Goa Drugs Dealers: एका बाजूला उंच हिरवेगार डोंगर आणि दुसऱ्या बाजूला निळाशार अथांग समुद्र यामुळे गोव्याची प्रतिमा संपूर्ण जगात ‘पर्यटकांचे नंदनवन’ अशी झाली. आता ही प्रतिमा पूर्णपणे डागाळली जात आहे. गोव्यात अमली पदार्थांचा जो सुळसुळाट सुरू आहे, तो पाहिल्यास गोव्याची ‘ड्रग्स कॅपिटल ऑफ इंडिया’ अशी नवी ओळख बनू लागली आहे.
हैदराबादचे पोलिस आयुक्त सी. व्ही. आनंद यांनी हल्लीच जी खळबळजनक मुलाखत दिली, त्यात गोव्यातील या काळ्या बाजूवर लखलखीत प्रकाश पडला. गोव्यात अमली पदार्थ व्यवहाराची जी व्याप्ती आहे, ती पाहून देशातील बड्या ड्रग्स डिलर्सनी आपले राज्य सोडून गोव्यात बस्तान मांडले आहे. गोव्यात अनेक आंतरराष्ट्रीय ड्रग्स कार्टेल्स सक्रीय असून त्यात नायजेरियन आणि रशियन माफियांचा समावेश आहे.
काही महिन्यांपूर्वी हैदराबाद पोलिसांनी एका मोठ्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्याचा संबंध गोव्याशी होता. यात हरियाणा येथील नरेंद्र आर्य याचा समावेश होता. हरियाणाचा हा ड्रग्स माफिया गोव्यातून आपले व्यवहार चालवत होता, असे उघड झाले होते.
गोव्यात जो अमली पदार्थ व्यवसाय चालू आहे त्यामागे राजकीय व्यक्तींचा हात असून त्यामुळेच हा व्यवसाय गोव्यात बिनबोभाट चालू असल्याचे सांगितले जाते. 2018 मध्ये गोव्यात शिवोली (Siolim) येथे धाड घालून मोठ्या प्रमाणात केटामाईन (Ketamine) हा अमली पदार्थ जप्त केला होता. त्यावेळी भाजपशी संबंधित एका व्यक्तीकडे बोट दाखविले जात होते. जानेवारी ते जून या पहिल्या 6 महिन्यांत गोव्यात 92 किलो अमली पदार्थ जप्त केले आहेत. या ड्रग्सची किंमत 2 कोटींच्या घरात असल्याचे सांगितले जाते. असे जरी असले तरी पकडलेले हे ड्रग्स म्हणजे एकूण व्यवसायाच्या तुलनेत केवळ हिमनगाचे टोक आहे.
कर्लिस-प्रीतेश कनेक्शन उघड
प्रीतेश बोरकरचा देशभरातील अनेक ड्रग्स डिलर्सशी संबंध असून ड्रग्स घेण्यासाठी हे डिलर्स बोरकर याच्याशी संपर्क साधत होते. गोव्यात येणाऱ्या अनेक सिलिब्रिटींशी (Celebrity) त्याचा संबंध होता. कर्लिसचा केअर टेकर एडविन नुनीस याच्यासाठी प्रीतेश काम करत होता, असा दावाही हैदराबादचे पोलिस आयुक्तांनी केला आहे. या प्रकरणी हैदराबाद पोलिसांनी हाफिझ रमलान, नवनीत अनुप आणि निकोलस नावाच्या एका नायजेरियन संशयिताला अटक केली होती. त्यांचाही संबंध गोव्याशी होता.
गोवा नाॅर्को टुरिझम हॉटस्पॉट
गोव्याची आता नवी ओळख नाॅर्को टुरिझम हॉटस्पॉट अशी झाली आहे. गोव्यात नायजेरियन (Nigerian) आणि रशियन (Russian) टोळ्या या व्यवसायात सक्रीय असून काही रशियन नागरिकांनी गोव्यात गांजाची लागवड केल्याचेही यापूर्वी दिसून आले आहे. 2018 मध्ये अंजुणा येथे आपल्या आपार्टमेंट मध्ये गांजाची लागवड केल्याने एका रशियन नागरिकाला अटक केली होती. 2019 मध्ये मोरजी येथे अशाच प्रकारे गांजाची लागवड करण्याच्या आरोपाखाली 4 रशियन नागरिकांना अटक केली होती.
हिमाचल प्रदेश मुख्य स्रोत
गोव्यात मुख्यतः गांजाची (Drugs) तस्करी होत असून हे अमली पदार्थ हिमाचल प्रदेश मधून येत असल्याचे उघड झाले होते. 2021 मध्ये पेडण्यात ड्रग्स तस्करी करणाऱ्या टायगर मुस्तफा या नायजेरियन व्यक्तीला अटक केली असता आसगाव येथून दोन हिमाचली व्यक्तीच्या साहाय्याने तो गोव्यात ड्रग कार्टेल चालवीत होता हे उघड झाले होते. काही दिवसापूर्वी गोव्यात एका नायजेरियन महिलेला अटक केली असता तिने आपल्या सँडलमध्ये लपवून 15 लाखांचे ड्रग्ज आणण्याचे उघड झाले होते.
आमदार युरी आलेमाव-
2018 मध्ये भाजप पदाधिकाऱ्यांच्या कारखान्यातून ‘केटामाइन ड्रगचा प्रचंड साठा जप्त’ (Ketamines Drug) करण्याची घटना ते आज इतर राज्याच्या पोलिसांनी गोवा पोलिसांना दिलेले अंमली पदार्थ तस्करांना पकडण्यासाठी ‘असहकाराचे प्रमाणपत्र’ हे भाजपच्या राजवटीत गोवा ड्रग डेस्टिनेशन म्हणून ‘स्वयंपूर्ण’ बनल्याचे प्रतिबिंब आहे
* क्रिप्टो करन्सीचा वापर: आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सारा व्यवहार ऑनलाईन पद्धतीने होत असून यासाठी क्रिप्टो करन्सीचा (Crypto Currency) वापर केला जातो. यासाठी ‘डार्क वेब’ या नेटवर्कचा वापर केला जातो. हे वेब उघडण्यासाठी खास सॉफ्टवेअरची गरज असते. याच माध्यमातून गोव्यातून ड्रग्सचा आंतरराष्ट्रीय व्यवहार होतो, असे आनंद यांनी म्हटले आहे. गोव्यातून ड्रग्स घेऊन हैदराबादला गेलेल्या प्रीतेश बोरकर याला तेथील पोलिसांनी पकडले होते.
* सहा वर्षांची आकडेवारी: गेल्या 6 वर्षांची आकडेवारी पाहिली तर या व्यवसायात सक्रीय असलेल्यांना 167 जणांना 2017 मध्ये, 222 जणांना 2018 मध्ये, 219 जणांना 2019 मध्ये, 148 जणांना 2020 मध्ये, 121 जणांना 2021 मध्ये तर या यावर्षी पहिल्या सहा महिन्यांत 54 जणांना अटक केली आहे, अशी पोलीस दफ्तरात नोंद आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.