाहीत ना? अशी चर्चाही आता सुरू झाली आहे. ∙∙∙

आयआरबी पोलिसांची दबंगगिरी!

आयआरबी म्हणजेच इंडियन रिझर्व्ह बटालियन. गोव्यात या पोलिस बटालियनमध्ये अनेक स्थानिक तरुण गेल्या काही वर्षांत कामाला लागले आहेत. खरे तर पोलिस ही एक अशी व्यवस्था की चोख व ईमानदारपणे काम केले, तर त्यात बढतीच्या अनेक संधी आहेत. अनेकांनी तशी बढतीही मिळविली आहे. पण गोव्यात अनेकांनी या आयआरबीत काम करताना गैरमार्गांचा अवलंब करून निलंबनही ओढवून घेतले, काही जण तर कायमचे घरीही बसले आहेत. ‘देव देतो अन् देवचार नेतो’ अशी प्रतिक्रिया अशांचे घरचे लोक व्यक्त करतात. उगवे-पेडणे येथे रेती उपसा करताना झालेला गोळीबार व या प्रकरणात तपास करून पोलिसांनी काहींना अटक केली आहे त्यात दोघे आयआरबी पोलिस असल्याचे उघड झाल्यावर अनेकजण अशी प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. मात्र हा गोळीबार नेमका का झाला ते अजून गूढच आहे. ∙∙∙

आजगावकर किती वेळा तेच बोलणार?

माजी आमदार बाबू आजगावकर हे कित्येक महिन्यांपासून एकच पालुपद लावताना दिसतात. २०२७ च्या निवडणुकीत आपल्या नावाचा विचार भाजपला करावाच लागेल, असे ते किती वेळा प्रसार माध्यमांना सांगत आहेत, हे त्यांनाही माहीत नसावे. कोणीही यू-ट्यूब चॅनलवाला त्यांच्याकडे जातो किंवा भेटल्यास त्यांना विधानसभेच्या निवडणुकीशिवाय काहीच विचारत नाहीत, असेच दिसते. त्यामुळे आजगावकरांनीच आता अशा प्रश्नांना उत्तर देणे बंद करावे, अन्यथा भाजपलाच तुमच्या नावाचा विसर पडले, हेही त्यांनी ज्येष्ठतेनुसार लक्षात घेणे गरजेचे आहे. आता वयोमानाचा विचार करता आजगावकरांनी एखादे महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारून पेडणेत नव्या नेतृत्वाला संधी द्यावी, म्हणून पक्षाकडे आग्रह धरण्यास कोणाची काही हरकत नसावी. परंतु आमदारकी असणे म्हणजे प्रतिष्ठा आणि बरेच काही (आर्थिक) लाभ मिळवून देणारे पद, त्यामुळे ती माळ गळ्यात असावी, हे त्यांना पक्के माहीत असल्यानेच कदाचित विधानसभेच्या उमेदवारीवरून ते पक्षश्रेष्ठींना आठवण करून देत असावेत. ∙∙∙

...चाय पिया, सामोसा खाया!

रवी नाईक हे आमच्यात नाहीत, पण त्यांच्या स्मृती अजूनही लोकांच्या आठवणीत आहेत. रवी नाईक हे मुत्सद्दी राजकारणी होते, याबद्दल कुणाचेही दुमत नसावे. हल्लीच्या काळात तर ते विनोदाने बोलल्यासारखे भासवायचे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना त्याला विनोदाची झालर लावायचे. एका बैठकीनंतर त्यांना काय चर्चा झाली, असे विचारले असता त्यांनी उत्तर दिले होते. बैठकीत काय झाले तर "चाय पिया, सामोसा खाया" एवढेच मार्मिक उत्तर त्यांनी दिल्याचे सर्वांच्याच आठवणीत आहे. याचा उल्लेख मडगावमधील त्यांच्या शोकसभेत भंडारी समाजाचे नेते व स्व. रवीचे अगदी जवळचे मित्र संजीव नाईक यांनी केला. त्यांनी दिलेल्या उत्तरात विनोदाभास होता, तरी त्यांनी ते गंभीरपणे म्हटले होते, कारण बैठकीत त्यांचे म्हणणे ऐकून घेणारे नव्हते, त्यामुळे त्यांना बोलण्याची संधीच मिळाली नव्हती. ते केवळ चहा पिऊन व सामोसा खाऊनच बैठकीतून बाहेर आले होते, असे संजीवबाबने यावेळी सांगितले. ∙∙∙

चेंडू पक्षाच्‍या कोर्टात का?

