Panjim Smart City Dainik Gomantak
गोवा

Panjim Smart City: माझी ‘पणजी जोडो’ पदयात्रा

सहनशीलतेची व गतिशीलतेची परीक्षा घेणारी वाहतूक कोंडी पाहिली.

गोमन्तक डिजिटल टीम

डॉ. ऑस्कर रिबेलो

जर तुम्ही अश्मयुगीन खडकाच्या खाली राहत असाल तर, मी तुम्हांला अद्ययावत करू इच्छितो...

पुतीन आणि त्यांच्या माफियांनी युक्रेनवर आक्रमण करण्याआधीच, स्मार्ट सिटीच्या नावाखाली आमचे स्थानिक माफिया गेल्या एक वर्षाहून अधिक काळ राजधानीत आपला नसलेला उजेड पाडत आहेत. पणजीत निर्माण झालेले भूमिगत बंकर आणि खड्ड्यांची संख्या पाहून म्हणे दुसऱ्या विश्‍वयुद्धातील नाझी अभियंत्यांनी लाजेने थडग्यातच माना खाली घातल्या.

गणिकेची वस्त्रे काढून ठेवली आहेत आणि पतिव्रतेची वस्त्रे सापडत नाहीत, अशा ‘अलौकिक’ अवस्थेतल्या पणजीचे, विकासाच्या नावाखाली केलेले विद्रुपीकरण उघडे पडत आहे. निलाजरेपणासही लाज वाटावी, असे हे तिचे दर्शन, तिला भेट देणाऱ्या जी-२० शिष्टमंडळाच्या नजरेत, सर्व आतील रस्ते न दाखवल्यामुळे, आले नसावे. अन्यथा त्यांनीही असाहाय्य नागरिकांप्रमाणेच स्वत:चे डोळे फोडून घेतले असते.

एकही दात शिल्लक नसलेल्या तोंडावर पडलेल्या हजारो सुरकुत्यांच्या जंजाळातूनही आपल्या पणजीचा (आईवडिलांच्या आजीचा) अनुभवांनी समृद्ध झालेला चेहरा, आपल्याला नितांत सुंदर दिसतो. पण, अगणित खड्डे पडलेला आपल्याच पणजी शहराचा चेहरा मात्र; भकास, कुरूप, उदास दिसतो.

हे कमी होते की काय म्हणून एकमेव चालण्यायोग्य (वाहन चालवण्यायोग्य वगैरे दूरच राहिले) रस्ता ज्याला दयानंद बांदोडकर मार्ग म्हणतात तो कसलीच ‘दया’ न दाखवता डांबरीकरण केल्यामुळे ‘आनंद’ वाटण्यापलीकडे गेला आहे.

कुणी वाहनच काय, धड चालूही नये या अत्यंत प्रामाणिक उद्देशाने तयार होत असलेल्या रस्त्यांना मात देण्याचा मार्ग मी शोधून काढला. मिरामारहून कार घेऊन निघालो आणि तिला एका अद्याप खड्डे न घातलेल्या रस्त्याच्या बाजूला (मी कुठला तो अजिबात सांगणार नाही.

कदाचित माझी कार चोरतील ते चोरतील, वरून पार्क करायची जागाही पळवतील.)पार्क केली आणि पायी चालत निघालो. जो काही अनिर्वचनीय, अवर्णनीय अनुभव आला तो मोठमोठ्या योग्यांनाही कैक वर्षे खडतर तपश्‍चर्या करूनही लाभत नाही.

पहिला पाऊस, तापलेले डांबर, उडणारी धूळ आणि जंगलांसह अनेक ठिकाणी लागत असलेली आग एकत्र केल्यावर जी ‘पारलौकिक’ अनुभूती येईल ती, लोकहो प्रत्यक्ष अनुभवली! (इथे मला गहिवरून आले आहे, उन्मनी अवस्थेतील योग्यासारखे आनंदाश्रू डोळ्यातून वाहत आहेत.)

आता लौकिकार्थाने जे दिसले ते सांगतो;

सहनशीलतेची व गतिशीलतेची परीक्षा घेणारी वाहतूक कोंडी पाहिली. त्या कोंडीत चारचाकीत, नाइलाजाने का होईना प्राप्त परिस्थिती स्वीकारलेले हताश पालक आपल्या मुलांना शाळेतून परत घेऊन जाताना (की आणताना?) पाहिले. घरी पोहोचेपर्यंत बहुधा त्यांची मुले दुसऱ्या इयत्तेत जातील. पण, ‘भिवपाची गरज ना’, हा मंत्र ते मुलांना शिकवत होते.

दुचाकीवरून धावताना वृद्ध पादचाऱ्यांना जरासा धक्का लावून पाडत पळणारे पत्रकार दिसले. ‘व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवण्याच्या त्यांच्या बाण्याला’ अनुसरून पडलेले सिग्नल अजिबात न जुमानत दुचाकीवरून धूम ठोकण्याचा निर्भीडपणाही मनाला भिडला.

अनेक जणांना मोन्सेरात यांना शाप देतानाही पाहिले. पण, या भक्त लोकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, मोन्सेरात हे भाजपला संजीवनी बुटी (शिक्षणमंत्री असताना स्वत: हातात ‘संजीवनी’ बाटली घेऊन फिरायचे म्हणे) आणणाऱ्या रामभक्त हनुमानासारखे आहेत. पणजीत खोदकाम करून कदाचित ते २०२४साठी संजीवनीच शोधत असावेत.

