वास्को: घरपट्टीच्या बनावट पावत्या दिल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या मिल्टन डिसोझा या कारकुनाला मुरगाव पालिकेचे मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांनी इतरांना विश्र्वासात न घेता पुन्हा त्याच पदावर आणल्याने नगराध्यक्ष गिरिष बोरकर, उपनगराध्यक्ष रामचंद्र कामत तसेच इतर नगरसेवकांनी संताप व्यक्त केला आहे.
सिद्धिविनायक नाईक यांनी अचानकपणे मिल्टन याला पालिका संचालनालय प्रशासकीय कार्यालयातून मुरगाव पालिका कार्यालयात आणले. तेथे त्याला पूर्वीच्या पदावरील कामे देण्यात आली. यामुळे नगरसेवक-नगरसेविकांमध्ये तसेच नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली. त्या चर्चेचे पडसाद मंगळवारी (ता२२) उमटले. नगराध्यक्ष बोरकर यांनी सिद्धिविनायक नाईक यांना आपल्या केबिनमध्ये बोलावून मिल्टनसंबंधी विचारणा केली. त्यावेळी तेथे इतर काही नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. यावेळी गरमागरम चर्चारूपी वाद झाला. वातावरण गरम होत असल्याचे पाहून नाईक हे नगराध्यक्षाच्या केबिनमधून बाहेर गेले.
आपणास मानवाधिकार आयोग कार्यालयातून फोन आल्याने आपण सदर निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण सिद्धिविनायक यांनी दिले. पण त्यासंबंधी काही लेखी दस्तऐवज आहे काय? एका फोनवर कसा निर्णय घेतला जाऊ शकतो? असा सवाल बोरकर यांनी विचारला. मुरगाव पालिकेचे कारकून मिल्टन डिसौझा यांनी घरपट्टीसंबंधीच्या बनावट पावत्यांचा वापर करून काही जणांकडून घरपट्टी घेऊन आपल्या खिशात घातली होती.
याप्रकरणी मे २०२३ मध्ये लेखा अधिकारी उदय वाडकर यांनी वास्को पोलिस स्थानकात तक्रार केली होती. त्यामुळे पालिका संचालकाने मिल्टनला सेवेतून निलंबित केले होते. त्यानंतर त्याने सदर रक्कम भरण्याची तयारी दर्शविल्याने काही नगरसेवकांना त्याच्याविरोधात कारवाई नको, अशी भूमिका घेतली होती. त्याला निलंबित करून सहा महिने होत आले असतानाही त्याची कोणतीही विभागीय चौकशी करण्यात आली नव्हती.
ऑक्टोबर २०२३ ला मुरगाव पालिका मंडळाच्या बैठकीत त्याच्याविरोधात कारवाई करण्याचा ठराव बहुमताने संमत करण्यात आला. त्यानंतर एका घडामोडीत वास्को पोलिसांनी मे महिन्यात दिलेल्या तक्रारीची दखल घेताना मिल्टनविरोधात गुन्हा नोंद केला होता. त्यानंतर त्या पालिका संचालनालय प्रशासकीय कार्यालयात हजेरी लावत होता. त्याच्याविरोधात न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.