मोरजी: मोरजी समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले सागरी कासवांच्या संवर्धनासाठी वन खाते गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करत असताना, शापोरा नदीच्या मुखाशी सुरू असलेल्या रेतीउपशामुळे या संवर्धन मोहिमेवर गंभीर संकट निर्माण झाले असल्याची चिंता पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.
१९९७ सालापासून मोरजी परिसरात कासव संवर्धन मोहीम राबवली जात आहे. चालू हंगामात आतापर्यंत १८ सागरी कासवांनी सुमारे १,९०० अंडी घातली असून, ती सुरक्षित ठेवण्याचे काम वन खात्याच्या वतीने सुरू आहे. मात्र, शापोरा नदीतील रेतीउपशामुळे संवर्धन क्षेत्रातील जमिनीची धूप होऊन मोठे खड्डे पडले आहेत.
या भागातील सुमारे ५०० चौरस मीटर जमीन तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी कासव संवर्धनासाठी आरक्षित केली होती. सध्या या ठिकाणी समुद्राचे पाणी शिरल्याने मऊ वाळू घट्ट बनली असून कासवांना अंडी घालताना अडचणी येत आहेत. परिणामी कासव इतर किनाऱ्यांकडे वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अंड्यांच्या सुरक्षिततेवरही गंभीर परिणाम होत आहे.
३० डिसेंबरपासून सुरू झालेला रेतीउपसा २१ जानेवारीनंतर वेगाने सुरू झाला असून, निविदेतील अटींनुसार रात्री ९ वाजल्यानंतर कामास मनाई असतानाही रात्रीच्या वेळेस रेतीउपसा सुरू असल्याचे समोर आले आहे.
ऑलिव्ह रिडले कासव भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत संरक्षित असून, प्रजनन काळात होणारा आवाज व समुद्रतळातील बदल त्यांच्या अस्तित्वासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे शासनाने रेतीउपसाच्या कामावर तत्काळ मर्यादा घालून कासव संवर्धन क्षेत्राचे संरक्षण करावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.