सांतिनेज चर्चसमोर एक अवाढव्य खड्डा खोदलेला आहे. गरीब बिचारा पाद्री चर्चच्या आत आणि बाहेर कसा जातो, याचे मला आश्‍चर्य वाटले. सहज चौकशी केली तेव्हा एका उपक्रमशील अभियंत्याने मला सांगितले की, ते विवर पाण्याने भरतात आणि फादर त्यावर चालतात!!

त्याच अभियंत्याने मला हळूच हेही सांगितले की, ते सांडपाण्याच्या पाइपलाइन टाकण्यासाठी दफनभूमीतही खोदणार आहेत म्हणे. ‘रेस्ट इन पीस’ असलेल्या प्रेतांना कधी लघवी किंवा संडासला जावे लागेल सांगता येत नाही. त्यामुळे, ही स्मार्ट योजना आहे म्हणे.

मी चालता चालता पणजी जिमखाना मैदानाचे निरीक्षण केले. स्टायलिश, प्रभावी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे खाजगी व्यक्तींनी चालवलेले. तत्क्षणी एखाद्या सरकारी बाबूने ते चालवले असते तर कसे दिसले असते याचे विचित्र चित्र नको म्हणत असतानाही डोळ्यांना त्रास देऊन गेले.

सुटलेली पोटे आवरत क्रिकेट खेळणारे मध्यमवयीन पुरुष. त्यांची सुटलेली पोटे, खोकणे, शिंकणे आणि त्यांना फुटलेला घाम पाहून मला घाम फुटायची पाळी आली.

पण, या ‘पणजी-जोडो’ पदयात्रेत सर्वांत विलक्षण प्रकार माझी वाट पाहत होता. माझी गाठ पडली ती रस्त्यावर काम करणाऱ्या एका बाहेरच्या मजुराशी. त्याच्यातून धूर निघत होता. पहिल्यांदा मला वाटले तो रोहितच असावा. मग लक्षात आले की, डांबराचे थरावर थर रस्त्याला मारून त्याच्या सर्वांगातून धूर बाहेर निघत होता.

न राहवून मी त्याला नसलेल्या राष्ट्रभाषेत विचारले, ‘कब पुरा होगा?’ तो अथांग ज्ञान असल्यासारख्या भविष्यवेत्त्यासारखा तो म्हणाला,

‘एक हफ्ता लगा सकता है,

एक महिना भी लग सकता है,

या शायद एक साल भी.’

एखाद्या तत्त्वचिंतकासारखी त्याची धूम्रवलयांकित मुद्रा पाहून आग विझलेल्या धुरासारखा विचारहीन झालो.

‘भारताच्या ग्रामीण भागात आपण अन्न, पाणी, रस्ते याशिवाय आयुष्यभर जगतो. तुम्हा शहरी लोकांना स्वत:चे लाड करून घ्यावेसे वाटतात. स्मार्ट होण्याच्या हव्यासापोटी अधिक मूर्ख बनत जाता...’, असे अनेक विचार त्याच्या मौनातून ओसंडत होते.

या पदयात्रेतून जे काही ‘हाती’ लागले ते घेण्याशिवाय, मूर्खपणा हुशारीने स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नव्हते. त्यामुळे, जे झाले ते झाले, निदान आता एवढे तरी करा असे, मार्क्स न मिळालेल्या कार्लसारखे दाढी वाढवत सुचवावेसे वाटते.

वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत हेलिकॉप्टर राईड बुक करा.जेव्हा तुम्ही पावसाळा सुरू होईल, तेव्हा तुम्ही एखाद्या खड्ड्यात बुडू नये म्हणून स्वतःला तरंगत ठेवण्यासाठी आणि श्वास घेण्यासाठी आतापासूनच व्यवस्था करा. तुमचा कोविड मास्क पुन्हा शोधा आणि तो तोंडावर लावा, जेणेकरून वायूप्रदूषणाने तुमच्या फुफ्फुसांना खाऊ नये.

कॅसिनोपैकी एका जहाजावर कायमस्वरूपी केबिन बुक करा. कारण, ते अद्याप मांडवीचे ड्रेजिंग आणि खोदकाम करत नाहीत आणि हो, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे डबल इंजिन सरकारला मत द्या. एवढ्या खोदकामानंतर, त्यांना कदाचित ढिगाऱ्याखाली सोन्याची खाण सापडेल आणि आपण सर्व श्रीमंत किंवा मृत होऊ शकतो! दरम्यान माझी पदयात्रा सुरूच राहील. कुठेतरी दोन ओळी वाचल्या होत्या; रक्ताळलेली फाटलेली होती पावले त्याची, आजन्म बहुधा सन्मार्गावर चालला असावा

सन्मार्ग सोडा, मी पणजीत पादत्राण घालून जरासा चाललो, तरीही आतून माझी पावले फाटली, रक्ताळली होती. तरी मी पदयात्रा करण्याचे काही सोडणार नाही. माझे हृदय फाटले तरी चालेल, कुणा दहशतवाद्याने माझ्याकडे हसून न पाहता गोळी घातली तरी चालेल, धुळीमुळे खोकला होऊन गोळी घ्यावी लागली तरी चालेल, पण या पणजी शहरासाठी मी निरंतर चालतच राहीन! कायमचे आणि सदैव !!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT