फातोर्ड्यातून निवडणूक लढवण्यात आपल्याला रस नसल्याचे दामू नाईक वारंवार सांगत आहेत. मात्र त्याचवेळी मतदारसंघातील त्यांचा वाढलेला वावर, विकासकामांचा लेखाजोखा आणि प्रत्येक कार्यक्रमातील प्रमुख उपस्थिती यामुळे कार्यकर्ते गोंधळात पडले आहेत. ‘मी उमेदवार नाही’ हे वाक्य जितक्या वेळा ऐकू येते, तितक्याच वेळा ‘मग उमेदवार कोण?’ हा प्रश्न अधिक तीव्र होतो. भाजपच्या बैठकीपासून सामाजिक कार्यक्रमांपर्यंत दामूंची उपस्थिती इतकी ठळक असते की त्यांच्याशिवाय कार्यक्रम अपूर्ण वाटावा. त्यामुळे फातोर्ड्यात सध्या अशी कुजबूज आहे की, उमेदवारीबाबतचा नकार हा राजकारणातील नेहमीचा ‘होकार देण्यापूर्वीचा नकार’ तर नाही ना? निवडणूक अजून दूर असली तरी चर्चेच्या मैदानात दामू मात्र आधीच आघाडीवर दिसत आहेत. ∙
सावर्डेत नेमके कितीजण आहेत उत्सुक?
सावर्डेचे युवा नेते संकेत आर्सेकर यांनी आपल्या वाढदिवस सोहळ्यात ‘आता माघार नाही’ असे वक्तव्य केल्यामुळे सावर्डेचे राजकीय वातावरण नाही म्हटले तरी तापू लागले आहे. त्यातच भाजपचे सावर्डे मंडळाचे अध्यक्ष किशोर गावस देसाई यांनी ‘सावर्डेच्या भाजप उमेदवारीवर आपल्यासह एकूण दहाजणांनी दावा केला आहे’ असे वक्तव्य केले आहे. गणेशभाऊंसह सध्या सावर्डे मतदारसंघात विनयभाईही सक्रीय झाले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात भाजपची उमेदवारी नेमकी कुणाला हा संभ्रम तर निर्माण झाला आहेच, त्याहीपेक्षा इच्छुक उमेदवारांची अशी भाऊगर्दी झाल्याने सामान्य लोकांना मात्र आपल्याला आता ‘अच्छे दिन’ येणार याची जणू खात्रीच पटली आहे. ∙∙∙
तब्बल २ वर्षे लपवून ठेवला अहवाल!
कारे कायदा महाविद्यालयाचे प्राचार्य साबा डिसिल्वा यांनी आपल्या पुत्राला फायदा करून देण्यासाठी परीक्षा पद्धतीच बदलली होती. ‘गोमन्तक’ने हे कारस्थान उजेडात आणल्यावर आता तब्बल दोन वर्षांच्या विलंबाने विद्या विकास मंडळ या संस्थेने त्यांना सक्तीची निवृत्ती घेण्याचा आदेश जारी केला. वास्तविक प्राचार्य डिसिल्वा यांनी केलेला गुन्हा एवढा गंभीर स्वरूपाचा होता की त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची शिक्षा होणे आवश्यक होते. पण सुरवातीपासून विद्या विकास मंडळाने या प्राचार्यांच्या अशा कारनाम्यांवर पांघरूण घालण्याचाच प्रयत्न केला. वास्तविक डिसिल्वा यांच्या या कारस्थानाला वाचा फुटल्यावर गोवा विद्यापीठाने त्यांची चौकशी केली होती. ही चौकशी करणाऱ्या समितीला महाविद्यालयात काम करणाऱ्या लायब्ररियनाच्या साहाय्याने प्राचार्यांनी हे सर्व कांड केले असे दिसून आल्यावर त्या दोघांवरही कडक कारवाई करावी अशी नोंद करून हा चौकशी अहवाल महाविद्यालयाचे व्यवस्थापन चालविणाऱ्या विद्या विकास मंडळ संस्थेला पाठविला होता. पण व्यवस्थापनाने तब्बल दोन वर्षे हा अहवाल लपवून ठेवला आणि शेवटी त्या प्राचार्यांना छोटीशी शिक्षा सुनावत या संपूर्ण चौकशीची बोळवण केली. व्यवस्थापनाने शेवटपर्यंत प्राचार्यांच्या गुन्ह्यांवर पांघरूण घालण्याचेच काम केले असे म्हटल्यास ते चूक ठरणार का? ∙∙∙
