डिचोली: मुळगावच्या ग्रामसभेत पुन्हा एकदा खनिज खाण आणि क्रीडा मैदानाचा विषय ऐरणीवर आला. लीजक्षेत्र आदी प्रमुख प्रश्न सुटत नसतील, तर येथील खनिज खाण बंद करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. खाणप्रश्नी ग्रामस्थांची जाहीर सभा घेण्याचीही मागणी ग्रामस्थांनी केली.
सरपंच मानसी कवठणकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी मुळगाव पंचायतीची ग्रामसभा पार पडली. या सभेस उपसरपंच गजानन मांद्रेकर यांच्यासह विशालसेन गाड, मधुकर हळर्णकर, तृप्ती गाड, सुहासिनी गोवेकर आणि सिद्धनाथ कलशावकर हे सर्व पंच उपस्थित होते. मानसी कवठणकर यांनी स्वागत केले. सचिव पुंडलिक गावस यांनी मागील ग्रामसभेचा इतिवृत्तांत सादर केला.
माजी सरपंच वसंत गाड यांनी खाणीचा विषय उपस्थित केला. खाण कंपनी व्यवस्थापनासमोर गावच्या प्रमुख १५ मागण्या ठेवण्यात येऊनही त्याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे. गावचे प्रश्न सुटत नसतील, तर खाण व्यवसाय काय कामाचा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. खाणप्रश्नी ग्रामस्थांची जाहीर सभा घेण्याची मागणीही त्यांनी केली.
खाण लीज क्षेत्रातून घरादारांसह धार्मिक स्थळे आणि शेतीबागायती बाहेर काढा, २०२१ च्या प्रादेशिक आराखड्यानुसार ''बफर झोन'' निश्चित करा, खाणीवरील रात्रपाळी बंद करा, वाऱ्यावर टाकलेल्या कामगारांना पुन्हा सेवेत घ्या या मुळगाववासियांच्या प्रमुख मागण्यांकडे कंपनी व्यवस्थापन काणाडोळा करीत आहे, असा दावा त्यांनी केला.
खाण व्यवसायावर वेळीच नियंत्रण आले नाही, तर गावावर मोठे संकट कोसळणार, अशी भीती कोमुनिदादचे अध्यक्ष महेश्वर परब यांनी व्यक्त केली.
या ग्रामसभेत क्रीडा मैदानाचा विषय पुन्हा एकदा उपस्थित करण्यात आला. क्रीडा मैदान प्रश्नी युवकांनी पंचायत मंडळाला धारेवर धरले. विकासकामांसंदर्भात ग्रामसभेत चर्चा झाली.
शेतकरी समितीचे प्रकाश परब, देवस्थानचे अध्यक्ष कृष्णनाथ परब, जैवविविधता समितीचे स्वप्नेश शेर्लेकर, तुषार परब आदींनी ग्रामसभेत भाग घेताना विविध प्रश्न उपस्थित केले.
ग्रामसभेच्या सुरवातीस मुळगावचे एक ज्येष्ठ नागरिक आणि मृत पावलेले स्व. जयराम राऊत यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या ग्रामसभेस पन्नासच्या आसपास ग्रामस्थ उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.