Morjim News : मोरजी पंचायत क्षेत्रातील गावडेवाडा-विठ्ठलदासवाडा या किनारी भागातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाल्यामुळे स्थानिक पंच सदस्य विलास मोरजे यांनी पदरमोड करून भले मोठे खड्डे भर पावसात बुजवले.
राज्यात सार्वजनिक बांधकाम खाते रस्ता विभाग अस्तित्वात नसल्यामुळे किंवा अस्तित्वात असेल तर ते झोपी गेल्यामुळे रस्त्यांची जी वाताहत झाली आहे, त्यांची तात्पुरती दुरुस्ती करण्यास या विभागाला वेळ नाही.
त्यामुळे स्थानिक नागरिक, पंचांना पुढाकार घेऊन, पदरमोड करून मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये दगड टाकून तात्पुरती डागडुजी करावी लागत असल्याची टीका करण्यात येत आहे.मोरजी पंचायत क्षेत्रातील विठ्ठलदासवाडा, गावडेवाडा या किनारी भागातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांचे या खात्यावर नियंत्रण नसल्यामुळेच लोकांना भर पावसात रस्त्यावरील खड्डे चुकवत जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. कधी कधी खड्ड्यांमध्ये वाहने जाऊन प्रवाशांचे कंबरडे मोडून जाते. त्यामुळे लोकांना आरोग्याच्या समस्याही निर्माण झाल्या आहेत.
मोरजी गावातील रस्त्यांवरून वाहने चालवताना प्रवासी, तसेच वाहनचालकांना बराच त्रास होतो. याबद्दल ग्रामस्थांच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे बांधकाम खात्याच्या रस्ता विभागाला वारंवार विनवण्या केल्या; परंतु कोणीच लक्ष दिले नाही. शेवटी आम्हालाच हे खड्डे बुजवण्यासाठी प्रयत्न करावे लागले.
- विलास मोरजे, पंच, मोरजी.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.