पणजी : बंगालच्या उपसागरात नियमित वेळेअगोदर दाखल झालेला मॉन्सून केरळमध्येही तीन दिवस अगोदर पोहोचला आहे. मात्र, नैऋत्य मौसमी वाऱ्यांचा वेग आणि दिशा पाहिल्यास मॉन्सूनच्या घोडदौडीला गती नाही, असे हवामान तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे केरळमध्ये वेळेआधी दाखल झालेल्या मॉन्सूनसाठी गोव्यात ठरलेल्या वेळेत म्हणजे, पाच जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. (Goa Monsoon Updates)
दक्षिण बंगालच्या उपसागरात वेळेपूर्वी मॉन्सून सक्रिय झाला आणि अंदमान निकोबारमध्ये तो 20 मे रोजी म्हणजे वेळेअगोदर पाच दिवस पोहोचला. हे मॉन्सूनचे आगमन आणि पूर्वानुभव या आधारे केरळमध्ये मॉन्सून 27 मे म्हणजे, वेळेअगोदर दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र, दक्षिण अरबी समुद्रात मॉन्सून वाऱ्यांसाठी पोषक स्थिती नसल्याने तब्बल तीन दिवस मॉन्सून अरबी समुद्रातच रेंगाळत राहिला. 28 मे रोजी मॉन्सूनला आवश्यक असलेली पोषक स्थिती निर्माण झाल्याने केरळमध्ये 14 पैकी 10 ठिकाणी समाधानकारक पाऊस पडल्याने मॉन्सूनचा करंट वेग- समुद्रावरून वाहणारी आर्द्रता आणि पावसाळी ढगांची उंची - यावरून आज हवामान खात्याने पावसाचा पुढचा टप्पा घोषित करत मॉन्सून आल्याचे हवामान खात्याने जाहीर केले.
2 जूनपासून मॉन्सूनसाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता असल्याने 3 जूननंतर मॉन्सून कधीही राज्यात दाखल होऊ शकतो. मात्र, राज्यात पुढील चारही दिवस मॉन्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत राहतील, असा हवामान खात्याच्या वेधशाळेचा अंदाज आहे.
...तर वेळेआधीही मॉन्सून : मॉन्सूनच्या वाटचालीसाठी अत्यावश्यक असलेली स्थिती म्हणजेच मॉन्सून करंट अद्यापही थंडावलेला आहे. मात्र, पोषक हवामान स्थितीतही काही बदल झाल्यास मॉन्सून गोव्यात 5 जून ऐवजी त्याअगोदरही दाखल होऊ शकतो, असा अंदाज आहे.
अनियमितता कायम
दक्षिण बंगालच्या उपसागराजवळ सक्रिय होणारा मॉन्सूनवर विषुववृत्तीय तापमानाचा मोठा प्रभाव राहतो.
प्रशांत महासागरातील ‘ला निनो’ आणि ‘एल निनो’ स्थिती मॉन्सूनच्या त्या त्या वर्षाच्या पडणाऱ्या पावसासाठी पूरक व प्रतिकूल असते.
अशा स्थितीतही अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण होणारे कमी दाबाचे पट्टे आणि खंडीय प्रदेशातील उष्णता पावसावर परिणाम करू शकते.
2002 मध्ये संपूर्ण देशात मॉन्सून सक्रिय होण्यासाठी 75 दिवस लागले होते, तर 2013 मध्ये केवळ 16 दिवसांत संपूर्ण देश व्यापला होता.
याशिवाय गेल्या 30 वर्षांचा मॉन्सूनचा आलेख पाहिल्यास त्यातील अनियमितता दिसून येते.
केरळमध्ये दाखल झालेला मॉन्सून गोव्यात दाखल होण्यास 5 ते 6 दिवस लागतात. याला मागील वर्ष अपवाद आहे. 2020 मध्ये या प्रवासासाठी त्याला 6 दिवस लागले. यंदाही पाऊस किंवा काहीसा जास्त पडेल, अशी स्थिती आहे.
- डॉ. एम. रमेश कुमार, हवामान तज्ज्ञ
केरळमध्ये मॉन्सून सक्रिय झाल्याची घोषणा आज हवामान खात्याने केली आहे. भारतीय उपखंडासाठी ही आनंददायी बाब आहे. यंदा मॉन्सून वेळेअगोदर दाखल होत आहे. गोव्यात येण्यासाठी मात्र चार ते पाच दिवसांची वाट पाहावी लागेल.
- एम. राहुल, वैज्ञानिक, गोवा वेधशाळा
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.