फोंडा पोटनिवडणुकीत भाजपची उमेदवारी कुणाला द्यायची याचा निर्णय आपण नाही, तर पक्ष घेईल? असे म्‍हणत उमेदवार निवडीचा चेंडू पक्षाच्‍या कोर्टात टाकून मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गप्‍प झाले. डॉ. प्रमोद सावंत मुख्‍यमंत्री असले, तरी प्रदेश भाजपमध्‍ये त्‍यांच्‍याशिवाय पानही हलत नाही, हे जनतेला पक्‍के माहीत आहे. तरीही मुख्‍यमंत्री डॉ. सावंत फोंड्यातील उमेदवार पक्षच निश्‍चित करेल असे का म्‍हणत आहेत? यामागे इच्‍छूकांची वाढती संख्‍या तरी नसावी? असे प्रश्‍‍न फोंड्यातील मतदारांना पडले आहेत. ∙∙∙

तरीही दुर्लक्ष का?

पाटो–पणजीतील जुना पूल अनेकदा वाहन चालकांसाठी महत्त्‍वपूर्ण ठरतो. पणजीत वाहतूक कोंडी झाल्‍यास अनेकजण या पुलाचा आधार घेत असतात. परंतु, हा पूल रात्रीच्‍यावेळी त्‍या परिसरातील बारमध्‍ये जाणाऱ्यांच्‍या वाहनांसाठी पार्किंगचा अड्डा बनलेला आहे. रात्रीच्‍यावेळी तेथे जाणारे अनेक ग्राहक पुलावरच पार्किंग करतात. त्‍यातच देशी-विदेशी पर्यटक नियमाचे उल्लंघन ‘नो एंट्री’ असतानाही विरुद्ध दिशेने येतात. त्‍याचा फटका अनेकदा इतर वाहन चालकांना बसत असतो. अनेक मंत्र्यांचा ताफाही रात्रीच्‍यावेळी याच पुलावरून जात असतो. तरीही मंत्री या बेशिस्‍तीकडे का दुर्लक्ष करतात? असा प्रश्‍‍न पाटो परिसरातील नागरिकांकडून उपस्‍थित होत आहे. ∙∙∙

‘त्‍या’ भूमिकेचा संबंध राजकारणाशी!

पक्षशिस्‍तीचा भंग केल्‍याच्‍या कारणात्‍सव मंत्रिमंडळातून वगळण्‍यात आल्‍यानंतर प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांनी मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. गत विधानसभा निवडणुकीत मगोच्‍या दीपक ढवळीकर यांच्‍याविरोधात अवघ्‍याच मतांनी त्‍यांना विजय मिळालेला होता. त्‍यामुळे २०२७ ची विधानसभा निवडणूक तितकी सोपी नसेल, हे लक्षात घेऊनच त्‍यांनी काम सुरू केले आहे. गावडे जसे राजकारणी आहेत, तसेच नाट्य कलाकारही आहेत. त्‍यामुळे मंत्री असतानाही नाटकात भूमिका करणे त्‍यांनी सोडले नाही. नुकतीच त्‍यांनी गोवा मुक्तीसाठी बलिदान दिलेल्‍या बाळा राया मापारी यांच्‍या जीवनावर आधारित नाटकात ‘प्राण ओतून’ भूमिका केली. त्‍याबाबत उपस्‍थितांनी त्‍यांचे कौतुकही केले. त्‍यानंतर मात्र त्‍यांची नाटकातील भूमिका आणि राजकारण, याचा संबंध भाजपच्‍या कार्यकर्त्यांकडूनच जोडण्‍यास सुरुवात झाल्‍याची चर्चा फोंडा परिसरात सुरू आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vehicle Theft Case: मायणा कुडतरी पोलिसांची मोठी कारवाई, वाहन चोरीप्रकरणी दोघांना ठोकल्या बेड्या; 5 दुचाकीही जप्त

ऑफिसरसाहेब गोत्यात! नवरा रुममध्ये गर्लफ्रेंडसोबत असताना अचानक बायकोची एन्ट्री, रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा Watch Video

पाकिस्तानात हिंदू मुलीचं अपहरण, जबरदस्तीनं धर्मांतर करुन मुस्लिम वृद्धाशी लावलं लग्न; कोर्टानं दिला 'हा' निर्णय

Viral Video: सायकलचं चाक लावून बाईकला जोडला पलंग, पठ्ठ्यानं झोपून चालवली गाडी; बिहारी तरुणाचा जुगाड तूफान व्हायरल

Viral Post: 'ब्रेकअप झालंय, कामात मन लागत नाही!' सुट्टीसाठी कर्मचाऱ्यानं केलेला मेल व्हायरल, पठ्ठ्याला मिळाली 10 दिवसांची सुट्टी

SCROLL FOR NEXT