हप्त्यांसाठी अभय
राज्यात अनधिकृत वाहन पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक नियमांच्या उल्लंघनप्रकरणी हजारो रुपयांचा दंड केला जातो. परंतु, दररोज रात्री पाटो येथील जुन्या पुलाच्या फुटपाथवर स्थानिकांसह अनेक पर्यटकही आपापली वाहने पार्क करतात. याची माहितीही असूनही या भागात गस्तीवर असलेले वाहतूक पोलिस मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाहीत. पोलिसांकडून केवळ हप्ते मिळवण्यासाठी त्यांना अभय देण्यात येत असल्याचा चर्चा स्थानिकांत सुरू आहे. या पोलिसांना सर्व ‘सुख’ तेथे मिळते, अशीही कुजबूज सुरू झाली आहे. ∙∙
मडगावचा दणकेबाज नाट्यमहोत्सव
मडगावच्या गोमंत विद्या निकेतन संस्थेचा ‘पंचमवेद’ हा नाट्यमहोत्सव यशस्वी झाला. काशिनाथ दामोदर नायक स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या महोत्सवाला ‘पोकळ वासा’ या नाटकाने दणकेबाज सुरवात झाली. आर्थुर मिलर या अमेरिकन नाटककाराचे ‘डेथ ऑफ अ सेल्समन’ (1949) नाटकाचे हे रूपांतर होते. पुण्याच्या ललीत कला केंद्राने सादर केलेल्या या नाटकात अत्युच्च परम कोटीचा अभिनय होता. तांत्रिक अंगे अप्रतिम. डोळ्यांचे पारणे फिटले. रसिक तृप्त झाले. वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे सादरकर्त्यांनी मूळ लेखकाचे नाव आदराने व अदबीने सांगितले. कोकणी कॉपी मास्तरांनी हे शिकावे. इतर अभिनेत्यांनी, तंत्रज्ञांनीसुद्धा अशी प्रायोगिक नाटके पाहून शिकले पाहिजे. ‘गर्भ’ हे हिंदी नाटक ऊर्जावंत होते. मडगावच्या सांस्कृतिक चळवळीला या महोत्सवाने व दत्ता नायक यांच्या आर्थिक पुढाकारामुळे शक्तीवर्धक नवसंजीवनी लाभली हे निश्चित. नाटकाच्या आधुनिक तंत्राचा वस्तुपाठ दत्ताबाबनी दाखवून दिला. शिका. ∙∙∙
झुंबरांना पाय फुटले की काय?
मडगाव नगरपालिकेच्या सभागृहातील चार मौल्यवान झुंबरांनी बहुधा स्वतःच नवा पत्ता शोधला असावा! साफसफाईसाठी काढल्याचे सांगितले जाते, पण परत आलेच नाहीत. गंमत म्हणजे इतक्या वर्षांत अनेक नगराध्यक्ष, नगरसेवक आणि अधिकारी बदलले, मात्र सभागृहाच्या छताकडे पाहण्याचे कष्ट कुणी घेतले नसावेत. फाईल्स, वसुली आणि विविध प्रकरणांमुळे आधीच चर्चेत असलेल्या या पालिकेने आता झुंबर गायब प्रकरणातही नाव कमावले आहे. झुंबर नेमके कुठे गेले, याचा शोध लागण्यापूर्वीच लोकांनी त्यांना ‘फरार’ घोषित केले आहे. काही जण म्हणतात, नगरपालिकेत वस्तूंना पाय फुटण्याची परंपराच निर्माण झाली आहे. चौकशी झाली तर झुंबरांचा पत्ता लागेल; पण तोपर्यंत या प्रकरणाची चर्चा चहाच्या टपरीपासून पालिकेच्या दालनापर्यंत रंगत राहणार, हे नक्की. ∙∙∙
सप्टेंबरपर्यंत का थांबता?
‘कल करेसो आज कर, आज करेसो अब’ अशी एक म्हण आहे. गोंयकारांच्या सुशेगाद वृत्तीसाठी खरे म्हणजे ती चपखल बसते. तर या म्हणीची आठवण येण्याचे कारण म्हणजे प्रदेश काँग्रेसने येत्या सप्टेंबरपासून गोव्यात जागृती मोहीम हाती घेण्याबाबत केलेली घोषणा. गोव्यात पुढील वर्षांच्या आरंभी विधानसभा निवडणूक होणार असेल तर एक वेळ अशी मोहीम ठीक होती. पण एकंदर राजकीय रागरंग पाहिला तर निवडणूक डिसेंबरपूर्वीही होऊ शकते. भाजपच्या हालचाली पाहिल्या तर तशी शंका घ्यायला वाव आहे. मग काँग्रेस कशाला वेळ काढत आहे? नवे प्रदेशाध्यक्ष कोणाची वाट पाहत आहेत? असे प्रश्न आता काँग्रेसवालेच करत आहेत. गेली अनेक वर्षे निष्क्रिय असलेल्या पक्षाला सक्रीय करायचे असेल तर खरे म्हणजे नव्या अध्यक्षांनी पद स्वीकारल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच ही मोहीम राबवायला हवी होती, असे आम्ही नव्हे तर काँग्रेसजनच म्हणत आहेत. ∙∙∙
उतराचो मनीस
स्वतःला ‘उतराचो मनीस’ म्हणवून घेणारी एक व्यक्ती गोव्यात होती, आजही तशी ती आहे. पण हाती सध्या कोणतेच पद नसल्याने ती गप्प आहे. पण साबांखामंत्री असलेल्या मडगावच्या दिगंबरबाबनी तसे स्वतःस म्हटले नसले तरी त्यांचे समर्थक त्यांना ‘उतराचो मनीस’ म्हणून मिरवतात. पावसाळ्यापूर्वी सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची घोषणा त्यांनी मे महिन्यात केली होती व महिना-दीड महिन्यात म्हणे साबांखाने सर्व खड्डे बुजविलेले आहेत. मडगाव जवळच्या ग्रामीण भागात त्याचे प्रत्यंतर येते हे खरे. मात्र त्यांना लक्ष्य करण्याची एकही संधी न सोडणारे मडगावातील काहीजण त्याचे श्रेय त्यांना देण्यास तयार नाहीत. ते म्हणतात, मान्सून लांबल्यामुळेच हे शक्य झाले. त्याचे क्रेडीट बाबांना नव्हे
तर मान्सूनला द्यावे लागेल. पण बाबाचे समर्थक मात्र ऐकायला तयार नाहीत. ∙∙∙
गोंयबाब आणि कोकणीवादी
शणै गोंयबाब जयंती उद्या. सावर्डेला ‘विशाल’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तुलनेत दोन प्रमुख कोकणी संस्थांकडून या 150व्या जयंती वर्षानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल अशी अपेक्षा होती. असो. गोंयबाब साहित्याचे वाचन महत्वाचे. ते किती जणांनी केलंय, हे मोजायला मीटर नाही. सर्व लेखकांच्या भाषेची बेरीज केली तर गोंयबाबांचे पारडे त्यांना बधणार नाही. गोंयबाब विद्यापीठांत गेले नव्हते. ते थोर स्कॉलर, भाषातज्ज्ञ होते. पदवी घेतली म्हणून विद्या येणं किंवा चांगलं वर्तन होणं अपेक्षित नसतं हा सर्वमान्य सिद्धांत आहे. ‘व्हाड्डीक करप’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय किंवा एस्टरॉईड याला गोंयबाबांनी कोकणीत पर्यायी शब्द काय दिला होता, हे शिक्षकांना विचारा. गोंयबाबांची कोकणी शब्दसंपदा अफाट. भाषाशैलीची शुद्धता अचाट. गोंयबाब साहित्याकडे विमुख होऊनही त्यांच्यावर व्याख्यानं देणं हे करंटेपणाचे (टणटणमारीपणाचे) लक्षण, असे गोंयबाब वाचलेले गोवेकर म्हणतात. ∙∙∙
विनयभाईंचा जनता दरबार आणि ‘संकेत’
सावर्डेचे माजी आमदार विनय तेंडुलकर यांच्या घरी अलीकडे ‘जनता दरबार’ भरू लागला आहे. विधानसभा निवडणूक जवळ येत असल्याने या दरबाराला आणखी रंग येत लागलाय. दररोज लोकांची ये-जा वाढत आहे. समस्या मांडण्यासाठी थेट भेटी, चर्चा आणि हस्तक्षेप वाढू लागला आहे. हे सगळे नेमके जनसंपर्कापुरते आहे की विनयभाईंना पुन्हा आमदारकी खुणावते आहे. आपण निवडणूक लढवणार, असे संकेत त्यांनी यापूर्वीच दिलेले आहेत. पण या मतदारसंघात एक उभरता तारा जन्माला आला आहे. त्यामुळे विनयभाईंचे हे ‘संकेत’ कुठपर्यंत मजल मारतात, हे आता बघावे लागले. आणखीही काहींनी बाशिंग बांधलेले आहेच ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.